नवीन लेखन...

बलुचिस्थानची पटकथा

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ला येथून भाषण करताना चुकून बलुचिस्थानच्या स्वातंत्र्याचा विषय छेडला, असे अनेक भारतीय राजकीय विश्लेषकांना आजही वाटत आहे. कारणही सोपे आहे.

यापुर्वी बहुतेक प्रसंगी सरकारच्या अधिकार्‍यांपेक्षाही ठराविक पत्रकारांना आणि त्यातल्या ‘जाणत्यांना’ सरकारच्या धोरणांचा आधी सुगावा लागत असे. किंबहूना त्यातले अनेकजण सरकारला सल्ले देत असत.

मोदी सत्तेत आल्यापासून अशा लुडबुड्या पत्रकारांना विश्लेषकांना सरकारी दालनात फ़िरकण्यावर निर्बंध आले. त्यामुळे त्यांचा सल्ला कोणी घेत नाही, की उद्या काय होऊ घातले आहे, त्याची चाहुलही त्यांना लागत नाही.  मग बलुचिस्थानचा स्वातंत्र्य लढा, हा विषय मोदींनी किती विचारपुर्वक आपल्या भाषणात आणला, त्याचा थांगपत्ता अशा जाणत्यांना कसा लागू शकेल?

पण अशा लुडबुडीपेक्षा घडणार्‍या घटनांचा सतत पाठपुरावा किंवा अभ्यास करणार्‍यांना नेमके ठाऊक आहे, की यामागे योजनाबद्ध हालचाली झालेल्या आहेत. किंबहूना उरीचा हल्ला करून पाकिस्तानने अशा हालचालींना वेग आणला आहे.

यापुर्वी असे अनेक हल्ले पाकच्या जिहादींनी केले आहेत. पण पाकची नाकेबंदी करण्यासाठीच्या विविध कारवायांचे जे पर्याय आज समोर आणले जात आहेत, त्याची यापुर्वी कधीतरी चर्चा झाली होती काय?

नसेल तर का झाली नाही?  कारण त्या दिशेने कधी विचारही झाला नव्हता. सत्तांतरानंतर याचा अतिशय बारकाईने विचार झाला असून, हे पर्याय शोधून ठेवलेले होते. म्हणूनच आर्थिक वा राजनैतिक उपायांची अंमलबजावणी विनाविलंब सुरू झाली.

त्यातला बलुची स्वातंत्र्याचा विषय आजचा नाही. दिड वर्षापुर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अबित डोवाल यांनी त्याचे सुतोवाच केलेले होते. मुंबईसारखा पुढला हल्ला झाला, तर पाकला बलुचिस्थान गमवावा लागेल, असे त्यांनी एका भाषणात सांगितले होते. आज त्याच दिशेने वाटचाल होते आहे ना?

चित्रपटाच्या चित्रणापुर्वी संपुर्ण पटकथा तयार असते. त्यानुसारच विविध प्रसंग घडत असतात किंवा घडवले जात असतात. त्यातली विविध पात्रे जे संवाद बोलतात, तेही आधीपासून लिहीलेले असतात. त्यातले काही संवाद बोलणारा दिसत नाही, त्यापेक्षा अशा संवादाच्या प्रभाव पडणार्‍या व्यक्तीवर कॅमेरा असतो. बलुची स्वातंत्र्याचा विषय तसाच आधीपासून योजलेला आहे आणि त्यामागे संपुर्ण व्युहरचना केलेली आहे. त्यानुसारच मोस्ट फ़ेवर्ड नेशन किंवा सिंधू खोर्‍यातील पाणी पाकिस्तानला देण्याचा करार; असे विषय समाविष्ट आहेत. ते अकस्मात आलेले नाहीत.

पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी केवळ लष्करी नव्हेतर अन्य कोणकोणत्या मार्गाने पाकला चहुकडून घेरता येईल, याचा पुरेपुर अभ्यास करूनच ह्या पटकथेचा उलगडा सुरू झालेला आहे. याचे पुरावे ज्यांना बघायचे असतील त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र ज्यांना मोदी हा अतिरेकी व आगावू माणुस असल्याचे सिद्ध करायचे असते, त्यांना यातले काही दिसू शकत नाही, की आपण दाखवू शकणार नाही. कारण त्यांना असे काही बघायचेच नाही.

उरीचा हल्ला सप्टेंबर महिन्याच्या आरंभी झाला. स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी होता. त्याच्याआधी महिना पाकिस्तानातील भारतीय वकिलातीला काय आदेश गेले होते? त्याची  कोणाला खबर आहे काय?

इस्लामाबाद येथील भारतीय वकिलातीमध्ये काम करणार्‍या कर्मचारी अधिकार्‍यांचे कुटुंबियही तिथे असतात. त्यांची एकूण पन्नास मुले तिथल्या शाळेत जात होती. यावर्षी त्यांना  तिथल्या शाळेत घालू नये, तर मायदेशी वा अन्यत्र कुठेतरी पाठवावे, असा आदेश परराष्ट्र विभागाने दिलेला होता. म्हणजेच पाकिस्तानातील भारतीय कर्मचार्‍यांसाठी असुरक्षित स्थिती उदभवू शकते, याची पुर्वकल्पना देण्यात आलेली होती.

ही कसली तयारी म्हणता येईल? तेव्हा उरी घडले नव्हते, की मोदींनी बलुची विषयाला हात घातलेला नव्हता. याचा सरळ अर्थ असा, की बलुची स्वातंत्र्याला पाठींबा देणे किंवा पाकिस्तान चिनी महामार्ग योजनेला विरोध करणे; यातून तणाव निर्माण होणार याची पुर्वकल्पना होती आणि त्यादृष्टीने तयारीही आधीच सुरू झालेली होती.

पाकिस्ताननेही बलुची हद्दीत कुलभूषण जाधव नावाच्या भारतीय हेराला अटक केल्याचा मार्चमध्येच दावा केला होता. अशा अनेक बातम्या सुसंगत मांडल्या तर लक्षात येऊ शकते, की उलगडत जाणारी कहाणी पुर्णपणे आकस्मिक नाही.

त्यातली उरीची घटना अनपेक्षित आहे. पण बाकीचा घटनाक्रम आधीपासून लिहीलेल्या पटकथेनुसार चालू आहे. त्यानुसार ब्रह्मदाग बुगती हा परागंदा बलुची नेता भारताच्या पाठींब्याचे स्वागत करतो आणि भारतात आश्रय मागतो, ही घटना आकस्मिक नाही.

जगभर विविध अनेक देशात वसलेले बलुची पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत भारताचे कौतुक करीत रस्त्यावर येतात. अमेरिकन संसदेतील दोन सदस्य पाकला दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव सादर करतात. किती म्हणून योगायोग शोधायचे? एका घटनेनंतर दुसरी घटना अशी घडते आहे, की पाकिस्तानच्या पोटात धडकी भरली पाहिजे.

पाक नेते व सेनेच्या अधिकार्‍यांची पोकळ भाषाही आता उघडी पडू लागली आहे. कारण त्यांना सापळ्यात अडकल्याची हळुहळू जाणिव होते आहे. मात्र सापळ्यात फ़सलेला प्राणी अधिक ताकदीने हातपाय हलवून गुरफ़टत जातो, तशी पाकची तारांबळ उडालेली आहे. कारण पटकथेचा पुढला भाग त्यांना ठाऊक नाही, की इथल्या ‘जाणत्यांनाही’ समजलेला नाही. प्रत्येक घटना थरारक कथेप्रमाणे उलगडत जाते, तेव्हाच परिणाम साधला जातो. अशावेळी उरीचा हल्ला ही घटना भारतासाठी आकस्मिक असली तरी तिने बलुची पटकथेला वेग आणला आहे. कारण पाकला धडा शिकवण्याच्या मागणीला देशात मोठा पाठींबा मिळण्याला ती घटना कारणीभूत झाली आहे. अन्यथा पाकविरोधात इतके मोठे पाऊल उचलणे मोदींना अवघड झाले असते.

आधीच आजवरचे विद्वान किंवा अभ्यासक सतत पाकिस्तानशी दोस्तीचा आग्रह धरत आले. काश्मिरात धुमाकुळ माजल्यावर तिथे गेलेल्या शिष्टमंडळातील पाकप्रेमी भारतीय नेत्यांनीही पाकधार्जिण्या हुर्रीयत नेत्यांचे दार वाजवलेले होते. त्यांना सोबत घेऊन पाकिस्तानची कोंडी करण्याचे डावपेच मोदी खेळू शकले नसते. मोदींवर मग युद्धखोरीचा आरोप झाला असता. उरीच्या हल्ल्याने मोदींची त्यातून सुटका झाली आहे.

सामान्य जनता सोडाच, सतत पाकशी मैत्रीचा आग्रह धरणार्‍यांनाही पाकला धडा शिकवण्याची भाषा आज बोलावी लागते आहे. अगदी इथे पाकप्रेमी मानले जातात, त्यांनाही पाकला धडा शिकवण्याला नकार देता आलेला नाही. म्हणूनच उरीचा घातपात ही पाकची चुक होती. कारण त्यामुळे बलुची पटकथेनुसार कथानकाचा मुहूर्त सोपा होऊन गेला. मात्र ती कथा उलगडू लागल्यावर युद्धाआधीच पाकला धडकी भरली आहे. अर्थात भारत उद्या उठून पाकवर हल्ला करण्याची अजिबात शक्यता नाही.

शत्रूला खच्ची करून आणि त्याचे मनोधैर्य ढिले केल्यावर कमी शक्तीनेही त्याचा पराभव साध्य होत असतो. भारताची वा मोदींची रणनिती तशीच आहे.  म्हणून दर दोनतीन दिवसांनी पाकला धडकी भरवणार्‍या नव्या पर्यायाची चर्चा सुरू केली जाते. या गडबडीत सतत अण्वस्त्रांचा हल्ल्याची धमकी देणार्‍या पाकला अणूबॉम्बचाही आता विसर पडला आहे. कारण अण्वस्त्राच्या धमकीला भारत आता घाबरत नाही, हेही पाकच्या लक्षात आलेले आहे.

किंबहूना काश्मिरपेक्षा बलुचिस्थान कसा वाचवायचा आणि उर्वरीत पाकिस्तानी प्रांतामध्ये उठाव झाला तर टिकाव कसा लागणार; अशाच चिंतेने पाकला सध्या घेरलेले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रे चाळली तर त्याचा थोडा अंदाज येऊ शकतो.

हे एका पटकथेनुसार घडत चाललेले कथानक आहे त्याचाही अंदाज येऊ शकतो. अर्थात ज्यांना त्यातले तथ्य बघायचे असेल, त्यांनाच बघता येईल. बाकीच्यांनी परिणाम दिसेपर्यंत कळ काढावी.

 

— ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर  यांचा  WhatsApp वरुन फॉरवर्ड झालेला लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..