नवीन लेखन...

फ्लॅशबॅक … क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासावर एक नजर

  चेंडूफळीचा खेळ हा आता केवळ शिस्तबद्ध ‘खेळ’ राहिलेला नाही. तो अगदी ‘विसविशीत’ [टी20ला मराठी पर्याय, सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित, बौद्धिक संपदा कायदा] स्वरूपात आता खेळला जातो आहे. सतराच्या शतकातच तो एवढा लोकप्रिय झाला होता की रविवारी चर्चला जाण्याऐवजी क्रिकेट खेळल्यास खेळाडूंना दंड करण्यात येई. हॉकीस्टिकसारखी बॅट, हात न फिरवता चेंडू टाकणे अशा ‘कच्च्या’ स्वरूपात हा खेळ आग्नेय इंग्लंडमध्ये उदयास आल्याचे पुरावे सापडतात. वसाहतवाद, राष्ट्रवाद आणि वंशभेद, जातपात यांचे ठसेही या खेळाच्या इतिहासातून दृष्यमान होतात. फुटबॉल, बेसबॉल यासारख्या खेळांपेक्षा अधिक वेळ लागत असूनही हा खेळ लोकप्रिय होण्याचे कारण त्याच्या इतिहासातच दडलेले आहे. आधुनिक सांघिक खेळांमध्ये सर्वप्रथम ज्या खेळाच्या नियमांना बंदिस्त स्वरूप दिले गेले त्यांच्यात क्रिकेट अग्रभागी आहे. लिखित स्वरूपातील क्रिकेटचे नियम सर्वप्रथम 1744मध्ये आले. ह्यात बॅटच्या आकारावर कोणतीही बंधने नव्हती. त्यानंतर 30 वर्षांनी पायचितचा नियम आला. अंदाजावर आधारित आणि पूर्णपणे पंचांच्या अखत्यारीत असलेला फलंदाज बाद होण्याचा आजही ‘पायचित’ हा एकमेव प्रकार आहे. 1760-70 दरम्यान हात फिरवून गोलंदाजी केली जाऊ लागली. याच काळात पूर्वीच्या दोन यष्ट्यांची जागा आता तीन यष्ट्यांनी घेतली. एका बहाद्दराने यष्ट्यांना झाकून टाकण्याएवढ्या रुंदीची बॅट वापरल्याने बॅटच्या आकारावर बंधने आली.निवांत मोकळा वेळ असल्याने विशेषतः ग्रामीण भागात अनेक दिवसांपर्यंत सामने खेळले जात. औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या जीवनातील स्वच्छंदीपणा काहीसा हरवला आणि प्रहर, दिवस, सप्ताह याप्रमाणे वेतन दिले जात असल्याने त्यानं
तर ज्या ज्या खेळांचे नियम औपचारिक स्वरूपात बनविण्यात आले त्यांच्यामध्ये वेळ हा महत्त्वाचा घटक राहिला आहे. हॉकी, फुटबॉल अशा खेळांच्या मैदानाचे आकारही ठरवून दिलेले असल्याने ते खेळण्यास अडचणी पडतात. क्रिकेटच्या मैदानाची

मापे मात्र अजूनही ‘नियमांमध्ये’ अडकलेली नाहीत. वानखेडे मैदानावर जीव खाऊन मारलेल्या ज्या फटक्यावर फलंदाजाला 6

धावा मिळतात त्या फटक्यावर मेलबर्नच्या मैदानावर मुश्किलीने पळून तीन धावा मिळतात! पूर्वीच्या काळी पंच आणि प्रतिस्पर्धी यांना मान्य असेल ती रेषा ‘सीमारेषा’ असे साधे समीकरण होते. 1848मध्ये रबराच्या गंधकीकरणाचा शोध लागला (व्हल्कनायझेशन) आणि मग ग्लव्ह्‌जसारखी साधने वापरली जाऊ लागली. 1877मध्ये ऑस्ट्रेलिया ब्रिटिशांची वसाहत असतानाच पहिलावहिला क्रिकेट सामना खेळला गेला. आधुनिक जगाच्या इतिहासातील पहिले स्वतंत्र राष्ट्र अशा तर्‍हेने क्रिकेटच्या मैदानावर उदयाला आले!

क्रिकेटचा सामाजिक इतिहासही मनोरंजक आहे. पैशासाठी न खेळता करमणुकीसाठी खेळणे हे उच्चवर्गाचे लक्षण मानले जाई. (श्रीमंतांचे लक्ष जावे एवढा पैसाही तेव्हा क्रिकेटमध्ये नव्हता.) मनोरंजनासाठी खेळणार्‍यांना इंग्लंडमध्ये हौशी म्हटले जाई आणि त्यांना सभ्य समजले जाई. व्यावसायिक क्रिकेटपटूंना खेळाडू म्हणून संबोधले जाई. एखाद्या पुरस्कर्त्याच्या दानातून खेळाडूंना काही ‘पैसा’ दिली जाई. क्रिकेटचा हंगाम संपल्यावर हे ‘खेळाडू’ एखाद्या खाणीमध्ये किंवा मिळेल तिथे काम करीत! सभ्यांचे आणि खेळाडूंचे मैदानावर येण्याचे मार्गही वेगवेगळे असत. ’क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे’ असे म्हटले जाण्याचे कारणही याच्यातच दडलेले आहे. सभ्य लोक हेच बर्‍याचदा फलंदाज असत आणि गोलंदाजी-क्षेत्ररक्षणासारखी कष्टाची कामे व्यावसायिक करीत; त्यामुळे शंकेचा फायदा नेहमी फलंदाजांना मिळत असे. कर्णधार सभ्यांपैकीच असे आणि न चुकता तो फलंदाजच असे. एखाद्या व्यावसायिक खेळाडूस इंग्लिश संघाचे कर्णधारपद मिळण्यास 1930चे दशक उजाडावे लागले.

‘वॉटर्लूची लढाई एटनच्या मैदानांवर जिंकली गेली’ असे म्हटले जाते. इंग्लंडमधील सार्वजनिक शाळांमधून शिकविल्या गेलेल्या शिस्तीमुळे लष्कराचे काम सोपे झाले असा अर्थ त्यात अभिप्रेत आहे. क्रिकेटच्या खेळाकडे शिस्त शिकविण्याचा एक भाग म्हणूनच नेहमी ब्रिटिशांनी पाहिले. हॉकी, फुटबॉलसारखे सामने खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय झाले तसा क्रिकेटचा अजूनही झालेला नाही हे खरे आहे आणि वसाहतवादात त्याचे कारण दडलेले आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, आफ्रिका खंडातील आणि कॅरिबिअन बेटांवरील ब्रिटिश वसाहतींमुळे या खेळाचा तिथे प्रचार आणि प्रसार झाला. भारतासारख्या देशातील धनिकवर्गाने त्याला ‘उच्चवर्गीयत्वाची खूण’ मानल्याने भारतातही त्याचा प्रसार झाला. संघटित क्रिकेटमध्ये त्या काळी वसाहतीतील प्रजेला खेळण्याची मुभा नव्हती. 1950मध्ये सर्वप्रथम वेस्ट इंडीजच्या संघाने इंग्लंडमध्ये मालिका जिंकली तेव्हा कॅरिबींनी ’आपण ब्रिटिशांपेक्षा दुय्यम नसल्याचा’ पुरावा म्हणून विजयाकडे पाहिले. अनेक बेटांवरचे खेळाडू मिळून विंडीजचा संघ बनला होता. आजही तो तसाच बनतो. ‘एक वेस्ट इंडीज’ बनविण्याच्या असफल प्रयोगाचा एक ढळढळीत पुरावा म्हणून विंडीजकडे बोट दाखवता येईल.

1932पर्यंत भारताला कसोट्या खेळण्याची मुभा दिली गेली नाही. भारतातील क्रिकेटचा पाया आपल्या व्यापारी गुणांमुळे इंग्रजांशी जवळून संबंध आलेल्या पारशांनी घातला. 1848मध्ये मुंबईत ओरिएन्टल क्रिकेट क्लब स्थापन झाला. टाटा आणि वाडियांसारखे उद्योजक पारशी क्लबांना आर्थिक मदत देऊ लागले. बॉम्बे जिमखान्यावर आपल्याला खेळण्यास आडकाठी होते आहे हे पाहून पारशांनी स्वतःचा जिमखाना बांधला आणि त्यांचा संघ बॉम्बे जिमखान्याचे ‘दौरे’ करू लागला. पारशी जिमखान्यामुळे भारतातील धार्मिकता जागी झाली आणि हिंदू आणि मुस्लिम आपापला जिमखाना बांधण्यासाठी निधी जमवू लागले.

भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेट असे धार्मिक बाबींवर उभे राहिले. रणजी करंडकाची मुळे चौरंगी सामन्यांमध्ये आढळतात आणि हे रंग होते – युरोपीय, पारशी, हिंदू आणि मुस्लिम. यातूनही उरलेल्यांनी नंतर पाचवा ‘शेष’ गट काढला. विजय हजारेंसारखे ख्रिश्चन ‘शेष’मधून खेळू लागले. पुण्यात जन्मलेला बाळू पळवणकर हा त्याच्या काळातल्या सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक होता पण अस्पृश्य असल्याने त्याला हिंदूंच्या संघाचे कर्णधारपद कधीही मिळाले नाही. त्याच्या भावाला – विठ्ठल – 1923मध्ये कर्णधारपद मिळाले तेव्हा अनेकांना तो गांधीप्रणित अस्पृश्यतानिवारणाचा विजय वाटला. भारतीय स्वातंत्र्यलढा देशाला एकसंध करण्याचा प्रयत्न करीत असताना जातीय विभागणीवर आधारित पंचरंगी

सामन्यांवर महात्मा गांधींनी खरमरीत टीका केली होती. पंचरंगीला पर्याय म्हणून ‘राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा’ सुरू करण्यात आली पण भारताला

स्वातंत्र्य मिळेपर्यंत तिला यश आले नाही. नंतर तिचेच नाव ‘रणजी करंडक’ असे झाले.

क्रिकेटच्या या प्रवासामधील काही ठळक प्रसंगांचा, नाटकीय घडामोडींनी रंगलेल्या सामन्यांचा, केवळ मैदानावरीलच नव्हे तर ड्रेसिंग रूम आणि त्याच्यापलीकडेही घडलेल्या आणि खेळाला प्रभावित केलेल्या घटितांचा समावेश या सदरामध्ये मी करणार आहे. प्रामुख्याने कसोटी क्रिकेट, इंग्लंड आणि भारतातील प्रथम श्रेणीच्या क्रिकेटचे हंगाम यावर भर दिला जाणार आहे. फ्लॅश मारण्याचे काम मी आजपासून करतो आहे, त्याचे ’टाइमिंग’ आणि ’कॅप्चर’ केलेला ‘इव्हेन्ट’ कितपत प्रेक्षणीय वाटतो, ते मला जरूर कळवा.

क्रिकेट फ्लॅशबॅक हे सदर दररोज जरुर वाचा……

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..