नवीन लेखन...

बाबू !

माझ्या आयुष्यातून ‘बाबू’ या नावाच्या व्यक्तींना वजा केलेतर, हाती बावांच्याच राहील! इतके ‘बाबू’ माझ्या भूतकाळात ठासून भरलेत. बहुदा गेल्या जन्मी एक जुलमी राजा असेन, आणि माझ्या अत्याचाराला बळी पडलेली जनता, या जन्मी ‘बाबू’ होऊन, बदला घेत असावेत अशी शंका मला येऊ लागली आहे. एकवेळ बेसना पासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची गणती करता येईल, पण ‘बाबू’ नाव असणाऱ्या माणसानसांच्या व्यवसायाची मोजदात केवळ अशक्य! माझा परीट बाबू! नापित बाबू! शिंपी बाबू! रिक्षेवाला बाबू! बॅंकेतला शिपाई बाबू! (पुढे -पुढे त्याच्या प्रेमळ स्वभावाने तो बाबड्या झाला हि गोष्ट वेगळी!) माझा साहेब पण बाबूच! (हा! याला चारचौघात बाबुराव साहेब, म्हणव लागायचं, पण कर्तृत्वानं ‘बाब्या!’म्हणण्याच्या सुद्धा लायकीच नव्हतं! अस्तु!), आणि खातेदारात तर, बाबूच बाबू! खरे तर सरकारी कारकुनाला ‘बाबू’ म्हणण्याची त्या काळी प्रथा होती. पण माझ्या इतक्या बाबूत एकही सरकारी नव्हता. सगळेच्या सगळे स्वतंत्र संस्थाने!

तर त्यातलाच एक बाबू, माझ्या समोर बसला होता.
निमित्य होते, माझ्या घरी काही कार्यक्रमानिमित्य चार लोक जेवायला बोलवायचे होते. आचारी लावायचं घाटत होत. त्याकाळी आजच्या सारखे ‘पात्रावर’ हिशोब ठेवणारे ‘केटर्स’नव्हते.(लहान मुलाचे पात्र, सुद्धा हिशोबाला ‘पात्र’असेल! अशी तळटीप मारून दरपत्रक हाती देणारे.) सगळा मोकळा ढाकळा कारभार!
“भुजी! तुमच्या साठी आचारी घेऊन आलो! आक्के मी आलोय, चहा टाक!” गावात सासुरवाडी असल्याचा एक निगेटिव्ह फायदा म्हणजे हा आमचा एक मेव्हुणा! हिचा लांबचा चुलत भाऊ. त्याला आमची हि ‘भू’ म्हणते, ‘भाऊ’ तसा मोठा आणि लांबलचक शब्द आहे ना! अन हा ‘भू’ मला भावजी ऐवजी, ‘भुजी’म्हणून शब्दांची अल्पबचत करतॊ. बाकी बहीणभाऊ काटकसरीच!
“असं का? बर झालं, घेऊन आलास. यांचं नाव काय?”
” तुमच्या लग्नात यालाच लावला होता आम्ही! मठ्ठा मोठा मस्त करतो! तो आयटम आपल्या जेवणात पाहिजे बर का! मग मला आहेर केला नाही तरी चालेल!” यावर भुजी काय बोलणार? मठ्ठा अन आहेर दोन्ही रद्द करण्याचा दुष्ट विचार मनात चमकून गेला!
“आमचं नाव बाबू असती!” मराठवाड्याच्या आसपासचाहि दिसत नव्हता! भाषा लिगभेदा पलीकडची होती. मी त्याला खालपासून वरपर्यंत न्याहाळला. हा सव्वापाच फुटी, बाबू नामक मानवी देह इतका सुकलेला होता कि, त्याला पाहिल्याबरोबर, याला चार दिवस पाण्यात भिजू घालावा असं वाटलं. कोपरा पर्यंत दुमडलेल्या, भाहयाचा पंधरा सदरा, करपलेल्या फोणणी सारख्या चेहरा, हनुवटीला जिरे चिकटल्या सारखी दाढीची खुंट! कपाळावर, दिवाळीतल्या भुईनळ्या सारख्या नाकापासून टाळूपर्यंत. आंगठ्याने लावलेले भव्य कुंकू! पुढे त्याची ओळख वाढल्यावर, हा कुंकवाचा पट्टा, त्याने आंघोळ  केल्याचा पुरावा असतो, हे कळले! बाकी त्याच्यात अंघोळीने फारसा फरक पडत नाही. साबण घाण होईल म्हणून त्याची बायको देत नाही म्हणे!
“बर, बाबुराव साधारण—“
“मला तू  बाबूच म्हण. मला चालती! किती लोक अन गोड काय ते बोल!” अहो जाहो, आदरार्थी बोलणं असल्या फडतूस गोष्टीत त्याला विश्वास नसावा.
” गोड काय करावं? या विचारात आम्ही आहोत, तुम्हीच काही तरी सुचवा. गुलाबजाम? साधारण साठ सत्तर –“
“भुजी, आहो त्याला अरे तुरे म्हणा, आपल्या घरच्या सारखाच आहे! काही हरकत नाही!” हे मात्र पुढे खरे झाले. आमची चांगलीच जवळीक झाली होती.
“हा! हे बोरोबर बोलती! त गोडाचा म्हणती, ते रवाबेसन चक्की पडू. वरण, चपाती, अन चुका पालक गरगट, अन बैंगनमसाला! बस झाली!”
“अन आलू बोन्डा ठेवावा म्हणतो!” या बाबानं सगळा मेनू आपणच ठरवून टाकला होता.
“नको! आलू दुसरी दिशी विटती! उरला त खराब हुईल! त्या पेक्षा खरी बुंदी चार घाणे काढीन! राहीलतर घरी खात रहा! आता दे ठरावच सुपारी!”
झालं सगळं झालं?
“पण बाबू, अरे किती पैशे?”
“पैसे? तू देशील ते घेती. कमी वाटली तर मागील! आता यादी देती, घे लिहून.” आता त्याच्या आवाजात अधिकार वाणी जाणवत होती. कारण तो त्याच्या प्रांतात घुसणार होता.
“हू. सांग!” मी कागद पेन घेऊन बसलो.
“पैले श्री घाल डोक्यावर! मग हळद, कुंकू लाव!”
मी कागदाच्या मध्यावर श्री लिहला. आणि यादी सुरु केली.
“हळद, कुंकू. पुढं?”
“लाल धागा बिड्याचे बंडल दहा!”
“दहा?” हा भट्टीत लाकडाच्या ऐवजी बिड्या घालून स्वयंपाक करणार कि काय?
“अरे लागती मला! अर्धशेर साखऱ्या आणि पावशेर चा पत्ती पण मला लागलं! दुदु घरातलंच मागील!”
मग सविस्तर म्हणजे लिंब, मीठ, कोशिंबिरी पर्यंत यथासांग यादी झाली.
मी त्याला कुंकू लावून एकशे एक रुपये दिले. त्याने वरचा रुपया ठेवून घेतला. शंभराची नोट परत मला दिली.
“?”
“हि माझंच असती. तू सम्भाळ. जवा लागली तवा मागीन!”
नंतर कळलं, बिडी-काडीला याला लग्नसराई नंतर, कमी पडतात. बायको पैसे देत नाही! हिशोबाला कच्चा माणूस,आलेला सगळा पैसा बायकोच्या हवाली केला की हा बिड्या प्यायला मोकळा!
तो आणि आमचा साला चहा पिऊन निघून गेले.
“हा काय गोंधळ घालणार माहित नाही!” मी बायकोला म्हणालो.
“नका काळजी करू! आमच्या कडे नेहमी हाच असतो! छान चव असते याच्या जेवणाला!” बायकोने मला खात्री दिली.
अप्रतिम भोजनाचा पाहुण्याना आला.
हा असच करतो. भाज्या हाच ठरवतो, कारण कोणत्या दिवसात कोणत्या भाज्या स्वस्त आणि चांगल्या असतात याची कल्पना असते. आधी पैसे ठरवत नाही. काहीही दिले दिले तर ‘अजून शंभर दे!’ म्हणतो. झालं.
बाबू पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. यात्रा, गावजेवण, किंवा मंदिरातला प्रसाद करायचा असेल तर हा केवळ बिड्याच्या कट्ट्यावर राबायचा!
बिडी-आणि बाबू यांचं बहुदा सोलमेटच नातं असावं. जेव्हा जेव्हा हा मला दिसायचा तेव्हातेव्हा याच्या डाव्या हातात बिडीचं जळत थोटूक असायचं. बोलताना सुद्धा बिडीचा विरह सहन होत नसल्यासारखा दातात बिडी धरून बोलायचा. परमेश्वराने आधी बिडी समोर धरून त्याच्या मागे बाबू घडवला असावा! बिडी फक्त दोन जागी तो ओढत नसे. एक मंदिरात अन दुसरे घरात. मग ते स्वतःचे असो कि दुसऱ्याचे! त्यामुळे याचा मुक्काम बहुतेक घराबाहेच्या झोळ पडलेल्या फेंगड्या पायाच्या बाजेवरच असायचा.
“बाबू, मी पाहुण्या रावळ्यात गुंतलेला असेन, तेव्हा जेवल्याशिवाय जाऊ नकोस.” मी त्याला माझ्याकडे स्वयंपाकाला आला त्या दिवशी त्याला सांगितले.
“मी भाईर जेवत नसती! तुज्याकड कदीतरी तुकडा खायला येययिल!”
“बाहेरच चालत नाही का तुला?”
“तस नाही. काय कि या मसाल्याच्या वासानं भूक मरती! खाऊ वाटत नाय! मी घरीच जेवते!”
“अरे उशीर होईल घरी जायी पर्यंत. थोडं काहीतरी खाऊन जा!” मी आग्रह धरला.
“भूक लागली तर, चाई पिते! बस!”
चहा मात्र आवडीने पीत असे. गोड चीटुक करून!
तो स्वयंपाकाला येतानाच त्याचा आवेश पहायसारखाच असायचा. एखादा योद्धा हातात भाला घेऊन मोहिमेवर निघाल्या सारखा, त्याच्या हाती डोक्याइतकी उंच दांडी असलेले उलथून असे. बुंदी पडायचा  झाऱ्या बजरंगबलीने गदा खांद्यावर घ्यावी तसा खांद्यावर घेतलेला. कपाळाला कुंकवाचा टिळा! हत्तीच्या आम्बरीत एखादा सरदार बसावा अश्या ऐटीत बाबूचे, सायकलरिक्षातून आगमन व्हायचे! चुलवण करून त्याला हळद कुंकू वाहून, अंगावरचे कपडे काढून ठेवायचा.  हातभार पंचा कमरेला गुंडाळून एकदाचा तयार झाला कि चुलवणात लाकडं कोंबायचा. उभ्याने आर्धी बाटली रॉकेल त्यावर ओतून, सर्रकन काडी ओढून त्यावर टाकायचा. मग समाधानाने थोडं लांब दोन पायावर, बसून कानात अडकवलेली बिडी दातात धरून पेटवायचा. लाकडांनी चांगला पेट घेतल्याची खात्री झाल्यावर पहिलं आधण चहाच चढायचं! पशाच्या मापन साखर पत्तीची, होमात समिधा टाकाव्यात, त्या आवेशाने आहुती पडायची. मग बाकी स्वयंपाक यथाअवकाश सुरु व्हायचा.
——————————————————————————————————————-०००—-
एकदा तो घरी आला.
“माजे शंबर तुझ्या कडे ठेवली ते दे!”
“बाबू, अरे ज्यादा बिड्या पीत जाऊ नकोस. प्रकृतीला वाईट असत.” मी पैसे देत म्हणालो.
“नको पिऊ त काय करू? दम निगती नाही. तल्लफ बेक्कार असती!”
“अरे, तुझ्या पोरांसाठी तरी पैसे वाचावं? बिड्यापायी प्रकृती अन पैसा बरबाद होतो! बरी आठवण झाली. तुला स्वयंपाकाचे जे पैसे मिळतात ते तू बँकेत ठेवतोस ना? म्हातारपणी कामाला येतील.” आमच्यातला  बँकर तसा सदैव जागा असतो.
“कामाची पैस बायको घेत.”
“अन काय करती? ती तरी बँकेत ठेवते का?”
“नाही! सोना खरीदी करताय!”
“ते ठीक पण अडीअडचणीला, औषध पाण्याला नगदी पैसा लागतो हाताशी!”
“असं म्हणत, उद्या येतो तुझ्या कचेरीत. खोलून दे खात्या!”
मी दुसरे दिवशी खाते उघडून दिले. माझ्या सहकाऱ्यांना बाबुला आल्यावर मदत करायला सांगून ठेवले.
——————————————–०००——-
बाबू आमच्या घरी आला कि बायको त्याला आधी एकपोळी आणि कोरडी शेंगदाण्याची चटणी आणि मग चहा द्यायची.
“तू बाबू आल्यावर, चहाच्या आधी पोळी का देतेस?” दोनचारदा पाहिल्यावर मी एकदा हिला विचारलं.
“आहो, कुठं बोलू नका. याला बायको कधी कधी जेवायलाच देत नाही म्हणे! याला तेलाच्या आणि मसाल्याच्या वासानं कामाच्या जागी जेवण जात नाही. बायको पंगतीत पोराला घेऊन जेवून येते. घरी स्वयंपाकच करत नाही! हा तिला शिव्याघालत बाजेवर बसून रहातो! याच्या शेजारच्या बायका, हळदीकुंकाला आल्या होत्या त्या सांगत होत्या! म्हणून कधी कधी देते चटणी पोळी!”
“अरे, असं कस? असल्या बाईबरोबर त्यानं राहू नये!”
“न राहून काय करतो? याचा जीव त्याच्या पोरात अडकलाय. वेगळं झालेतर त्याची ताटातूट होईल ना? अजून लहान आहे. त्याला आईची गरज आहे.”
हा शेकडो नव्हे तर हजारो लोकांची क्षुधा शमवणारा, स्वतःच उपाशी रहावा? याला काय म्हणावं?
———————————————————————०००——-
एका दसऱ्याला आपल्या चार वर्षाच्या पोराला नवे कपडे घालून आमच्याकडे घेऊन आला होता.
“हे आमचं पोरग असती. धनु, या सायबाची पाया पड.”
ते गोंडस पोरग वाकल तस मी त्याला उचलून कडेवर घेतलं.
 “धनु म्हणजे धनंजय नाव आहे का?”
“नाय! धनु म्हंजी धर्मेंद्र!”
“सिनेमातला?”
“व्हय!” त्याच्या डोळ्यात कौतुक होते.
हिने त्या पोराला आणि बाबुला पुरणपोळी दिली. चहा केला.
“अहो, रोल भरलेला आहेच. या बाप लोकांचा फोटो घ्या कि काढून.” अशा गोष्टी बायकोला वेळेवर कशा आठवतात, हे एक अजून न सुटलेलं कोड आहे.
मी नुकताच कोड्याक कॅमेरा घेतला होता.
“फोटू? रंगीन असती?”
“हो! कलर रोल आहे.”
बाबू ताठ बसला. पोराला मांडीवर घेतलं. मी फ्लॅश मारून फोटो घेतला.
“मी पैशे देती! फोटो छापून दे!”
रोल संपून प्रिंट येई पर्यंत बाबू रोज एक चक्कर टाकून विचारून जायचा. शेवटी त्याला पोस्टकार्ड साईझचा फोटो दिला तेव्हा गडी लहान लेकरा सारखा हरकून गेला होता. त्याचे चमकणारे डोळे अजून माझ्या आठवणीत आहेत! त्याने पैसे देऊ केले पण मीच घेतले नाहीत.
त्या गावचे आमचे अन्न-पाणी संपले. माझी बदली झाली. बाबू आवर्जून भेटायला आला.
“बाबू, थोडे थोडे पैसे खात्यात भरत जा. पोराला चांगला शिकावं. तुझ्यासारखा झाऱ्या त्याच्या हाती देऊ नकोस, काय?”
“हा. तेला मी शिकवती. तझ्या सारखं प्यांटवाला साहेब करील!” त्याने मला आश्वासन दिले.
——————————————————————————————————————०००—-
 औरंगाबादच्या घाटीच्या दवाखान्यात, जरनल वार्डात माझा एक खातेदार ऍडमिट होता. त्याची विचारपूस करावी हा विचार मानसी होता. रिसेप्शनला चौकशी केली, त्या खातेदाराचा बेड नंबर घेतला. त्याला दिलासा देऊन बाहेर पडणार तोच माझे लक्ष दाराजवळच्या खाटेकडे गेले. पेशंट ओळखीचा वाटला.
“तू इथं काय करती?”
“बाबू?”
“हा! मीच असती! कॅन्सर झाली. डाक्टर बोलली!”
“बिड्या पिऊन अजून काय होणार? बाकी घरचे कसे आहेत? मुलगा? घातला का शाळेत त्याला? अन सोबत कोण आहे तुझ्या?”
“मी एकटाच असती! बायको सोन अन पोराला घेऊन गेलं! तिच्या माहेरी! सोन्याचं काय नाय, पण धनु डोळ्यासमोर असायला पायजे होती! आता थोडेच दिवस असती ना!”
पोराच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले असावेत. ते दिसू नये म्हणून त्याने भिंतीकडे तोंड फिरवले.
त्याच्या उशाखालून अर्धवट बाहेर डोकावणारा, मी काढलेला बापलेकांचा फोटो दिसत होता. चुरगळलेला, त्याचा स्वप्नांन सारखाच! माझ्या डोळ्याच्याकडा ओलावल्या.
आईला दुरावलेल्या मुलाचे हाल मी आजवर अनेकदा पाहिलेत. मुलगा दुरावलेल्या बापाची तडफड मात्र आजच पहात होतो!
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे. पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..