डॉक्टर आजारी झालेत!!

मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हटले जाते. नव्हे तो समाजप्रिय प्राणी आहेच. आदिम काळातील रानटी अवस्थेपासून मनुष्यप्राण्याची ती स्वाभाविक गरज ठरत आली आहे. शत्रूच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेले प्राणी समूहाने वावरून आपली सुरक्षितता जोपासतात, हा निसर्गनियम आहे आणि मानव त्याला अपवाद नाही. ही सुरक्षितता जोपासताना एकमेकांना सहकार्य आणि आलेल्या संकटाचा सामूहिक मुकाबला केला जातो. प्रगत मानवात ही व्यवस्था समाजाच्या रूपाने अधिक विकसित झाली. परस्परांच्या सहकार्याने सुखी आणि समृध्द जीवन व्यतीत करणे सामाजिक व्यवस्थेचा पाया ठरला. इतर प्राण्यांमध्ये ही व्यवस्था प्राथमिक स्वरूपात असताना मानव प्राण्याने मात्र आपल्या बौध्दिक विकासाच्या जोरावर ही व्यवस्था चांगलीच सुदृढ केली. असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता मानव स्वत:च्या हाताने ही व्यवस्था उद्ध्वस्त करायला निघाला की काय, अशी साधार भीती वाटू लागली आहे. या व्यवस्थेचा पाया असलेली परस्पर सहकार्याची भावनाच आज नष्ट होताना दिसत आहे. कळप करून राहणाऱ्या इतर प्राण्यांच्या तुलनेत आपली समाज व्यवस्था अधिक बळकट करताना मानवाने वर्णांची निर्मिती केली. अर्थात, कालांतराने मानवानेच आपल्या स्वभाव-गुणामुळे या वर्णांना अतिशय विकृत करून टाकले असले तरी योग्यतेच्या आधारावर विशिष्ट लोकांकडे विशिष्ट काम सोपविण्याची वर्णव्यवस्थेतील मूळ विचारधारा अद्यापही टिकून आहे. त्यामुळेच अध्यापनाची जबाबदारी शिक्षक वर्गाकडे (की वर्णाकडे), शत्रूपासून रक्षण करण्याची सैनिकांकडे, समाजातील लोकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची डॉक्टर मंडळीकडे आणि या तसेच इतरही विशिष्ट काम करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्याची, ते आपल्या कर्तव्यात कसूर करत असतील तर समाजातील इतरांचे त्याकडे लक्ष वेधण्याची जबाबदारी पत्रकार-संपादक आदी मंडळीकडे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या सोपवल्या गेली आहे. परंतु आज जे चित्र दिसते ते अतिशय खेदजनक आणि दुर्दैवी आहे. सामाजिक स्वास्थ्य कायम टिकविण्याच्या दृष्टीने ज्या लोकांवर विशिष्ट आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवल्या गेली आहे त्यापैकी बहुतेकांनी आपल्या कर्तव्याला हक्काची आणि हक्काला पैशाची जोड देऊन समाज व्यवस्थाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालविला आहे (अपवाद सीमेवर दक्ष असलेल्या जवानांचा). पैशाच्या लोभापायी लोक आंधळे झाले आहेत. जनकल्याणासाठी अर्जित केलेली पात्रता किंवा बौध्दिक क्षमता स्वकल्याणासाठी वापरली जात आहे. मी समाजासाठी, देशासाठी हा सेवाभाव लोप पावून मी स्वत:साठी आणि समाजही माझ्यासाठी हा स्वार्थी विचार सर्वत्र बोकाळला आहे. समाजाच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या डॉक्टर, शिक्षक आणि पत्रकार या तीन वर्गातल्या लोकांनी तरी आपल्या कर्तव्याचे भान ठेवून वागायला हवे, परंतु दुर्दैवाने हेच वर्ग आज स्वार्थाने बरबटलेले दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीत समाज व्यवस्थाच आज अगदी ठिसूळ झाली आहे. नजीकच्या भविष्यात एखादा जबर धक्का बसून ‘समाज’ ही संकल्पना नष्ट होईल आणि माणसांचे परत कळप तयार होतील, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. दोन पायांच्या जनावरांचा कळप अशी आपली ओळख मनुष्यप्राण्याला स्थापित करायची नसेल तर वेळीच सावरायला हवे. परंतु सध्या सुरू असलेल्या नैतिक अध:पतनाचा वेग पाहिल्यास दुर्दैवाने असे म्हणावे लागते की, शिक्षक, पत्रकार, डॉक्टर अथवा समाजातल्या अन्य कोणत्याही घटकाला स्वत:ला सावरण्याची इच्छाच राहिली नाही. अध:पतनाच्या गटारगंगेत डुंबण्यातच प्रत्येकाला स्वर्गसुख लाभत आहे.समाजाच्या आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या डॉक्टर मंडळीकडे त्यांच्या ‘धंद्यांकडे’ पाहिले की, ही जाणीव प्रकर्षाने तीप होते. पूर्वीच्या काळी डॉक्टर किंवा वैद्याला देवासारखे मानले जायचे. त्याने विष दिले तरी ते भक्तिभावाने सेवन केले जायचे. प्रत्यक्ष जीवदान देणाऱ्या डॉक्टरला स्वर्गलोकीच्या धन्वंतरीची उपमा दिली जायची. अर्थात ही उपमा अतिशयोक्तपूर्ण नव्हती. त्याकाळच्या डॉक्टर किंवा वैद्यांसाठी रुग्णसेवा ईश्वरसेवेसारखी असायची. रुग्णाच्या रूपात प्रत्यक्ष परमेश्वरच आपली परीक्षा घेत असून त्या परीक्षत यशस्वी होण्यातच आपल्या ज्ञानाचे सार्थक असल्याची भावना त्या काळच्या ‘धन्वंतरीं’ना असायची. प्रसंगी पदरचे पैसे खर्च करून त्याकाळी डॉक्टर मंडळी उपचार करीत. परंतु हा भूतकाळ झाला. याच डॉक्टर मंडळींचे आजचे रूप कसे आहे? या आधुनिक धन्वंतरींपैकी अनेकांना केवळ धनच दिसते. धनच त्यांचा परमेश्वर आणि धनच त्यांची पूजा. पैसा कमविणे वाईट नाही, परंतु तो कमविण्याचा मार्ग आणि कमाईची मर्यादा याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. गरजेपेक्षा अधिक पैसा जवळ बाळगणे किंवा कमाविणे म्हणजेच अन्य एखाद्या गरजवंताला उपाशी ठेवणे होय. वरील वाक्य तत्त्वज्ञानाच्या धाटणीचे वाटत असले तरी त्याला अर्थशास्त्राचा मजबूत आधार आहे. समाजात दिसणारी जी काही मुठभर अतिश्रीमंत माणसं आढळतात त्या मुठभरांची अतिश्रीमंती ढीगभर सामान्यजनांच्या दारिद्र्यावर उभी असते. हा नियम डॉक्टर मंडळींना चपखल लागू पडतो. वैद्यकक्षेत्र खरेतर सेवेचे क्षेत्र आहे. सेवेत मोबदल्याची अपेक्षा नसते. बदलत्या परिस्थितीत असा मोबदला घेणे एकवेळ योग्य मानले तरी आज घेतला जाणारा किंबहुना ओरबाडल्या जाणारा मोबदला सेवेच्या तुलनेत अतिशय व्यस्त प्रमाणात आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या अज्ञपणाचा फायदा घेऊन अक्षरश: लुटमार केली जाते. औषधी उत्पादक कंपन्या, त्यांचे एजंट आणि डॉक्टर यांच्या संगनमताचा बळी ठरतो, तो बिचारा रुग्ण. अमुक एकाच कंपनीचे, अमुक एकाच दुकानात मिळणारे औषध घ्यायला जेव्हां डॉक्टर सांगतात तेव्हा हमखास समजावे की, आपण केवळ एका विशिष्ट डॉक्टरचेच नव्हे तर एका विशिष्ट कंपनीचे सुध्दा पोट भरत आहोत. परंतु आपण अगतिक असतो आणि मुकपणे या दुहेरी लुटमारीला सामोरे जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. देशी-विदेशी औषध कंपन्यांना आपला धंदा करायचा असतो, नफा कमवायचा असतो. मग अशावेळी मान्यवर डॉक्टरांना आमिष दाखविले जाते. त्यांच्या दारासमोर चकचकीत गाडी उभी केली जाते, गाडीची चावी डॉक्टर महोदयांकडे सोपवीत हळूच त्यांना अमुक एका महिन्यात आमच्या कंपनीचा इतका माल खपल्या गेला पाहिजे, अशी प्रेमळ सूचना केली जाते. चकचकीत गाडीचे नेत्रसुख अनुभवणारा डॉक्टर या प्रेमळ सूचनेचा अव्हेर करूच शकत नाही. कंपनीचा माल खपतो आणि तो निकृष्ट माल ज्यांच्या नशिबी आला असे दुर्दैवी रोगीसुध्दा खपतात. हे असे दुष्टचक्र आहे आणि याविरुध्द कोणी आवाज देखील उठवू शकत नाही. एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर त्याला वाळीत टाकले जाते.असं म्हणतात की, गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती कधीच सुख देत नाही, मन:शांती लाभू देत नाही. भोळसर रुग्णांना पिळून गडगंज श्रीमंत झालेल्या डॉक्टर मंडळीकडे पाहून हे विधान सत्य असल्याचे पटते. अशा अनेक श्रीमंत डॉक्टरांना व्यसनाच्या विळख्यात अडकलेले आपण सर्रास पाहतो. ज्याचा मानसिक तोल ढळला आहे अशीच व्यक्ती व्यसनांच्या आहारी जाते, असं मानसशास्त्र सांगते. मानसशास्त्राच्या या कसोटीवर पारखून पाहिल्यास काही सन्माननीय अपवाद वगळता सर्वच डॉक्टर मनोरुग्ण असल्याचे म्हणता येईल. अकोल्याचे स्वर्गीय डॉ. दादा प्रधान नेहमी म्हणायचे, ‘हरी (घाई), करी (मसालेदार, रस्सेदार पदार्थ), अँड वरी (चिंता) स्पॉईल्स दी हेल्थ’ या तीन ‘रीं’ना दूर ठेवून डॉ. प्रधान एेंशी वर्षाचे निरोगी आयुष्य जगलेत. स्व. डॉ. जोगळेकर, स्व. डॉ. काकासाहेब चौधरीदेखील दीर्घायुषी ठरले. ह्यांनी आणि अशा कित्येक डॉक्टरांनी आपल्या पेशाला कधी ‘धंद्याचे’ स्वरूप येऊ दिले नाही. त्यांना पैसा कमाविण्याची हाव नव्हती, तो टिकविण्याची चिंता नव्हती. परंतु आजकालचे डॉक्टर्स मात्र या तीन ‘री’पूंचे बळी ठरले आहेत. पैसा कमाविण्याची घाई आणि तो वाढविण्याची किंवा टिकवून ठेवण्याची चिंता आजच्या डॉक्टरांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उद्ध्वस्त करीत आहे. दिवसा समाजाला व्यसनांपासून दूर राहण्याचा उपदेश करणारे अनेक डॉक्टर्स रात्री बिअरबारमध्ये झिंगत आहेत, रुग्णांच्या कष्टाच्या कमाईचे पैसे त्यांच्या सिगारेटमधून धूर होऊन बाहेर पडत आहेत. मानसोपचार तज्ज्ञांनाच पैसे कमाविण्याची विकृती जडली आहे आणि अशा मंडळींच्या हाती समाजाच्या स्वास्थ्याची सूत्रं आहेत. दवाखाने आणि दवाखान्यातील गर्दी वाढू लागली तर नवल कसले?रोग्यांची संख्या वाढावी आणि आपला व्यवसाय जोरात चालावा, असा धंदेवाईक दृष्टिकोन समाजाच्या आणि राष्ट्राच्याही हिताचा नाही. विविध व्यसने, अस्वच्छता आणि सोबतच मानसिक ताणतणावामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डॉक्टर मंडळींसाठी ही समाधानाची बाब असली तरी हे समाधान विकृतीकडे झुकणारे आहे. रोगांवरील उपचारापेक्षा रोग उत्पन्नच होणार नाही, अशा उपाययोजनांवरील प्रबोधन डॉक्टरांकडून अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. उलट बऱ्याचदा साध्या सरळ उपायांनी बऱ्या होणाऱ्या रोगांवर हेतूपुरस्सर किचकट आणि खर्चीक उपचार केला जातो. जागोजागी उभे झालेले ‘मॅटर्निटी हॉस्पिटल्स’ याचे मासलेवाईक उदाहरण ठरू शकते. अशा मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये नैसर्गिकरीत्या प्रसूत होणाऱ्या स्त्तियांची संख्या अतिशय नगण्य असते. स्त्री नैसर्गिकरीत्या प्रसूत झाली तर शे-पाचशेतच तिची सुटका होते. एवढ्या कमी पैशात पेशंटला हातून जाऊ दिलेत एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा उभारणी खर्च, त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार आणि शेवटी स्वत:च्या ऐशोआरामासाठी डॉक्टरांकडे पैसा येणार कुठून? ‘सिझेरियन’चे प्रस्थ अलीकडील काळात वाढले आहे, त्याचे कारणच हे आहे. रुग्णांची कृत्रिम ‘अडवणूक’ करून पैसा कमाविण्याची ही वृत्ती कितपत नैतिक ठरते? हे एकच उदाहरण असे नाही, अशी असंख्य उदाहरणे देता येतील. अगदी साध्या-साध्या रुपया दोन रूपयात बऱ्या होणाऱ्या आजारांसाठी अक्षरश: हजारो रुपये उकळले जातात. ‘सलाईन’ हा प्रकार देखील तसाच आहे. सलाईन म्हणजे मिठ आणि साखरेचे पाणी. अशी सलाईनची एक बाटली जास्तीत जास्त पंधरा रुपयात तयार होत असेल. डॉक्टरकडे पोहचेपर्यंत तिची किंमत वीस रूपये होत असेल, परंतु रुग्णांच्या शरीरात जेव्हा ती टोचली जाते तेव्हा सलाईनच्या प्रत्येक थेंबाला मूल्य प्राप्त झालेले असते. खरे तर मीठ-साखर-पाणी तोंडाने सहज घेतल्या जाऊ शकते. अगदीच मरणासन्न अवस्था असेल तरच सलाईनचा वापर योग्य ठरू शकतो; परंतु आजकाल सलाईनचा वापर अगदी फुटकळ स्वरूपात केल्या जात आहे. जोखीम शून्य आणि पैसा भरपूर हे सलाईनचे वैशिष्ट्य डॉक्टरांसाठी वरदान ठरले आहे. खोऱ्याने पैसा देणारा गर्भजलचिकित्सा हा व्यवसायसुध्दा सध्या चांगलाच फोफावला आहे. भ्रूणहत्या पूर्वी पाप मानले जायचे. ते पापच आहे, परंतु मुलगाच हवा या सामाजिक हव्यासाचा पुरेपूर लाभ उचलीत अनेक उच्च (?) विद्याविभूषित डॉक्टरांनी हा सोयीस्कर व्यवसाय निवडला. या व्यवसायात गुंतलेली डॉक्टर मंडळी स्त्री भ्रुणाच्या हत्येचे केवळ पापच करीत नसून पैशाच्या लोभापायी सामाजिक समतोलच नष्ट करायला निघाले आहेत. ‘एड्स’ सारख्या रोगाचा बागुलबोवा उभा करून लाखो रूपयांनी निष्पापांना लुटल्या जात आहे ते वेगळेच. डॉ. शांतीलाल कोठारींनी एड्सला आव्हान देताना एड्सचे विषाणू शरिरात टोचून घेण्याची तयारी दर्शविली होती; परंतु त्यांनी तसे केले आणि त्यांना एड्सची बाधा झाली नाही तर आपले सगळे अर्थशास्त्रच उद्ध्वस्त होईल, या भीतीने डॉ. कोठारींचे आव्हान स्वीकारायला ना सरकार तयार ना डॉक्टरांच्या संघटना.’डॉक्टर’ ही संस्था सामाजिक बांधणीत अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे डॉक्टर मंडळींनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवायला हवे. परंतु डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘आयएमए’ चे कार्य केवळ मासिक सभा आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या स्नेहभोजनापर्यंत मर्यादित झाले आहे. चिंतन किंवा समाजजागृती या खूप दूरच्या गोष्टी राहिल्या.ही एकंदर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. समाज संस्था ज्या मजबूत स्तंभांवर उभी आहे, त्यातील एकेक स्तंभ लोभाच्या वाळवीने आतून पोखरायला सुरूवात केली आहे. या किडीचा वेळीच बंदोबस्त झाला नाही तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माणूस नावाचा प्राणी परत कळपात शिरेल.

— प्रकाश पोहरे

write my paper midnightpapers.com

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…