नादानपणाची मर्यादा

रविवार: २ डिसेंबर २०१२

नद्या विकल्या जात आहेत, जमिनीची उत्पादकक्षमता स्वत:च्या हाताने संपविली जात आहे, आपण खात असलेल्या अन्नात रासायनिक खताच्या माध्यमातून विष मिसळलेले आहे, हे माहीत असूनही आनंदाने आपण ते ग्रहण करीत आहोत; मात्र आपण काही चूक करीत आहोत किंवा कोणी आपल्याला जागवत आहे, याची जाणीवच आपण हरवून बसलो आहोत. आपल्या संवेदनाच संपल्या आहेत.

प्रत्येक कालखंडात काही विशिष्ट शब्दांना अत्याधिक महत्त्व प्राप्त होत असते. हा कालखंड काही वर्षांचा, दशकांचा किंवा त्यापेक्षाही प्रदीर्घ असू शकतो. सध्या “जागतिकीकरण” हा शब्द असेच महत्त्व बाळगून आहे. शब्द गोंडस असला, संपूर्ण जगाला एका सूत्रात बांधण्याची व्यापक संकल्पना त्यातून प्रकट होत असली तरी त्याचे हे वरकरणी दर्शन फारच फसवे आहे. जागतिकीकरणाच्या नावाखाली सध्या जे काही केले जात आहे, ते बघता जग हे काही भांडवलशाही देशांपुरते मर्यादित झाल्यासारखे वाटते. केवळ काही देशांनी आपल्या आर्थिक स्वार्थासाठी संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे आणि दुर्दैवाने जगातील बहुतेक सर्वच राष्ट्र त्यांच्या या कटाला बळी पडत आहेत. जागतिकीकरणाच्या सोबत अनिवार्यपणे येणार्‍या व्यापारीकरण या शब्दाने आता खर्‍या अर्थाने रंग दाखवायला सुरुवात केली आहे.

एकमेकांची गरज भागविणे हा व्यापाराचा मूलभूत सिध्दांत किंवा पाया. माझ्याकडे जे आहे ते मी तुला देणार आणि त्या बदल्यात माझ्याकडे जे नाही ते तू मला द्यावे, असे साधे – सरळ गृहितक व्यापारात असते; परंतु इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे व्यापारातसुध्दा मानवी स्वभावाच्या विकृतीने प्रवेश केला आणि आधुनिक काळात तर त्याने चरमसिमा गाठली. आता व्यापाराचे सूत्र “माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच” असे झाले आहे. इतर कोणत्याही शस्त्रापेक्षा व्यापार हे सर्वाधिक प्रभावी शस्त्र ठरू शकते, हे चाणाक्ष साम्राज्यवाद्यांनी फार पूर्वीच ओळखले आणि त्याचा बेमालूम वापर सुरू केला. तलवारीपेक्षा तराजूच्या माध्यमातून आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे त्यांना अधिक सोयीचे वाटले आणि तसे ते होतेसुध्दा. मर्यादित मनुष्यबळ आणि सैन्यबळ असताना एखाद्या देशावर दीर्घकाळ सत्ता गाजविणे, त्याचे शोषण करणे शक्यच नव्हते. दुसरा काहीतरी पर्याय शोधणे भाग होतेच आणि हा दुसरा पर्याय व्यापारापेक्षा अधिक चांगला कोणता असू शकला असता? या व्यापाराच्या माध्यमातून अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजाच वेठीस धरता येतात आणि त्यायोगे शोषितांची प्रतिकारशक्तीच नष्ट करता येते; या तत्त्वाचा सर्वप्रथम आणि सर्वाधिक प्रभावीपणे वापर केला तो ब्रिटिशांनी! संख्येने मूठभर असलेल्या या गोर्‍यांनी खंडप्राय हिंदुस्थानसह अर्ध्या जगावर जवळपास दोन शतके अनिर्बंध राज्य केले, ते याच तत्त्वाला अनुसरून. अन्य काही कारणाने किंवा दुसर्‍या महायुध्दामुळे ब्रिटिशांना आपले साम्राज्य आवरते घ्यावे लागले असले, तरी तो त्यांचा लष्करी पराभव होता, हे विसरता येणार नाही. या लष्करी पराभवाने त्यांची प्रत्यक्ष सत्ता संपुष्टात आणली तरी व्यापाराचे शस्त्र त्यांनी कधीच म्यान केले नव्हते. दुसर्‍या महायुध्दानंतर अमेरिकेसारखा दुसरा दमदार भांडवलदार व्यापारी जगाच्या क्षितिजावर उगवला. बेरकीपणाला व्यवहारकौशल्याची जोड मिळाली. इतर काही लुटारूही त्यांना सामील झाले आणि मग सुरू झाला व्यापार व जागतिकीकरणाच्या नावाखाली साम्राज्यशाहीचा नवा अध्याय! अधिकाधिक भूप्रदेश आपल्या टाचेखाली आणून येनकेनप्रकारे आपल्या तुंबड्या भरणे हा एककलमी मंत्र या आधुनिक साम्राज्यशहांनी आळवायला सुरुवात केली, असे करताना कुठलाही विधिनिषेध वगैरे पाळण्याची गरज त्यांना भासली नाही. त्यांच्या लेखी जगात प्रत्येक वस्तूला एक किंमत असते आणि प्रत्येक वस्तू विकली जाऊ शकते किंवा विकत घेतल्या जाऊ शकतात. किंमत आणि मूल्य या दोन्ही संकल्पना त्यांच्या दृष्टीने सारख्याच. संस्कृतीचा वारसा वगैरे प्रकार त्यांच्याकडे नाहीच. त्यामुळे तत्त्व, श्रध्दा, मूल्य आदी शब्द किंवा संकल्पना त्यांना कधी शिवल्याच नाहीत. श्रीमंत होणे, अधिक श्रीमंत होणे, अत्याधिक श्रीमंत होणे आणि या श्रीमंतीच्या माध्यमातून भौतिक सुखाचा यथेच्छ उपभोग घेणे, हाच या लोकांचा पुरुषार्थ! जीवनाच्या चारही आश्रमांचे हेच एक ध्येय! ही ध्येयपूर्ती करण्यासाठी नवनवीन देश, नवनवीन भूभाग अंकीत करणे त्यांना भाग होते आणि व्यापार हे माध्यम त्यासाठी सर्वाधिक उपयुक्त होते. आपला देश त्यांच्या या कुटिल कारस्थानाला तत्काळ बळी पडला. ज्या नदीला आपण मातेच्या स्थानी मानतो, त्या नद्या विकायला आपण तयार झालो. त्यांनी दाखविलेल्या हिरव्यागार “भरघोस” स्वप्नाला भुलून आपण आपल्या शेतीची, काळ्या आईची पार दुर्दशा करून टाकली. जमिनीतील जैविक संपदा नष्ट झाली. पाणी धरून ठेवण्याची तिची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. जमिनीचा कस टिकवून ठेवणारे सूक्ष्म जीवाणू नष्ट झाले. रासायनिक खतांमुळे हवेतील आर्द्रता कमी झाली. एकंदरीत नदी किंवा जल आणि भूमी किंवा अन्नच आपण पाश्चात्त्यांकडे गहाण टाकले. पाश्चिमात्य व्यापार्‍यांनी ज्यावेळी आपला फास आमच्याभोवती आवळायला सुरुवात केली होती, त्यावेळी कोणालाच त्याची जाणीव झाली नव्हती. जे काही थोडे फार क्षीण आवाज उठले होते ते जागतिकीकरणाचे स्वागत करणार्‍यांच्या आरोळ्यात कुठल्या कुठे दडपले गेले आणि दुर्दैवाची बाब ही आहे, की हा फास आपला जीव घेणार आहे, हे कळूनसुध्दा त्या आधीच्या मूठभर क्षीण आवाजवाल्यांना साथ द्यायला आजही कोणी तयार नाही.

नद्या विकल्या जात आहेत, जमिनीची उत्पादकक्षमता स्वत:च्या हाताने संपविली जात आहे, आपण खात असलेल्या अन्नात रासायनिक खताच्या माध्यमातून विष मिसळलेले आहे, हे माहीत असूनही आनंदाने आपण ते ग्रहण करीत आहोत; मात्र आपण काही चूक करीत आहोत किंवा कोणी आपल्याला जागवत आहे, याची जाणीवच आपण हरवून बसलो आहोत. आपल्या संवेदनाच संपल्या आहेत. कुठे अन्याय होतो, कुठे अपमान होतो, कुठे पिळवणूक होते, स्वातंत्रवीर सावरकरांसारख्या आद्य क्रांतिकारकाची खिल्ली उडविली जाते आणि आम्ही थंड, निस्तेज डोळ्यांनी तो सगळा तमाशा पाहतो, लाचारपणे हसतो आणि तितक्याच निलाजरेपणाने टाळ्या वाजवतो. या अशा मुर्दाड, निसत्त्व आणि स्वाभिमान गमाविलेल्या मानसिकतेमुळेच आपण वारंवार बाह्य आक्रमणाला बळी पडत आलो आहोत. मग ते आक्रमण कधी तलवारीच्या माध्यमातून झालेले असो अथवा कधी तराजूच्या. तामिळनाडू किंवा छत्तीसगडमधील नद्या विकण्याचा प्रकार आपल्या याच कणाहीन निर्बुध्दतेचे लक्षण आहे. या नद्यांमधील पाणी आपण १.३७ रु. लिटर दराने विकणार आणि विदेशी कंपन्या तेच पाणी आपल्याला कचकड्याच्या बाटल्यांतून १२ रुपये लिटर दराने पुरविणार! बाटलीबंद पाणी पिण्यातून प्रगट होणार्‍या कथित प्रतिष्ठेसाठी आपण किती किंमत मोजत आहोत, याचा कधी कोणी विचार केला का? हे जर असेच सुरू राहिले तर एकदिवस आपल्याला श्वासदेखील विदेशी कंपन्यांना पैसे मोजून विकत घ्यावे लागतील आणि मला खात्री आहे, तेव्हादेखील खूप पूर्वी उठलेले ते क्षीण आवाज तितकेच क्षीण राहतील, त्यांना तेव्हादेखील कोणीच साथ देणार नाही.

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…