नवीन लेखन...

प्रदूषणाचा नरकासूर

दिवाळी अजून यायची आहे. पण त्यापूर्वीच्या गणपती आणि नवरात्राच्या प्रदूषणाचे दोन बळी माझ्याकडे औषधाला आले. एक पस्तीस वर्षाचा तरुण, दिवसभर गणपतीच्या मंडपात बसला होता. डाव्या बाजूला ढणाणा स्पीकर चालू होता. दुसऱ्या दिवशी कळलं की त्या कानानं ऐकू येत नाहीये. तपासण्या वगैरे झाल्या. डॉक्टरांनी हात टेकलेत. दुसरा तीस वर्षाचा तरुण. देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत दहाहजार फटाक्यांची माळ यानंच लावली. दुसऱ्या दिवशी दम लागून थेट ICU मध्ये दाखल झाला. तिथून सुटल्यावर स्टिरॉईड्स च्या जाचातून सुटण्यासाठी माझ्याकडे आला.

तिसरी एक घटना गावाकडे घडलेली. एक पंचविशीचा परिचित युवक. नुकताच तापातून उठला होता. थोडा अशक्तपणा बाकी होता. सार्वजनिक गणपतीला गेला. तिथे DJ सुरु होता. अर्ध्या तासानं कुणालातरी ‘निघतो’ म्हणून सांगून देवापुढे डोकं टेकलं ते कायमचंच. ‘DJ जन्य हार्ट अॅटॅक’ असं त्याचं निदान तिथल्या डॉक्टरांनी केलं म्हणे.

मनुष्यकृत वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा विळखा हा असा वाढत चालला आहे. फटाके, DJ यांचं लोण पूर्वी फक्त शहरात होतं. आता खेड्यातली आरोग्यदायी शांतता नष्ट करत यांनी तिथे देखील धुमाकूळ घातला आहे.

मुळात प्रदूषण म्हणजे काय तर जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणं.

ध्वनी मोजण्याच्या मापाला “डेसिबल” म्हणतात. साधारणपणे १० – ५० डेसिबल्स चा ध्वनी आपल्याला व्यवस्थित त्रास न होता ऎकु येतो. या मर्यादेवरील आवाज आपल्याला नकोसा वाटतो. ऊदाहरणार्थ जोरात बोलणं – ६० डेसिबल्स; टि.व्ही/ रेडीयोचा मोठा आवाज ७० ते ७५ डेसिबल्स; प्रेशर कुकरची शिट्टी ७५ डेसिबल्स; वाहनांचे होर्न ७५ ते ८० डेसिबल्स; विमान उडताना ११० ते १२० डेसिबल्स आवाज निर्माण करतात. ध्वनिक्षेपकांचा आवाज तर यापेक्षा कितीतरी जास्त असतो. म्हणजे कानांवर किती अत्याचार!
ध्वनी प्रदुषण करणारे घरातले आवाज, औद्योगिक क्षेत्रातले आवाज, वाहनांचे आवाज- यातले कुठलेही ध्वनी आपल्याला टाळता येत नाहीत कारण ते जीवनावश्यक कामातून निर्माण होतात. पण आपण त्यात फटाके आणि ध्वनिप्रक्षेपक या अनावश्यक/ टाळता येण्यासारख्या गोष्टींची भर घातली आहे. झाडाला मिठी मारून , “झाड मला सोडत नाही” म्हणणाऱ्या शेखचिल्लीसारखी आपली गत झाली आहे.

ध्वनिप्रदूषणामुळं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळं शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचं मानसिक संतुलन बिघडतं, तो भांडखोर होतो. ध्वनिप्रदूषणामुळं रक्तदाब वाढतो. कारखान्यांत मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना म्हातारपणी बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. प्राणी आणि पक्षी यांच्या कित्येक प्रजाती मनुष्यकृत मोठ्या आवाजानं नष्ट झाल्या आहेत.

वायुप्रदूषणाचे सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतात. विविध प्रदूषक घटक थेट श्वसनव्यस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसं कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर, तो विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती होते व त्यामुळे कफाचे आजार. हे आजार जुने झाले की जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणाऱ्या हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी; हवेतला वाढलेला . कार्बन मोनॉक्साईड मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटं सातत्यानं संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो.
कुठल्याही इंद्रियांचा अति वापर हे आयुर्वेदात देखील रोगांचं कारण सांगितलं आहे.

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे फटाक्यांचं प्रदूषण झाडं लावून कमी होऊ शकत नाही. फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडं वा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो. कागद, लाकडे, काडीकचरा जाळला तर त्यातून फक्त कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो, जो वायू झाडांचं अन्न आहे. त्यामुळं भरपूर झाडं लावली की हे प्रदूषण कमी होऊ शकतं. प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन करतच असतो. या प्रदूषणातून आपल्याला झाडंच सोडवतात.. मात्र फटाक्यांच्या ज्वलनात सल्फर व कार्बन युक्त अनेक विषारी वायू आणि धातू तयार होतात. आवाज न करणारे शोभेचे फटाके तर जास्त विषारी वायू निर्माण करतात. दुर्दैवानं कुठल्याही फटाक्यांनी तयार केलेले विषारी वायू शोषण्याची क्षमता झाडांमध्ये नाही. म्हणूनच फटाक्यांना ‘नाही’ म्हणण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.

फटाके अन डीजे, हे नव्हे प्रतिक धर्माचे |
हे शोध परक्यांचे, ते ही काल परवाचे ||
धर्म म्हणजे स्मरण नित्य ईश्वराचे |
ठेवावे ते भान सकलांच्या आरोग्याचे ||

© वैद्य सुचित्रा कुलकर्णी. M. D. आयुर्वेद, B. अ. योगशास्त्र (सुवर्णपदक)

लेखिका, व्याख्यात्या, समुपदेशक, संपादक, आयुर्वेद व योग सल्लागार.
‘ओवीआरोग्याची’ दैनिक गोमंतक- दिनांक १७ ऑक्टो २०१६

— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..