नवीन लेखन...

त्याचे वेगळेपण…

मनुष्याचा स्वार्थी स्वभाव काही आजचा नाही तो प्रत्येक युगात स्पष्टणे दिसत आलेला आहे अगदी रामायण, महाभारत ते सध्याच्या कलियुगापर्यत. कधी- कधी तर असे वाटते की माणूस हा मुळातच एक स्वार्थी प्राणी आहे. इतर प्राण्यात तो स्वार्थीपणा दिसत नाही कारण ते निसर्गाच्या अधीन आहेत. पण माणूस हा असा प्राणी आहे ज्याने नेहमीच निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न लाखो वर्षापूर्वीही केला आहे आणि आजही करत आहे. त्याची आज अनेक उदाहरणे समाजात दिसत आहेत.

त्यातील सर्वात मोठी कुरघोडी म्हणजे लिंगबदल शस्त्रक्रिया… त्याचे समर्थन करताना काही महाभाग महाभारतातील श्रीखंडीचे उदाहरण देतात. पण त्यांना हे कळत नाही. श्रींखडीनी स्त्रीची पुरुष तिच्यात पुरुषाच्या लैंगिक भावना होत्या म्हणून झाली नव्हती तर आपला बदला घेण्यासाठी झालेली होती.

समजात आज जो लैंगिक स्वैराचार बोकाळलाआहे त्याचे समर्थन आणि विरोधही आजचा समाज आपल्या सोयीप्रमाणे करताना दिसत आहे. म्हणजे एकीकडे मोकळ्या लैगिंक संबंधांचे समर्थन करायचे आणि दुसरीकडे बलात्कार्‍यांना फाशी द्या म्हणून आंदोलने करायची ! समाजात अनैतिकता पसरविण्यास खतपाणी घालायचे आणि दुसरीकडे समजाकडून नैतिकतेची अपेक्षाही करायची ! एकीकडे स्त्री- पुरुष समानतेचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे पुरुषांकडून स्त्रियांच्या प्रती चांगुलपणाची अपेक्षा करायची.

नात्यांचेही तसेच आहे. मनुष्य त्याच्या प्रत्येक नात्यातून त्याला काही तरी त्याच्या फायद्याचे मिळावे असा स्वार्थी विचार करत असतो. ह्याला कोणतेही नाते दुर्दैवाने अपवाद नाही ! याचा अनुभव विजयला अगदी लहानपणापासून आलेला होता. आजही येत आहे पण यालाही कोणीतरी अपवाद असेल असे विजयला नेहमी वाटत होते. पण आता त्याला कळून चुकले होते याला कोणीही अपवाद नाही. अगदी तो स्वत:ही !

कारण कधी ना कधी त्यालाही त्याच्यासाठी – स्वत:साठी एखादा स्वार्थी विचार हा करावाच लागणार होता. हा ! तो जगापेक्षा वेगळा आहे. जगापेक्षा वेगळा विचार करतो पण जग त्याच्यासारखे अजिबात नाही ! त्याच्यासारखा निस्वार्थ विचार करत नाही. तसा निस्वार्थ विचार करणारे तुकाराम महारांजांसारखे लोक संत म्हणून गणले गेले जे शेकडो वर्षानंतर करोडो लोकांमध्ये एखादे जन्माला येतात.

काही दिवसापुर्वी विजयची आत्या त्याच्या घरी तिच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यामुळे काही दिवस राहायला आलेली होती. विजयला त्याची ही आत्या फारच भावते कारण ती ही विजयसारखी कोणाच्या आयुष्यात फारशी ढवळाढवळ करत नाही आणि कोणाला आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करू देत नाही.

विजयच्या नात्यातील सर्वच त्याला त्याच्या लग्न न करण्याबद्दल विचारतात पण ती आत्या कधीच काही विचारत नाही. ती अतिशय विचारी शांत आणि वास्तववादी विचार करणारी स्त्री आहे. ती ही विजयसारखीच कधीच कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. नात्यात फार गुंतून पडत नाही. ती पुर्वीपासूनच गावी राहात असल्यामुळे तिचे मुंबईला येणे फारच कमी होते. विजय त्याच्या त्या आत्याच्या गावच्या घरी त्याच्या वयाच्या चाळीशीत पहिल्यांदा गेला होता. आताही तिचे मुंबईला येणे डोळ्यांच्या ऑपरेशनच्या निमित्ताने झाले होते. विजयला खरेतर कौटुंबिक संपत्ती, मालमत्ता, जमीन -जुमला, झाडे – माडे, बंगले – गाड्या आणि दागदागिने या विषयांवर चर्चा करायला अजिबात आवडत नाही कारण त्याला या सर्व गोष्टींचा मोह कधीच नव्हता. पण आज समाजात तुमच्याकडे असलेल्या ज्ञानापेक्षा, चांगुलपणापेक्षा समजाप्रती तुमच्या असणार्‍या उदारमतवादी विचारांपेक्षा तुमच्याकडे असलेल्या संपत्तीवरून समाजातील तुमची पत दुर्दैवाने ठरते. ह्याचे विजयला नेहमीच वाईट वाटत असते, पण हे बदलणे आता कोणाच्याच हातात राहिलेले नाही याची खात्री त्याला तेंव्हा पटली जेंव्हा त्याचे त्याच्या काकाबाबतचे मत बदलेले, माणूस मुळातच स्वभावत: स्वार्थीप्राणी अहे पण तो इतकाही स्वार्थी होऊ शकतो याची त्याला नव्याने खात्री पटली. त्याबद्दल तो त्याच्या काकाला दोष देत नाही. तो त्याच्या स्वार्थी मनुष्यस्वभावाप्रमाणेच वागला होता. तसे वागणारा तो काही पहिला माणूस नव्हता पण विजयच्या आयुष्यात असणार्‍या स्वार्थी माणसांमध्ये आणखी एका माणसाची भर पडलेली होती. जी त्याला अपेक्षित नव्हती.

विजय नेहमीसारखा एकटाच बसून बेडरुमध्ये मोबाईलवर काहीबाई पाहण्यात गुंग होता. विजयचे कान जन्मताच तिक्ष्ण आहेत. त्यामुळे हॉलमध्ये सुरुअसलेला कोणाचाही संवाद त्याला बेडरुममध्ये अगदी स्पष्ट ऐकू येत होता. एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची त्याला निसर्गता देणगी लाभलेली आहे. तो कोणाच्या संवादात भाग घेत नाही, मध्ये बोलत नाही पण लोकांच्यात चाललेला संवाद कान देऊन ऐकण्याची मात्र त्याला सवय आहे कारण तो त्याचा अभ्यासाचा भाग आहे, असो ! विजयची आत्या गावावरून आल्यामुळे विजयचे आई- वडील त्याचा लहान भाऊ यांच्यात गावच्या घर – जमीन यावर संवाद सुरु होता. तेंव्हा विजयला यापुर्वी माहीत नसलेली त्याला कोणीही न सांगितलेली एक गोष्ट नव्याने कळली. ती म्हणजे त्याच्या काकाने जो त्याच्या गावी राहतो आणि गावातील जमीन – जुमला सांभाळतो. जो त्याचा आणि विजयच्या वडिलांचा वडिलोपार्जित आहे. विजयचे वडिल वयाच्या पंदराव्या – सोळाव्या वर्षीच कामाच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर मुंबईत राहण्याची सोय नसल्यामुळे त्यांनी अनेक हॉटेलात काम केले . पुढे लग्न झाल्यावर अनेक छोटे- मोठे व्यावसाय करत भाड्याच्या घरात दिवस काढले चार मुलांचा जन्म झाल्यावर त्यांनी मुंबईत एक जागा विकत घेतली जिचे पैसेही त्यांनी हप्त्या- हप्त्याने दिले. त्या जागेत एक कुडाची झोपडी बांधली. पुढे ती झोपडी क्रमाक्रमाणे सुधारली. त्या झोपडीचे पक्के घर करण्यासाठी त्याच्या आईने तिचे मंगळसुत्रही गहाण ठेवले जे पुढे कधी सोडवताही आले नाही. त्या घरात विजयच्या कुटुंबाने चटणी – भाकर खाऊन दिवस काढले पण विजयच्या त्या काकाकडे कधी गावच्या उत्पन्नातील हिस्सा मागितला नाही. की कधी त्याने तो दिला नाही. ना त्याच्या डोक्यात गावची जमीन विकण्याचा विचार कधी आला. त्याच्या लग्नात विजयच्या बाबांनी काढलेले पतपेढीचे कर्ज पुढे बर्‍याच वर्षांनी विजयने काम करून फेडले होते. पण विजय कधीच त्याबद्द्ल एका वाक्याने कोणाला काही बोलला नव्हता. त्याच्या मुलांनाही विजयच्या बाबांनी त्यांच्या घरात त्यांची लग्ने होईपर्यत आसरा दिला. विजयच्या बाबांनी आणि लहान भावाने त्याच्याकडून कमीत कमी आर्थिक मदत घेऊन गावाला मोठे घर बांधले त्यातील आर्धा हिस्साही त्याच्या नावावर करून दिला. त्याला वेळोवेळी आर्थिक मदत केली असतानाही त्या कृतघ्न माणसाने विजयच्या बाबांनी आता तो गावच्या जमिनीत शेती करत नसल्यामुळे पुढे जमिनीच्या हिस्स्यावरून वाद होऊ नये म्हणून जमीनीची वाटणी करून घेऊया असे म्हटल्यावर त्याने त्याच्या ओळखीच्या एका वकीलाकडे त्याला विजयच्या बाबांच्या मुंबईतील घरात हिस्सा मागता येईल का? म्हणून चौकशी केली. कारण विजयचे घर आता एस. आर. ए. मध्ये गेल्यामुळे त्याला एका टॉवरमध्ये फ्लॅट मिळालेला होता. ज्याचे बाजार मूल्य आज लाखो रुपयांमध्ये होते. पण ते घर टिकविण्यासाठी विजयच्या कुटुंबाने प्रसंगी पोटालाही चिमटा काढलेला होता. अनेक हाल-अपेष्टा सहन केल्या होत्या. त्या घरा व्यतिरिक्त त्यांना दुसरे घरही विकत घेता आलेले नव्हते. त्या विरुद्ध त्याच्या काकाने गावात राहूनही सुखाचेच आयुष्य व्यतीत केलेले होते. चाळीस वर्षे गावात राहून जमीन असतानाही साधी एक बागही फुलवणे त्याला जमले नव्हते की जमीनीचा स्वत:च्या मालकीचा एक तुकडाही विकत घ्यायला जमले नव्हते. आता गावतील सर्व जमीन – जुमलाही त्याला त्याच्या नावावर करून हवा होता. म्हणजे विजयच्या कुटुंबाने त्यांच्याच गावात उपरे व्हायचे होते का? पण आपल्या भावाच्या घराची किंमत आजा लाखो रुपयात आहे हे कळल्यावर त्याच्यातील स्वार्थी प्राणी कोणताही सारासार विचार न करता एका क्षणात जागा झाला. त्याच्या भावाने त्याने चाळीस वर्षे सांभाळून घेतले हे तो अगदी सहज विसरला. ते ही त्या गोष्टीच्या मोहात जी त्याची कधीच नव्हती. विजयला व्यक्तीश: गावच्या संपत्तीत अजिबात रस नव्हता. पण गावाला आपले आपले गाव म्हणून हक्काचे आपल्या मालकीचे काहीतरी आपली ओळख सांगणारे असायलाच हवे ! असे नेहमी वाटायचे ! तो इतका उदारमतवादी होता की आपण लावलेल्या झाडाची फळे आपल्या नाही खाता आली तरी चालेल पण ती इतर कोणाला तरी खाता यावीत. पण विजयच्या या काकाने अनेक मोठमोठी फल झाडे काही पैशासाठी विकून खाल्ली.

आजही स्वत: न लावलेल्या झाडांची फले तो खात आहे. विजयला गावातील फळझाडातून मिळणार्‍या उत्पन्नात त्या फळात ती खाण्यात अजिबात रस नाही कारण विजयचा जसा त्याच्या भावभावनांवर ताबा आहे तसाच ताबा त्याच्या भौतिक गरजांवर आणि तोंडावरही आहे. त्याचा काका काहीही जगावेगळा वागलेला नसला तरी तो आता त्याच्या मनातून कायमचा उतरलेला होता. माणूस क्षणिक स्वार्थासाठी कधी – कधी आपले किती मोठे नुकसान करून घेतो हे त्याच्या लक्षातही येत नाही. आता विजय त्याला कोणतीही मदत डोळे झाकून करणार नव्हता. त्याच्या कोणत्याही कृतीचे समर्थन सहज करणार नव्हता.

त्याचे वागणे हे अज्ञानीपणाचे आणि मोहाधीन असले तरी विजय त्याला माफ करणार नव्हता. नव्हे अशा चुकांसाठी विजयने त्याच्या आयुष्यात कधीच कोणालाही माफ केलेले नव्हते. इतके वर्षे तो त्याच्या काकाचा मान राखून त्याच्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधातही बोलत नव्हता. तो त्याचा स्वभाव नसतानाही ! पण आता तो त्याच्या बाबतीत तसे काही करणार नव्हता. आता त्याला इतके दिवस विजयचा त्याने कधीही न पाहिलेला स्वभाव त्याला पाहावा लागणार होता. विजय प्रचंड हुशार असतानाही ! तो त्याची ती हुशारी त्याच्या वडिलधार्‍या व्यक्तींसमोर कधीही प्रकट करत नाही. कारण त्याला त्याच्या वडिलधार्‍या व्यक्तींचा अपमान करायचा नसतो. त्यामुळे तो त्यांच्याशी संवाद करणे अथवा वाद घालणे टाळत असतो. ज्याचा त्याच्या काकाने चुकीचा अर्थ घेतलेला आहे. त्याला नेहमी वाटत आले की विजयला गावचे काही कळत नाही. पण तो त्याचा गोड गैरसमज आहे. तसेही विजयच्याही मालकीचे असे काहीच नाही. त्यालाही भविष्यात जे काही मिळणार आहे ते त्याच्या वडिलोपर्जित संपत्तीतूनच ! त्याने तर त्याचे आयुष्य समजाचा विचार करण्यात घालविलेले होते. पण सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडील सगळेच गमावून बसणे हे गाढवपणाचे ठरते कारण या जगात निस्वार्थी माणसे फक्त नावाला उरलेली आहेत.

कोणाचा स्वार्थ कधी जागृत होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे याबाबतीत प्रत्येकाने सावध असणे आज गरजेचे झालेले आहे. विजयचाही त्याच्या कुटुंबातील व्यक्तींवर कितीही विश्वास असला तरी त्याला त्याच्या भविष्यातील उदरनिर्वाहाबाबत कोणावर अवलंबून राहणे अथवा त्या बाबतीत तडजोड करणे धोकादायक वाटू लागलेले आहे. एका अर्थी त्याच्या काकाच्या वागण्यातून त्याने एक नवीन बोधच घेतलेला होता. कोणत्याही माणसाने कोणत्याही नात्याच्या प्रती इतकाही उदारपणा दाखवू नये की भविष्यात त्यालाच दुसर्‍यांसमोर हात पसरण्याची वेळ यावी.

विजयच्या बाबांनी जर गावच्या जमीनीवरचा हक्क सोडला असता तर विजयला हक्काने एक तरी झाड लावता आले असते का? तर नाही. विजयच्या काकाने आयुष्यभर एकही नवीन झाड या स्वार्थी विचाराने लावले नाही की भविष्यात त्याला त्या झाडांचा हिस्सा आपल्या भावाला द्यावा लागेल. पण विजयला तो स्वार्थी विचार करायचाच नाही. त्याला अशी झाडे लावायची आहेत ज्याची फळे भविष्यात समाजाला चाखता येतील. आपण लावलेल्या झाडांची फळे आपल्याला खायला नाही मिळाली तरी ती भविष्यात कोणाला तरी खायला मिळतील असा निस्वार्थी विचार जो फक्त संतच करू शकतात तो विचार तो करू पाहत होता. तो विचार प्रत्येकाने केला असता तर जगात किती आनंदी – आनंद असता? पण तो दिवस कदाचित या जगात कधीच उजाडणार नाही. विजयला त्याच्या आयुष्यात निदान दोन – चार झाडे तरी लावायची आहेत ज्याची फळे भविष्यात कोणालातरी खाता येतील. विजयच्या काकाकडे विजयच्या रुपात त्याला भविष्यात फळ देणारे एक झाड होते पण ते झाड त्याने त्याच्या स्वार्थीपणामुळे मुळापासून तोडले होते. स्वार्थीपणा हा माणसात निसर्गत: आहे त्यामुळे तो कधी ना कधी उफाळून येणारच पण त्याला बुद्धीपुर्वक आवर घालायला माणसाने शिकायला हवे ! असे विजयला नेहमीच वाटत आले. त्यामुळेच त्याने कोणाला केलेल्या मदतीचा कधी हिशोब ठेवला नाही पण त्याने केलेल्या मदतीची ज्याला जाण नाही त्याला त्याने कधी माफही केले नाही… विजयच्या आयुष्यात स्वार्थी माणसे कालही सातत्याने येत होती आजही सातत्याने येत असतात तरीही तो मात्र आपला निस्वार्थीपणा सोडत नाही कारण त्याला त्याचे वेगळेपण कायमच टिकवून ठेवायचे आहे…या स्वार्थी जगात…

लेखक: निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 425 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..