नवीन लेखन...

प्रेम काय काय करायला लावते?

एक होता तो आणि एक ती
त्याला ती एका पार्टीत भेटली.
खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.
ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा, आर. के. लक्ष्मणच्या ‘कॉमनमॅन’ सारखा.
त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच!
तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,
“तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?”
तिला ‘नाही’ म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, ‘हो’ म्हणावसं वाटलं.
ती “हो” म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं.
या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली.
कॉफीची ऑर्डर दिली.
पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता.
आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली.
झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला.
त्यानं वेटरला हाक मारली.
वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला.
तो म्हणाला, ‘थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!’
सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं.
विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.
तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना – “कैसे कैसे लोग आते है!” अशा अर्थाचा चेहराही केला.
त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला!
ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ!
अखेरीस तिनं विचारलंच “पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?””माझं लहानपण समुद्रकाठी गेलं…” शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला…
“सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.
आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.
खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते…” भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं – त्याच्या निरागसतेनं.
किती हळुवार होतं त्याचं मन.
मग तीही बोलली… आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल… तिच्या स्वप्नांबद्दल… खरचं खुप छान डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी.
तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं!
चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.
एखाद्या परीकथेसारखे.
खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं.
ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा!
आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही.
एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी…
काही दिवसांनी ती सावरली.
रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.
त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
“माझ्या प्रिये, मला माफ कर!
आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो… पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही…
केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती!
त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे.
आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं…
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती!
पण मला तु खुप आवडतेस…
आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो…
…आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही!
प्लीज – मला माफ करशील?”

प्रा. हितेशकुमार पटले
About प्रा. हितेशकुमार पटले 15 Articles
प्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..