घरोघर शिवाजी निर्माण करा!रविवार १५ जानेवारी २०१२

आमच्या माता शिक्षित असायला हव्यात आणि माता-पित्यानंतर ज्यांना स्थान दिले जाते ते गुरूजन तितक्याच तोलामोलाचे असायला हवेत. मुलाच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याला अत्युच्च दर्जाचे शिक्षण, शैक्षणिक सुविधा, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असलेली सगळी संसाधने सरकारने उपलब्ध करून द्यावीत. उद्याचा भारत बलवान करायचा असेल, नोबल पारितोषिक विजेते भारतातही घडवायचे असतील, तर आजच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या सगळ्याच दृष्टीने मजबूत करणे भाग आहे.

शिवरायांचा इतिहास केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा आहे. सर्वथा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश संपादन करणार्‍या शिवाजीचे चरित्र आजही गलितगात्र समाजाला नवी स्फूर्ती देण्याचे कार्य करीत आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास जो सगळ्यांनाच ज्ञात आहे तो पुन्हा इथे सांगण्याचे कारण नाही आणि एका लेखाची शब्दमर्यादा त्यासाठी कधीही पुरेशी ठरणार नाही. मला थोडे वेगळेच सांगायचे आहे. शिवाजी राजे महान होते ही बाब जितकी सत्य आहे तितकीच त्यांच्या महानतेला आकार देण्याचे काम त्यांच्या मातोश्री जिजाऊंनी केले हेदेखील सत्य आहे. जिजामाता होत्या म्हणूनच शिवाजी सारखे नररत्न जन्माला येऊ शकले, घडू शकले. अगदी शिवाजीच्या जन्मापासून जिजाबाईंनी एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते आणि ते शिवाजीच्या हातून त्यांना साकार करायचे होते. शहाजी राजेंना आदिलशाहीत जाण्यासाठी परवानगी जिजाऊंनी तेवढ्याचसाठी दिली. शहाजी राजेंची जहागीर सांभाळताना राज्य कसे करावे, कसे उभारावे आणि कसे वाढवावे याचे संपूर्ण शिक्षण जिजाऊंनी शिवाजींना दिले. एक आदर्श राजा घडविण्यासाठी जे काही करायचे ते सगळेच जिजाबाईंनी केले आणि पुढे शिवाजीने स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे त्याच अथक परिश्रमाचे फळ होते. शिवाजी महाराजांजवळ असलेली फौज आणि त्यांचा ज्यांच्याशी मुकाबला होता त्या आदिलशाही, निझामशाही; मोगलशाहीकडे असलेला फौजफाटा याची तुलनाही होऊ शकत नव्हती. त्या प्रचंड ताकदीला आव्हान देणे म्हणजे मुंगीने हत्तीला आव्हान देण्यासारखे होते; परंतु या सगळ्या शक्यता लक्षात घेऊनच जिजाबाईंनी शिवाजीला प्रत्येक प्रकारच्या आव्हानाला तोंड देण्याचे कसब शिकविले होते.

थोडक्यात शिवाजीसारखा महान पुरुष जन्माला यायचा असेल, तर जिजाबाई सारखी माता आधी जन्माला यावी लागते, हे सत्य आहे. “कलर” चॅनलवर सुरू असलेल्या वीर शिवाजी या मालिकेतून या सर्व बाबींवर प्रकाश टाकल्या जात आहे, कुणाचाही उर अभिमानाने भरून जावा अशा शिवाजी आणि जिजाऊंच्या व्यक्तीरेखा दाखविण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. त्या पृष्ठभूमीवर आज आपल्या देशाचा, समाजाचा विचार केला, तर भावी आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम पिढी घडविण्याची ताकद आपल्या मातांमध्ये किंवा मुलांना शिक्षण देणार्‍या शिक्षकांमध्ये आहे का हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. आता आपल्यापुढची आव्हाने बदललेली आहेत, आता संपूर्ण जगच बदलले आहे आणि ते झपाट्याने बदलत आहे. बदलाच्या या झपाट्यात टिकून राहणारा, भावी आयुष्यातील आव्हाने पेलणारा, देशाला प्रगती पथावर नेणारा उद्याचा तरुण आपल्याला उभा करायचा असेल, तर आजच्या बालकांना आपण काय देत आहोत आणि देणार्‍यांची पात्रता काय आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विचार केला असता जे चित्र समोर येते ते फारच भयावह आहे. देशातील ९५ टक्के मुले जिथे प्राथमिक किंवा पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात त्या शाळांमधील, अंगणवाड्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मूल जन्माला आल्यानंतर साधारण वयाच्या सहाव्या महिन्यापासून ते सहा वर्षांपर्यंत त्याच्या मेंदूची वाढ होत असते, फारतर दहाव्या वर्षापर्यंत त्याचा मेंदू ग्रहणक्षम असतो. या काळात तो जे काही ग्रहण करतो तेच त्याच्या भावी आयुष्याला निर्णायक वळण देणारे असते, हे मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध केलेले सत्य आहे. त्यामुळे देशाची भावी पिढी घडवायची असेल, तर वय वर्षे दहापर्यंत मुले कोणत्या परिस्थितीत शिकतात, काय शिकतात, त्यांना शिकविणार्‍यांचा दर्जा काय या सगळ्या गोष्टींना अतोनात महत्त्व प् ाप्त होते. त्यादृष्टीने विचार केला, तर आपल्याला असे दिसून येईल, की नेमक्या याच काळात मुलांच्या शैक्षणिक, मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक विकासाकडे सगळ्यांचेच अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू होतो तो अंगणवाडीपासून आणि या अंगणवाडीत शिकविणार्‍या स्त्रिया समाजाच्या अशा वर्गातून आलेल्या असतात, की त्या बिचार्‍यांना रोजची पोट भरण्याची भ्रांत असते. त्यांचे सगळे ज्ञान, त्यांची सगळी ताकद पोटाची भूक भागविण्याच्या संघर्षातच संपून जाते. त्यांनी आधुनिक जग पाहिलेले नसते, त्यांना संगणक माहीत नसतो, आधुनिक जगाची ज्ञानभाषा म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंग्रजीचे ज्ञान त्यांना नसते, तंत्रज्ञानाची माहिती नसते आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे बालसंगोपनाचे जे मानसशास्त्र आहे त्याचाही त्यांना अभ्यास नसतो. वास्तविक या वयातील मुलांना सांभाळणे, शिकविणे, त्यांना चांगल्या सवयी लावणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे अतिशय कर्मकठीण काम असते. ती छोटी छोटी चिमुकली, रडणारी, मल-मूत्र विसर्जनाच्याही सवयी न लागलेली अजाण बालके सांभाळणे हे महा कर्मकठीण काम असते. ज्ञानाच्या जगात जिथे मुलांचे पहिले पाऊल पडते तिथला आधारच भक्कम असायला हवा, दुर्दैवाने तसे काही दिसत नाही. वास्तविक तीन ते दहा या वयोगटातल्या मुलांना शिकविणार्‍या शिक्षिकांचा दर्जा अत्युच्च असायला हवा आणि त्यांना तितकेच चांगले वेतनही मिळायला हवे. अमेरिकेत प्राध्यापकांपेक्षा प्राथमिक शिक्षकांना अधिक वेतन दिले जाते याचे कारणच हे आहे, की मुलांचे भावी आयुष्य घडविण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी याच शिक्षकांवर असते. त्यांनाच अधिक मेहनत घ्यावी लागते आणि ते जी काही मेहनत घेतात त्यावरच त्या मुलांचे भावी आयुष्य अवलंबून असते; परंतु आपल्याकडे दिसते ते सगळे उलटेच! मिसरूड फुटलेल्या आणि आ पले बरे-वाईट काय हे समजण्याची किमान क्षमता ज्यांच्यात असते अशा १८ वर्षांवरील मुलांना शिकविणार्‍या प्राध्यापकाला आपल्याकडे एक ते सव्वा लाख पगार असतो, लेक्चरर ऐंशी हजार ते एक लाख पगार घेतात आणि केवळ मातीला आकार देणार्‍या कुंभारासारखे काम करणार्‍या आणि लहान मुलांचा शैक्षणिक पाया तयार करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी असलेल्या अंगणवाडी शिक्षिकांची मात्र तीन-चार हजार पगारावर बोळवण केली जाते. ही शिडी अगदी उलटी करणे गरजेचे आहे. मुलांच्या भावी आयुष्याचा पाया मजबूत करायचा असेल, तर शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यावर उच्चशिक्षित, आधुनिक जगाचे ज्ञान असलेल्या, इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या, बालमानस शास्त्रात पारंगत असलेल्या मुख्यत्वे महिला शिक्षिकांची नियुक्ती व्हायला हवी आणि त्यांना प्राध्यापकांच्या बरोबरीने वेतन द्यायला हवे. सोबतच भारताची भावी पिढी जिथे घडते; हे पूर्व प्राथमिक शिक्षण ज्या परिसरात दिले जाते तिथले वातावरण मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करणारे, शिक्षणाच्या आधुनिक सुविधांनी युक्त असलेले, स्वच्छ, निरोगी आणि आनंददायक असायला हवे. आपल्याकडे मधूनच शिक्षण सोडणार्‍या मुलांचे प्रमाण खूप अधिक आहे आणि त्याला कारणच हे आहे, की शिक्षणाच्या बाबतीत मुलांमध्ये गोडी निर्माण होईल, असे प्रयत्नच प्राथमिक स्तरावर केले जात नाही. अभ्यासक्रम, शाळेचा परिसर आणि शिक्षकांची गुणवत्ता या सगळ्यांचा विचार त्यादृष्टीने व्हायला हवा, तो होत नाही. सरकारने याबाबतीत पुढाकार घेऊन सगळ्या अंगणवाड्यांना प्ले ग्रूपमध्ये परावर्तीत करावे, तिथे आधुनिक शिक्षणाच्या सगळ्या सोई उपलब्ध करून द्याव्यात, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर शिकविणार्‍या शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता सर्वोच्च स्तरावरची असावी आणि अर्थातच त्यांना मिळणारे वेतनदेखील सर्वाधिक असाव े. मडकी चांगली घडवायची असतील, तर ते घडविणारे कुंभार; पाया भक्कम करायचा असेल, तर पाया तयार करणारे कारागीर तितकेच कसबी लागतील. प्राथमिक शिक्षक दहावी-बारावी झालेले असतात त्यांची तुलना प्राध्यापकांशी कशी केली जाऊ शकते, हा प्रश्न कदाचित उपस्थित केल्या जाईल. त्यावर अतिशय सोपा तोडगा आहे. आज प्राध्यापकांना जी वेतनश्रेणी दिली जाते ती प्राथमिक शिक्षकांना, अगदी प्ले ग्रूप, अंगणवाडी शिक्षिकांना द्यावी आणि त्या पदावर नियुक्त होण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आज प्राध्यापक होण्यासाठी जी काही पात्रता लागत असेल ती ठेवावी. आज नेमके हे होत आहे, की उच्चशिक्षित, विद्वान प्राध्यापकांच्या वर्गात शिकायला मुलेच नसतात, असली तरी त्यांची संख्या खूप कमी असते. दिवसातून एक-दोन तासिका घेऊन ही विद्वान प्राध्यापक मंडळी महिन्याकाठी लाख-सव्वालाख वेतन घेतात. दुसर्‍या बाजूने विचार केला, तर समाजातील ही प्रचंड बौद्धिक ताकद अक्षरश: कुजत आहे. त्या ताकदीचा योग्य विनियोग करायचा झाल्यास जिथे त्यांची सर्वाधिक गरज आहे तिथे ती लावली गेली पाहिजे. ही बौद्धिक संपदा पोसण्यासाठी सरकार वेतनाच्या माध्यमातून प्रचंड खर्च करीत असते आणि समाजाला त्याचा प्रत्यक्ष फायदा फार कमी होतो. हा खर्च योग्य ठिकाणी केला, तर उद्याचा भारत अधिक बलवान, अधिक समृद्ध होऊ शकतो. महाविद्यालयात केवळ १ किंवा २ तास काम केल्यानंतर उरलेल्या वेळेत ही प्राध्यापक मंडळी शिकवणी वगैरे घेऊन अधिक पैसा मिळवू शकतील, सरकारने त्यांना तशी परवानगी द्यावी. आणि महाविद्यालयातील एका तासाचे त्यांना वाटल्यास १ ते २ हजार मानधन द्यावे; किंवा तुम्ही लाख-सव्वा लाख रुपये महिन्याचे वेतन घेत असाल, तर त्याचे आऊटपुट तुम्हाला द्यावे लागेल. असे त्यांना ठणकावून सांगावे. माझा विरोध प्राध्यापक, लेक्चरर मंडळींना नाही, त्यांना मिळणार्‍य ा वेतनालाही नाही, माझे म्हणणे इतकेच आहे, की त्यांनी महाविद्यालयात १ किंवा २ तास घेतल्यानंतर प्राथमिक किंवा पूर्वप्राथमिक शाळेवर ज्ञानदानाचे काम करून मिळत असलेल्या वेतनाचा समाजाला पुरता मोबदला द्यावा. या बुद्धिवान लोकांची खरी गरज तिथे आहे. ज्या पिढीला भविष्यात तुम्हाला शिक्षण द्यायचे आहे, त्यांना भरभक्कम आधारस्तंभ बनवायचे आहे, नोबेल-पारितोषिक विजेते घडवायचे आहेत, ते तुमच्यापर्यंत महाविद्यालयात पोहचत असताना त्या क्षमतेचे झालेले असावेत हे पाहणे प्राध्यापकांचेच काम आहे. हे ज्या दिवशी होईल तो दिवस देशाच्या दृष्टीने भाग्याचा असेल. संगणकासारख्या आधुनिक शैक्षणिक साधनांनी युक्त असलेल्या व प्ले ग्रूपमध्ये परिवर्तीत झालेल्या अंगणवाड्यांमध्ये, प्राथमिक शाळांमध्ये उच्च विद्याविभूषित तरुणी-स्त्रिया लहान मुलांना “एबीसीडी” चे धडे, आधुनिक जगातील एटिकेट्स, मॅनर्स व गतीमान युगातील संगणक शिकवू लागतील त्याच दिवशी देशाचे भवितव्य पालटण्याची प्रक्रिया सुरू होईल. शिक्षणाचा खरा अर्थ, खरी गरज समजून घेणे आवश्यक आहे. पाया कच्चा ठेवून भव्य कळस उभारण्याचे स्वप्न आम्ही पाहू शकत नाही. केवळ जिजाबाई, सावित्रीबाईंचे नाव घेऊन, त्यांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करून भागणार नाही. त्यांचे खरे आदर्श शाळाशाळांमध्ये उभे झाले पाहिजे. कधी कुणीही न पाहिलेल्या व केवळ कल्पनेतल्या सरस्वतीला पूजण्यापेक्षा देशात क्रांती घडविणार्‍या आणि क्रांती घडविता येते हा संदेश आपल्या उक्ती-कृतीतून देणार्‍या सावित्री-जिजाईचे पूजन आणि स्मरण करणे अधिक महत्त्वाचे आहे. हे पूजन केवळ उदबत्त्या आणि हारांपुरते मर्यादित असून चालणार नाही, त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शाच्या मार्गावर चालणारी पिढी उभी करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारायला हवे आणि ते आव्हान स्वीकारायचे असेल, तर अगदी पहिल्या पायरीपासून सुरुवात करावी लागेल. आमच्या माता शिक्षित असायला हव्यात आणि माता-पित्यानंतर ज्यांना स्थान दिले जाते ते गुरुजन तितक्याच तोलामोलाचे असायला हवेत. मुलाच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याला अत्युच्च दर्जाचे शिक्षण, शैक्षणिक सुविधा, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असलेली सगळी संसाधने सरकारने उपलब्ध करून द्यावीत. उद्याचा भारत बलवान करायचा असेल नोबेल-पारितोषिक विजेते भारतातही घडवायचे असतील, तर आजच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या सगळ्याच दृष्टीने मजबूत करणे भाग आहे.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…