नवीन लेखन...

प्रभावी नेतृत्त्व की अपरिहार्यता ?

 सोनिया गांधी चौथ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. यात त्यांचे मोठेपण सामावल्याचे पक्षातील अनेक नेतेमंडळी सांगतात. पण, त्या मोठ्या सामाजिक कार्यातून किवा राजकीय परंपरेतून पुढे आलेल्या अभ्यासू नेत्या नाहीत. शिवाय आता नेहरू घराण्याची परंपरा सांगण्याशिवाय कोणताही जमेचा मुद्दा उरला नसल्याने काँग्रेसला सोनियाजींच्या आधारावरच मते मागता येणार आहे. त्यामुळे सोनियांची मक्तेदारी निर्माण होत आहे.

कोणत्याही पक्षाचा नेता त्या पक्षाला पुढे नेणारा, त्यातील सार्‍यांना विश्वासात घेणारा असावा अशी अपेक्षा असते. शिवाय काही खास नेतृत्त्वगुणही त्या व्यक्तीच्या अंगी असावे लागतात. शिवाय पक्षावर एकाच व्यक्तीची किवा घराण्याची सत्ता कायम राहू नये यासाठी अधूनमधुन नेतृत्त्वबदल केले जातात. असे बदल पक्षाच्या वाटचालीच्या किवा अन्य बाबींसाठी महत्त्वाचे ठरतात. पण, अलीकडे राजकारणात घराणेशाहीचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसते. त्यातून विशिष्ट पदे आपल्या घराण्यातच कायम रहावीत असा आग्रही धरला जातो. त्याचबरोबर नेत्यांची प्रमाणाबाहेर हुजरेगिरी केली जाते. तसेच त्यांच्या उदोउदोही केला जातो. हे सारे चित्र पाहिले की, या लोकशाही देशाच्या भवितव्याविषयी चिंता भेडसावू लागते. किबहुना, लोकशाही म्हणजे नेमके काय, याचे आकलन येथील जनतेला झाले आहे का, असा प्रश्न पडतो. या लोकशाही देशात खर्‍या अर्थाने परिपक्व म्हणता येईल अशी लोकशाही रुजवायची असेल तर लोकांची मनोवृत्ती नेमकी कशी असायला हवी, या प्रश्नाने अनेक विचारवंतही सचित झालेले दिसतात. हे वास्तव आहे. कारण दर

पाच वर्षांनी मतदान करणे एवढी एक गोष्ट वगळता भारतीय जनतेचे सारे वर्तन, चितन आणि मनोवृत्ती या बाबी लोकशाहीशी विसंगत आहेत. एवढेच नव्हे तर सध्या काँग्रेस पक्षातील डॉ. मनमोहनसिग यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि अन्य सर्व उच्चविद्याविभूषित केंद्रीय मंत्रीसुद्धा सोनिया गांधी यांचा ज्या प्रकारे उदो उदो करतात तो पाहिला म्हणजे आपल्याला खरेच

लोकशाही कळली आहे का, असा

प्रश्न मनात दाटून येतो. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांची चौथ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. एका देशव्यापी पक्षाला सोनिया गांधी यांच्याशिवाय दुसरा नेताच सापडत नाही हे त्या पक्षाचे आणि सोनिया गांधी यांचे मोठे अपयश असल्याचे या लोकांच्या लक्षात येत नाही. उलट लोकशाहीशी विसंगत अशी ही निवड होताना हे नेते सोनिया गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी रांगा लावून उभे रहात आहेत.

केवळ काँग्रेस नव्हे तर सर्वच पक्षांमध्ये नेत्याच्या उदोउदोचा गजर सतत होत आला आहे. त्यामुळे सोनिया गांधी चौथ्यांदा अध्यक्ष झाल्या, हा जणू विक्रम आहे आणि सलग चौथ्यांदा अध्यक्ष होऊन काही तरी मोठा पराक्रम करत आहेत किवा हे त्यांच्या दिव्य नेतृत्व शक्तीचे प्रतिक आहे असे भासवण्याचा काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. परंतु सोनियांचे हे चौथे अध्यक्षपद काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वहिनतेवर शिक्कामोर्तब करणारे आहे. अर्थात याचा कोणीही अंतर्मुख होऊन विचार करायला तयार नाही. खुद्द काँग्रेस पक्षाच्या घटनेतच कोणीही सलग दोनपेक्षा जास्त वेळा अध्यक्ष होऊ शकत नाही असे म्हटले आहे. परंतु, तो नियम सोनिया गांधी यांच्यासाठी अपवाद ठरवण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने राजीव गांधी यांच्या हत्त्येनंतर नरसिंह राव यांचे नेतृत्व स्वीकारले होते. लालबहादूर शास्त्री यांचा दीड वर्षांचा कालावधी वगळता आजवर काँग्रेस पक्षावर आणि देशावर गांधी घराण्याचेच वर्चस्व कायम राहिले होते. त्यामुळे नरसिंह राव यांच्या रुपाने पहिल्यांदाच नेहरू घराण्याबाहेरचा नेता काँग्रेसने स्वीकारला होता.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसला नेहरू घराणेच सत्ता मिळवून देऊ शकते, असा भ्रम तयार करण्यात आला आहे. खरे म्हणजे काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली 1977 मध्ये आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली 1989 मध्ये सत्ता गमावली होती. परंतु 1996 मध्ये नरसिंह राव यांच्याही नेतृत्वाखालील सत्ता गमावली गेली तेव्हा आता नेहरू घराण्याचा वारसच आवश्यक आहे, असे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना वाटू लागले. त्यातून या पक्षाच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांचे नेतृत्व स्वीकारले. सोनिया गांधी यांच्या सुदैवाने भारतीय जनता पार्टीला जनमानसात आपले स्थान पक्के करता आले नाही म्हणून 2004 मध्ये कशीबशी का होईना पण काँग्रेसला सत्ता मिळाली. त्यामुळे यापुढे काँग्रेस पक्ष सोनिया गांधी यांच्याच नेतृत्त्वाखाली कार्यरत राहील, असा निर्णय या पक्षाने घेतला. या पार्श्वभूमीवर आजवर कायदा काहीही म्हणो, काँग्रेसची घटना काहीही म्हणो पण सोनिया गांधी अध्यक्ष राहिल्या आणि आता चौथ्यांदा त्याच पुन्हा पक्षाध्यक्षपदी विराजमान झाल्या. सोनिया गांधी या काही मोठ्या सामाजिक कार्यातून किवा राजकीय परंपरेतून पुढे आलेल्या, अभ्यासू वगैरे नेत्या नाहीत. त्या राजीव गांधींची पत्नी या एकाच पात्रतेवर, अपघाताने काँग्रेसच्या नेत्या झाल्या आहेत. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडे आता नेहरू घराण्याची परंपरा याशिवाय कोणताही जमेचा मुद्दा उरला नसल्यामुळे या पक्षाला जे काही भवितव्य आहे ते याच एका मुद्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांची मक्तेदारी आपसुकच निर्माण झाली आहे.

योगायोगाने काँग्रेसला सोनियांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता मिळाली खरी, परंतु देशाला मोठे नेतृत्त्व देण्यात आणि भविष्यात वाटचाल करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात सोनिया गांधी यांचा वाटा किती हा प्रश्नच आहे. कारण अशी सारी कामे मनमोहनसिग करत आहेत आणि त्यातून सोनिया गांधी या तशा सामान्य वकुबाच्या आहेत हे वारंवार दिसत आहे. वास्तविक पाहता सोनिया गांधी यांच्याऐवजी एखादा नवा अध्यक्ष या पक्षाने द्यायला हवा होता. सोनिया गांधी आपल्या पदावर टिकण्यात आणि आपल्यामुळेच सारे काही चालले आहे हे भासवण्यात यशस्वी झाल्या आहेत. परंतु जाणकारांना त्यांच्या नेतृत्त्वाच्या मर्यादा प्रखरपणे लक्षात येत असतात.

वास्तविक, नेतृत्वाची खरी कसोटी

एखाद्या पदावर टिकणे ही नसते तर आपल्या पाठीमागे पक्षाची, देशाची धुरा सांभाळणारे

नेते निर्माण करण्यात असते. त्यात सोनिया गांधी अपयशी ठरल्या आहेत हे मात्र नक्की. पण, एकूण परिस्थिती पाहता या संदर्भात पक्षांतर्गत पातळीवर किवा जनतेतून विचार केला जाईल अशी तूर्तास शक्यता दिसत नाही. याचे कारण आता हळूहळू राहूल गांधी यांना पक्ष नेतृत्त्वाच्या दिशेने पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आजवरचा इतिहास पाहता येत्या काही वर्षात ते काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यास आश्चर्य वाटायला नको. म्हणजे काँग्रेसमधील पक्षाध्यक्षपदातील घराणेशाहीची परंपरा आणखी काही वर्ष सुरू राहण्याचे संकेत आहेत. म्हणजेच या पक्षातील एकाधिकारशाहीला धक्का पोहोचवला जाणार नाही हे उघड आहे.

(अद्वैत फीचर्स)

— मनोज मनोहर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..