नवीन लेखन...

गावोगावी गंमत शाळा

‘एकदा काही मुले गांधीजींना भेटायला गेली. गांधीजींनी मुलांना विचारले,’तुमचे शिकण्याचे माध्यम कोणते?’ काही मुले म्हणाली,’हिंदी’ तर काही मुले म्हणाली,’इंग्रजी’. गांधीजी म्हणाले,’अरे या तर आहेत भाषा! मी तुम्हाला शिकण्याचे माध्यम विचारतो आहे?’ आता मुले गोंधळली. मुलांना जवळ घेत गांधीजी म्हणाले,’अरे भाषा, गणित, विज्ञान असा कोणताही विषय शिकण्यासाठी तुम्ही तुमचे हात वापरता का? प्रत्यक्ष अनुभव घेता का? ही शिकण्याची प्रभावी माध्यमं आहेत!’ आता मुलांना कळलं की इतके दिवस आपण भाषेलाच माध्यम समजत होतो. जे काही शिकायचं ते हाताने, प्रत्यक्ष अनुभव घेऊन. केवळ पाठांतर नव्हे तर स्त:हून समजून घेणं. आमच्या गंमत शाळेचं गाभा तत्व हेच आहे.ठ गंमतशाळेची संकल्पना मांडताना राजीव तांबेंनी अशी गोष्ट सांगूनच बोलायला सुरुवात केली. आता महाराष्टा्रत गंमत शाळेच्या बारा शाखा सुरू झाल्या आहेत.
राजीब तांबे युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होते. त्यावेळी ग्रामीण भागातल्या तीन हजार प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. शिक्षकांच्या अध्यापनातील नेमक्या अडचणी जाणून घेऊन आणि पाठ्यपुस्तकातील त्रुटी शोधून त्या दूर करण्यासाठी त्यांनी गणित, भाषा अशा विषयांचे सुमारे शंभर खेळ तयार केले; जे शून्य खर्चाचे आहेत. या खेळाचं मुख्य वैशीष्ट्य म्हणजे यातला प्रत्येक खेळ हा किमान वेगवेगळ्या दहा प्रकारे तर खेळता येतोच पण हे खेळ तीन पातळीवर वापरता येतात. संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, सरावासाठी व मूल्यांकनासाठी. या खेळांप्रमाणेच मुलांना सहजी करता येतील असे शून्य खर्चाचे विज्ञनाचे सोपे शंभर प्रयोग ही त्यांनी तयार केले आहेत. अगदी ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील मुले सुध्दा स्वत: प्रयोग करुन शिकतील. खेळत, चुका करत पण चुकातूनच शिकतील यासाठी ते प्रयत्नशील आहेत. हे विज्ञानाचे प्रयोग सध्या चतुरंग पुरवणीतून प्रकाशित होत आहेत.

लोकसत्ता वर्तमानपत्रातील शनिवारच्या ‘चतुरंग’ पुरवणी मधील ‘गंमत शाळा’ हे सदर वाचून अनेक पालक व शिक्षकांनी विचारणा सुरू केली की ,’ही गंमत शाळा आहे कुठे? आम्हाला पाहायला मिळेल का? आमच्या गावात सुरू करणार का?’ हा रेटा इतका वाढला की, आता खरोखरीच्या गंमत शाळा सुरू करायच्या असं त्यांनी मनावर घेतलं. गंमत शाळेची संकल्पना मांडणारा एक छोटेखानी लेख त्यांनी लोकसत्तेच्या ‘ठाणे वृत्तान्त’ या पुरवणीत लिहिला. याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आणि गंमत शाळा सुरू करण्यास उत्सुक असणाऱ्या पालकांचं (म्हणजे भावी शिक्षकांचं) प्रथम प्रशिक्षण त्यांनी आयोजित केलं. यातूनच ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि बदलापूर येथे सहा शाखा सुरू झाल्या. त्यानंतर आणखी दोन ठिकाणी प्रशिक्षणे आयोजित करावी लागली. आता कराड, औरंगाबाद, बोरिवली, विरार, जुईनगर, गोरेगाव, पार्ले इथेही गंमत शाळेच्या शाखा सुरू झाल्या. या गंमत शाळांच्या माध्यमातून समाजाच्या सहभागाने शिकण्याची नवीनच पध्दत तयार झाली.

ही गंमत शाळा नेमकी आहे कशी? कधी आणि कुठे भरते शाळा?त्याचा काही अभ्यासक्रम आहे का? मुले हाताने शिकतात म्हणजे नेमकं काय करतात? थोड्याशा प्रशिक्षणानंतर हे पालक गंमत शाळेत शिकवू शकतात का? आणि अशा गंमत शाळा सुरू कराव्यात असं नेमकं कधी व का वाटलं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी राजीव तांबेंना गंमत शाळेतच जाऊन भेटले. माझा स्वत:चा या गंमत शाळेतला अनुभव अमेझींग आहे! सध्या तरी ही गंमतशाळा प्राथमिक विभागापुरतीच मर्यादित आहे. इयत्ता पहिली व दुसरीचा एक गट आणि इयत्ता तिसरी चौथीचा दुसरा गट. ही गंमत शाळा महिन्यातून तीन शनिवार दुसऱ्या गटासाठी दोन तास असते. तर महिन्यातून तीन रविवार पहिल्या गटासाठी दोन तास असते. शाळेचे बाकं नसलेले वर्ग शनिवारी संध्याकाळी व रविवारी मोकळेच असतात. शाळेच्या अर्थपूर्ण सहकार्याने हे वर्ग गंमतशाळेसाठी वापरता येतात.

‘गंमत शाळेतील शिकणं व शिकवणं आणि त्यांचे मूल्यमापन यांचा परस्पर संबंध काय व कसा?’ असं विचारताच सर म्हणाले, ‘वर्गात मुलांना प्रश्न विचारले पाहिजेत हे मान्य केले तरी, दोन गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते. एक, शिक्षक कोणते प्रश्न विचारत आहेत? दोन, कोणत्या मुलांना व कसे प्रश्न विचारत आहेत? शिक्षक मुलांना एक उत्तरी नव्हे तर बहुआयामी प्रश्न विचारतात का? सर्व मुले उत्तर देण्यास उत्सुक असतात का? मागे मागे राहणाऱ्या मुलांनी बोलावं यासाठी शिक्षक त्यांना प्रोत्साहित करतात का?
काही प्रश्न मुलांनी पण तयार करावेत यासाठी त्यांच्या विचाराला चालना देतात का? वर्गातील फळ्याचा वापर करण्याची संधी मुलांना मिळते का? शिक्षक पूर्ण वर्गाचा वापर करतात का? विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रिया घडण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतात का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुले न भीता शिक्षकांच्या जवळ जातात का? या सर्वच प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असायला हवीत.

अशा प्रकारे वर्गाचे मूल्यमापन म्हणजे, मुलांच्या शिकण्याच्या पध्दतींचे मूल्यमापन. शिक्षकाचे मुलांसोबत शिकण्याच्या वृत्तीचे व प्रयत्नांचे मूल्यमापन. वर्गातील विविध आंतरा*यांचे मूल्यमापन. काही शाळातून मी पाहिले आहे,परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले की वर्गात एकदम शोककळा पसरते. कारण आता आजपासून परीक्षेपर्यंत आपल्या नशिबात काय वाढून ठेवले आहे याची चाहूल मुलांना लागते. ‘आता अभ्यासाला सुरुवात करा’ अशी हाकाटी पिटत अनेक घरांचे कारावासात रुपांतर होते. खरं म्हणजे शिकणं, नवीन गोष्टी शोधणं ही निरंतर प्रक्रिया आहे. अशावेळी मुले काय आणि कशी शिकत आहेत याचे वारंवार परीक्षण होणं,त्याचं विश्लेषण होणं व त्यानुसार पध्दतीत बदल होणं अत्यंत गरजेचे आहे. तरच मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अनुभव मिळू शकेल.

एकदम तीन महिन्यांनी होणारी लेखी परीक्षा हे काही मूल्यमापनासाठीचे अंतीम उत्तर नव्हे. या लेखी परीक्षेचं प्रचंड दडपण मुलांच्या मानवर येतं (यासाठी काही प्रमाणात शाळा व पालक ही जबाबदार असतात, हा भाग वेगळा.) जसं मुलांचं शिकण नकळत व्हायला पाहिजे,सहजी व्हायला पाहिजे तसंच मुलांचं मूल्यमापन ही! आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, मुलांचे मूल्यमापन केल्यानंतर त्याचे विशलेषण होणं व त्यानुसार शिक्षकाच्या अध्यापन पध्दतीत बदल होणे गरजेचे आहे.

पण मूल्यमापनाचाच प्रचंड बागुलबुवा निर्माण केल्याने, त्याला जीवन मरणाच्या संघर्षाचेच रुप दिल्याने मुलांच्या मनात एकंदर शिक्षणाबद्दल, शिकण्याबद्दलच अनास्था निर्माण झाली.
मुले स्वाभाविक मुडमधे असताना त्यांना मूल्यमापनाची जाणीव ही करु न देता जे त्यांचे मूल्यमापन केले जाते तेच खरे मूल्यमापन! मुलांना शिक्षणाप्रमाणेच मूल्यमापनही आनंददायी वाटले पाहिजे, ते शिक्षणाइतकेच सहज असले पाहिजे.

गंमशाळेतील वर्गात मुले गटात बसली होती. प्रत्येक गटातील मुलांसमोर पालेभाजी होती. आता या पालेभाजीचे मुले काय करणार हा माझ्यापुढे प्रश्न होता.
पण तांबेसरांनी मुलांशी गप्पा मारताना त्यांच्यासमोर एक प्रश्नांची यादीच ठेवली. आता त्याची उत्तरे मुलांनी आपापसांत चर्चा करुन शोधायची होती. ‘ताजी व शिळी पालेभाजी कशी ओळखायची? या दोन्हीत काय फरक आहे. किमान दहा गोष्टी शोधा. आपण ताजी भाजीच का आणतो?’ मुलांनी दिलेल्या भाजीपैकी ताजी व शिळी पालेभाजी निवडून वेगवेगळी केली. आता त्यातला फरक शोधायचा होता.

‘ताज्या पालेभाजीच्या देठात रस असतो पण यांची देठं सुकी आहेत.ठ एक मुलगा आनंदाने ओरडला. ‘त्यांची मुळं पाहा. पानं पाहा. पानांचे देठ पाहा. मुळांचे रंग पाहा.ठ असं सरांनी सांगताच अनेक मुलांना अनेक शोध लागले. बोलण्यासाठी, सांगण्यासाठी मुलांचे हात भराभर वर होऊ लागले. सरांनी फळ्यावर यादी करायला सुरुवात केली. एकूण 13 फरक मुलांनी शोधले होते. मुले फळ्यावर पाहून किंवा मित्रांच्या वहीत बघून लिहीत होती. वर्गात मुलांच हातानी शिकणं आणि शोधून काढणं सुरू होतं तर सरांचं शिकवणं नाही तर मुलांसोबत शिकणं सुरू होतं. माझ्यासाठी हा अनुभव अदभूतच होता. मग पालेभाज्यांची यादी तयार झाली. नंतर पालेभाजी, फळभाजी, फूलभाजी व कंदमुळे अशी एक यादी मुलांच्या सहभागाने तयार झाली. आता यातली प्रत्येक भाजी ही ताजी कशी ओळखायची याविषयी गप्पा सुरू झाल्या.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..