नवीन लेखन...

कोण्णूर सर ( कोल्हापूर)

मी  बँकेत टाइपिस्ट म्हणून नोकरीला लागलो. दोन तीन महिने झाले असावेत. एकदा साहेबांनी टाइपिंगला दिलेल्या पत्रात मला व्याकरणाची एक चूक आढळली. मी ती दुरुस्त केली. पत्रावर सही करण्यापूर्वी साहेबांनी मला बोलावून तीच दुरुस्ती चुकीची असल्याचे सांगितले. त्यांनी does च्या पुढे क्रियापदाला s प्रत्यय लावला होता. मी चटकन म्हणालो, ’साहेब does च्या पुढे मेलं तरी s लागत नाही’. साहेबांनी किंचित रागानेच माझ्याकडे पाहिले. ’ सॉरी सर, हे आमच्या कोण्णूर सरांच वाक्य डोक्यात इतक फिट झालं आहे की चुकून तुमच्यासमोर मी ते तसच बोललो’. आपली चूक साहेबांच्या लक्षात आली. पण हे ’मेलं तरी’ त्याना फारस रुचल नव्हत.

कोण्णूर सरांच्या हाताखाली शिकलेल्या एकूण एक हजारो विद्यार्थ्यांच्या तोंडात किंवा डोक्यात हे वाक्य असच फिट झाल आहे. कोण्णूर सरांची भाषाच अशी जगावेगळी होती. जरा व्याकरणाकड लक्ष दिल तर SSC ला इंग्रजीत आंद्या परिटाचं गाढव सुद्धा पास होईल, अडचण एवढीच आहे की ते तीन तास एके ठिकाणी बसत नाही. इंग्रजीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ते गर्दभाच्या असे जवळ उभे करायचे. जशी भाषा वेगळी तसेच विद्यार्थ्यांना मारण्याची पद्धतही वेगळी. डोक्यावर किंवा हाताच्या ढोपराच्या मागे हाडावर डस्टरने खाटकन मारायचे. जीव कळवळायलाच पाहीजे. आणखी अस्त्र म्हणजे एक वेताची छडी होती. हात झणझणण म्हणजे काय ते कोण्णूर सरांची छडी खाल्ल्यावरच कळायचे. मुलींना सुद्धा सर मारायचे हे आम्हाला तेव्हां खूप छान वाटायच.

कोण्णूर सर कोल्हापूरात न्यू हायस्कूलच्या कागलकर वाड्यात इंग्रजीचे शिक्षक होते. अतिशय कडक शिक्षक म्हणून त्याना ओळखले जायचे. पांढरे शुभ्र दुटांगी धोतर, खादीचा कुडता त्यावर खादीचेच जाकीट आणि डोक्यावर टोकदार कडक इस्त्रीची गांधी टोपी असा त्यांचा पोशाख असायचा.
चार चौघात पटकन उठून दिसतील असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते. शाळेव्यतिरिक्त ते स्वत:चे खाजगी क्लासेस घ्यायचे. कोण्णूर सरांमुळे इंग्रजी सुधारले पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा वाटतो सरांसारख्या भन्नाट माणसाचा सहवास लाभल्याचा आनंद.

कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेतील त्यांच्या घरातल्या पहिल्या मजल्यावर काही महिन्यांपूर्वी मी त्यांच्या कुटुंबियांना भेटायला गेलो होतो तेव्हां ती खोली पाहून या खोलीत आम्ही ६५/७० मुले तेव्हां कशी काय बसत असू याचे खूपच आश्चर्य वाटले. मुली खिडकीत बसायच्या. दाटी वाटीने जागा करून देण्यासाठी सर मुलांना बजावयाचे ’जे नुसत हलवल्या सारख करतोयस ते बूड प्रत्यक्ष हलव’. साधी, सोपी, सरळ, नेहमीची भाषा सरांना त्यांच्या आईने शिकवलीच नसावी. वर्गात बसून मागच्या बाजूला कोणी बडबड करायला लागला की सर म्हणायचे ’ए बोडकी, रामाच्या पारावर बसून वाती वळायला आलायस काय ?’ अंबाबाईच्या देवळात राम मंदिराच्या मागे प्रवचन ऐकायला जाणाऱ्या विधवा बायकांसाठी वापरला जाणारा शब्द बोडकी. कोण्णूर सरांनी कुठून कुठून हे शब्द संग्रहात साठवले होते ते कळत नाही.

चहाचे त्यांना अत्यंतिक व्यसन होते. टेबलावर चहाचा एक थर्मास अखंड भरलेला असायचा. आम्हालाच कोणालातरी कपात अर्धाच कप चहा भरायला सांगत. भुरका मारून चहा प्यायचे. थर्मास रिकामा झाला की घरात हाक द्यायचे. सर पूर्वी धूम्रपानही करायचे. पुढे डॉक्टरांनी त्यावर बंदी घातली.

फक्त ५०/६० मिनिटांच्या शिकवणीने इंग्रजी सुधारणार नाही म्हणून घरी सराव करण्यावर त्यांचा भर होता. रोज भरपूर गृहपाठ द्यायचे. म्हणजे जितका वेळ शिकवणे त्यापेक्षा जास्त वेळ वह्या तपासण्यात जायचा. त्या वह्या एका कोनाड्यात रचून ठेवलेल्या असायच्या. एकदा एका बहाद्दराने कोणाची तरी वहीच चोरली. वही गायब झाल्याने चोरी झाल्याचे कळले तरी चोर सापडण्यासारखा नव्हता. त्या दिवशी सरांनी न भूतो न भविष्यति अशा शिव्या हासडल्या. रोज रात्री दोन अडीच पर्यंत जागून सर वह्या तपासायचे याचा शोध आम्हाला त्या दिवशी लागला. सरांचा सात्विक संताप खरा होता. त्यापूर्वी किंवा त्यानंतरही सरांना इतके चिडलेले मी कधीच पाहीले नाही.

कोण्णूर सरांचा सारा भर व्याकरण शिकवण्यावर होता. पहिले चार पाच महिने फक्त काळ शिकवायचे. नंतर पाठ्यपुस्तक शिकवतानाही मुख्य भर व्याकरणावर. परीक्षेच्या दृष्टीने पुस्तकाची तयारी ज्याची त्याने करावी. पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना पोहणाऱ्याला हात द्यावा त्या पद्धतीने शिकवायचे. म्हणजे प्रत्यक्ष पोहण्यासाठी हातपाय तुम्हीच मारले पाहीजेत. इंग्रजी वाक्य घटक पद्धतीने शिकवायचे. घटक दोन प्रकारचे. पहिले जे वाक्यात असलेच पाहीजेत, आणि दुसऱ्या प्रकारात असतीलही. पहिल्या प्रकारातील घटक दोन, कर्ता आणि क्रियापद. ह्या दोनही घटकांशिवाय वाक्य पूर्णच होऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात कर्ता, क्रियापद, कर्म शिवाय ह्या साऱ्या विषयीची अधिक माहिती सांगणारी विशेषणे इत्यादी.कोणी काही चूक केली की ’शेण खाल्लं’ हे त्यांच आवडीच ठरलेल वाक्य होत. साठ मिनिटात किमान पाच सहा वेळां ते शेणावर घसरायचे. वर्गात दोशी नावाचा मुलगा होता. रोज त्याच्या वाट्याला बुट्टीभर शेण यायच. एकदा तर दोशीच्या वाट्याला जे शेण आलं ते आम्ही कोणीच विसरू शकणार नाही.पाहिजेतच असे घटक कर्ता-क्रियापद. कर्ता-दोशी, क्रियापद – खातो. त्यावर विशेषणे जोडता जोडता अखॆर ते वाक्य इतकं मोठ झाल…. दोशी शेण खातो. दोशी रोज सकाळी म्हशीचे बुट्टीभर, ताजे-ताजे शेण, फोडणी देऊन, मिटक्या मारत चवीने खातो . सरांच्या क्लासमधे शेण या शब्दाशिवाय दिवस उजाडायचा नाही, मावळायचाही नाही.वर्गात उशीराने येणाऱ्या मुलांचे स्वागतही खास शैलीत व्हायचे. ’इतक्या सकाळी उकिरडे फुंकत तरंगत कुठे गेला होतास अशा प्रश्नाबरोबरच वर एक छडी खायला मिळायची. कोण्णूर सरांवर तरीही सर्वांच प्रेम होत. त्यांनी मारलेल्या छड्या, दिलेल्या शिव्या गोडच लागायच्या. कारण त्यांनी आमचे इंग्रजी सुधारण्याची जी जादू आमच्या जीवनात केली होती त्याच्यापुढे या साऱ्या गोष्टी किरकोळ वाटायच्या.

एकदा मात्र सरांनी मारलेली छडी माझ्या हाताबरोबरच मनावरही कायमचा ठसा उमटवून गेली. सर वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांना फारसे प्रश्न विचारायचे नाहीत. कोणीच उत्तर देऊ शकले नाही तर मग त्यांच्या मते हुशार मुले जी होती त्यांना शेवटी विचारायचे. सुदैवाने माझा नंबर बहुदा शेवटचा असायचा. खरतर माझ्यापेक्षा जास्त हुशार काही जण होते. पण माझ्या भावाने बोर्डाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे सरांचे माझ्यावर जरा जास्तच प्रेम होते. मला मारायचेही नाहीत. इतर मुलांची त्याबद्दल तक्रारही असायची. इतकच काय ते मला सरळ कात्रे या नावाने हाक मारायचे बाकी कोणालाही त्यांनी सरळ नावाने हाक मारल्याचे माझ्या स्मरणात नाही. सबनीसला सबन्या, मानेला मान्या, पाटीलला पाटल्या अशीच नावे घ्यायचे. सान्या (साने) तुला सांगतो कळंब्याच पाणी पिऊन इंग्रजी येत नाही, हे त्यांच्या आवडीचे विधान होते. कळंबा तलावातून कोल्हापूर शहराला पिण्याचे पाणी पुरवले जाई. म्हणजे इंग्रजी शिकण्याच काम कोल्हापूरवाल्यांच नव्हे हे ते खास त्यांच्या स्टाईलने ऐकवायचे ते ऐकायला जाम मजा यायची. तर एकदा त्यांनी काहीबाही प्रश्न विचारला. मी सरांच्या जवळ त्यांच्या स्टूललगत अगदी पायाशीच बसलो होतो. खुर्ची असती तरी स्टूल हे त्यांचे आवडते आसन होते. प्रश्न विचारतच त्यांनी माझ्याकडे पाहीले. याचे उत्तर वर्गात कोणालाही येणार नाही अशी त्यांची अटकळ होती. त्यामुळे आता बऱ्याच जणांना मार देता येईल असा काहीसा मिष्किल भाव त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. आजपर्यंतचा माझा अनुभव असा होता की माझ्यापर्यंत प्रश्न यायचाच नाही. एखाद्याने तरी उत्तर देलेले असायचे. म्हणून मी उत्तर ठाऊक असल्याचा भाव चेहेऱ्यावर ठेवला. वास्तविक मलाही त्याचे उत्तर ठाऊक नव्हते. जवळ जवळ बारा चौदा जणांना हा प्रश्न विचारूनही माझ्या दुर्दैवाने कोणालाच त्याचे उत्तर देता आले नाही. माझ्या चेहेऱ्यावरील भाव प्रदर्शनामुळे शेवटी सर म्हणाले Yes, now you. पण मला उत्तर येतच नव्हते. हे पाहिल्यावर सर जाम भडकले. ’भोसडीच्या, मला फसवतोस ? म्हणत त्यांनी वेताच्या छडीने जी सपकन माझ्या हातावर लगावली की पुढे पूर्ण एक तास माझ्या हातातून झिणझिण्या येत होत्या. आज कात्रेने मार खाल्ला यामुळे सारे सुखावले. चुकीचे भाव नजरेत ठेवून मी त्यापुढे आयुष्यात कधीही आणि कुणाच्याही सामोरा गेलो नाही. असा प्रसंग आला तर मला प्रथम कोण्णूर सरांची आठवण येते. ती छडी आठवते. आणि ती शिवी सुद्धा, भोसडीच्या मला फसवतोस ?

एकदा मी क्लासला थोडा उशीरा पोचलो. पाहतो तर आज क्लास नव्हता. सुट्टी दिली होती. नेहमी वर्गात बनियन किंवा कधीकधी फक्त धोतर नेसून वर उघडेबंब बसणारे सर आज त्यांच्या पूर्ण पोशाखात एकदम टापटीप दिसत होते. मला थांबवून त्यांनी एक पेढा खायला दिला. सर कसला पेढा अस विचारल्यावर माझ्या एकसष्ठीचा अस सरळ उत्तर ते देऊ शकले असते. पण एकसष्ठी असली म्हणून काय झाल ? ते कोण्णूर सरच होते. कसला पेढा या माझ्या प्रश्नावर त्यांनीच मला प्रतिप्रश्न केला ’पेपर वाचतोस की नाही’ ? मी गप्पच. मग त्यांनी पुढारीमधे आलेली बातमीच मला दाखवली. त्यांच्या फोटोखाली त्यांच्या एकसष्ठीची बातमी होती.

भाषांतर हा कोण्णूर सरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. एका भाषेतील विचार दुसऱ्या भाषेतील विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीप्रमाणे व्यक्त करणे ही त्यांची भाषांतराची सोपी सुटसुटीत व्याख्या होती. कुठल्याही वाक्याचा केवळ शव्दार्थ सांगणे म्हणजे भाषांतर नव्हे यावर त्यांचा सतत जोर असायचा. Oh, God ! म्हणजे फक्त हे देवा नव्हे. माणूस परमेश्वराला साद घालताना काय काय म्हणेल ते सगळ लिहायला सांगायचे. उदा: परमेश्वरा, भगवंता, विठ्ठला पांडुरंगा, अरे रामा इ. इ. एकदा त्यांनी भाषांतर करायला सांगितलेले मराठीतील वाक्य खूप लांबलचक होते. एक मुलगा म्हणाला सर खूप मोठ आहे वाक्य. त्यावर म्हणाले घे छोट वाक्य – विद्या विनयेन शोभते किंवा शेणखाऊ गप्प बस. काय भाषांतर करणार ? कोणी चांगल्या मराठीत भाषांतर केले की खूष होऊन शाबासकी द्यायचे. रागावताना भरपूर शब्दांचा वापर करणारे सर शाबासकी मात्र शक्यतो नजरेतूनच द्यायचे. आम्ही त्यावर खूष असायचो.

त्यांनी सांगितलेली एका वाक्याची विविध भाषांतरे माझ्या चांगलीच लक्षात राहीली आहेत. मूळ इंग्रजी वाक्य होते The old man called his son and said my boy I am going to die now यातील I am going to die now चे भाषांतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे असे केले होते. बाळा, मला आता त्याचे बोलावणे आले आहे. मुला, मला आता पैलतीर दिसू लागला आहे. बाबारे, मी म्हणजे पिकले पान, कधीही गळून पडेन. माझे काही आता खरे नाही. आता मी चीरनिद्रा घेणार आहे. मला बाहेर रेडा उभा दिसतो आहे. मृत्यु कुणाला चुकलाय, मी आता चाललो. मृत्यु आता अगदी समीप येऊन ठेपला आहे तो कधीही झडप घालेल. बाबा, मला यमाने निरोप धाडला आहे, आता गेलेच पाहीजे. माझा इहलोकीचा प्रवास संपला, आता मी तिकडे चाललो. माझे आता शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत, अगदी ताससुद्धा. गंगेचा टाक आहेना रे घरात ?

कोण्णूर सरांनी नुसते इंग्रजी शिकवले नाही. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिली. भाषांतराची ही गंमत चाखण्याची चव दिली. मराठी भाषेचा बाज आणि साज दाखविला. अमृताते पैजा जिंकणारी आमची मातृभाषा कशी समृद्ध आहे त्याचे ज्ञान करून दिले.

SSC परीक्षेत माझ्याकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवाने त्या मी पुऱ्या करू शकलो नाही. माझी अकरावीची परीक्षा झाल्यावर सर स्वत: माझ्या घरी आले होते. माझ्या पेपरची सगळी चौकशी करून मला इंग्रजीत ८१ गुण मिळतील असा त्यांचा अंदाद होता. प्रत्यक्षात ६१ च गुण मिळाले. त्यावेळी माझ्यापेक्षाही कांकणभर जास्तच दु:ख कोण्णूर सरांना झाले हे मी त्यांच्या चेहेऱ्यावर पाहिले.

कोणतीही गोष्ट करण्यामधे एकप्रकारची मनस्विता त्यांनी नेहमी जोपासली. माझ्या काही कविता लिहिलेली डायरी एकदा मी त्यांना पहायला दिली होती.माझी डायरी ’छान आहे’ एवढा ढोबळ शेरा मारून ती ते परत करू शकले असते. पण कोण्णूर सरांच्या ते स्वभावात बसणारे नव्हते. ठलेच
काम त्यांनी Lightly घेतले नाही. माझ्या सगळ्या कविता त्यांनी व्यवस्थित वाचल्या. पुढच्या रविवारी निवांत वेळी मला घरी बोलावले. सरांचा अभिप्राय ऐकायला मी उत्सुक होतो. सर्वसाधारणपणे दहावी अकरावीतला कोणी मुलगा काही तरी लिहितो आहे याच नेहमी कौतुकच व्हायचे. मात्र सर म्हणाले, ’काहीतरी लिहिण्य़ापूर्वी प्रथम खूप वाचल पाहीजे. मग लिहायला लाग’. मी थोडासा नाराजच झालो. पण आज त्या संपूर्ण गोष्टीकडे मी वेगळ्या नजरेने पाहू शकतो. किती मोलाचा सल्ला सरांनी दिला होता. मुख्य म्हणजे माझ्यासाठी भरपूर वेळ काढून अत्यंत आत्मीयतेने मला एक मंत्रच दिला होता.

पुढे कोण्णूर सरांना भेटण्याचा एक दोनदाच योग आला. माझ्या एका मित्राला इंग्रजीमुळे परीक्षेत यश मिळत नव्हते. त्याला तीन चार महिने व्याकरण समजून घ्यायला मदत केली. तो पास झाला. त्या आनंदात पेढे घेऊन मी सरांना भेटायला गेलो होतो. नंतर काही भेटण्याचा योग आला नाही. अचानक कोण्णूर सरांच्या निधनाची बातमी पेपरमधे वाचली. आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वेगळी बाग फुलविणारे, इंग्रजी कशाशी खातात त्याचे ज्ञान करून देणारे, तिरकस आणि शिव्यांनी युक्त भाषा वापरूनही प्रेमाचे झरे पाझरविणारे कोण्णूर सर इहलोकीचा प्रवास संपवून परलोकी गेले. कळंब्याच पाणी वहात वहात हडसन पर्यंत जाऊन मिळाल तरी कात्र्या कळंब्याच पाणी पिऊन इंग्रजी येत नाही हे त्यांच वाक्य अजूनही कानात घुमत आहे.

— श्री.संजय कात्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..