नवीन लेखन...

कुठे आहेत स्त्रियांच्या चळवळी ?

मुंबईतील पोलिस निरीक्षकाने अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराची घटना चर्चेत आहे. आता तर नूतन उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने तपासकार्यावरील दबाव वाढला आहे. वास्तविक कायद्याच्या रक्षकानेच जनतेचे शोषण केल्यास त्यांना अधिक कडक शासन व्हायला हवे. शिवाय स्त्रियांच्या तसेच युवकांच्या सामाजिक चळवळींबरोबरच पुरुषांना स्त्री दाक्षिण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

पोलिसांची सामान्य नागरिकांबरोबरील वर्तणूक चांगली नसते असे आपल्याला नेहमी ऐकायला मिळते. त्यांची आरेरावी, उद्धटपणा, तक्रार लिहून न घेणे, लाच खाणे यात काही नवीन राहिलेले नाही. एवढेच नव्हे तर धनदांडगे आणि समाज शत्रूंशी हातमिळवणी करून काळे धंदे राजरोसपणे चालू देण्याचे प्रकारही घडत असतात. पण, हा कायद्याचा रक्षक स्वत:च भक्षक बनून समोर आला तर काय करणार ? मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकारी अरुण बोरुडे याने एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना म्हणजे रक्षकाचा भक्षक झाल्याचेच उदाहरण ठरेल. ज्या पोलिसांच्या भरवशावर मुलींनी सर्वत्र बिनधास्तपणे फिरावे तेच पोलीस त्यांचा घास घेऊ लागले तर कोणापुढे फिर्याद मांडायची ?

अशा वेळी स्त्री चळवळ महत्त्वाची भूमिका बजावू शकते. 1975 च्या सुमारास स्त्री चळवळींचा एक प्रकारचा दबाव होता. त्या काळात मथुरा या आदिवासी महिलेवर दोन हवालदारांनी अत्याचार केला तेव्हा स्त्री चळवळीमुळेच तिला न्याय मिळाला. 1975 ते 85 या दशकात चळवळींचा धाक होता. पण, आता स्त्रीवादाची टिंगलच केली जाते. 1970 च्या काळात अनेक युवक चळवळी जोमाने उभ्या राहत होत्या. या चळवळींचाही समाजावर वचक होता. परंतु, अशा चळवळींना आता ओहोटी लागली असून प्रत्येक चळवळीमागे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्वार्थ पाहिला जातो. स्त्रीवर अत्याचार केले जातात हा केवळ नीतीमत्तेचा प्रश्न नाही. त्यात सत्तेची मग्रुरी अधिक दिसून येते. आपल्या हातात सत्ता असली की, कोणतीही मुलगी आपल्याला काहीही करू शकत

नाही, असे वाटू लागल्यानंतरच हे प्रकार घडतात. आपल्याकडे एकीकडे लैंगिकतेबद्दल बोलले जाते तर दुसरीकडे समाजातील पुरुष भित्रा आहे. बायकोला अपमानीत करण्यातच त्याचा पुरुषार्थ दिसतो.

दिल्लीमध्ये संध्याकाळनंतर महिलांनी घराबाहेर पडणे सुरक्षित मानले जात नाही. तिथे महिलांचे विनयभंग आणि बलात्काराच्या घटना नेहमी घडत असतात. उत्तर प्रदेश-बिहारसारख्या राज्यांमध्ये कायद्याचे राज्य नसल्यासारखीच परिस्थिती आहे. विशेषत: ग्रामीण भागात जमीनदार जनतेला कस्पटाप्रमाणे वागणूक देतात आणि त्यांच्या लेकीबाळींच्या अब्रूवर घाला घालण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. पण, महाराष्ट्र सारख्या प्रगत आणि सुसंस्कृत राज्याच्या राजधानीत असे घडणे अपेक्षित नाही. एवढ्या मोठ्या शहरात विविध प्रकृतीचे आणि प्रवृत्तींचे लोक राहत असतात. त्यात एखाद्या ठिकाणी विनयभंगाची किंवा बलात्काराची घटना घडत असेलही. परंतु, वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने असे कृत्य करावे ही राज्याची शोकांतिका आहे.

अरुण बोरुडे हे तसे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. एखाद्याचा एन्काऊंटर करण्यात निष्णात असलेला हा अधिकारी ‘वाजा युनुस प्रकरणामुळे चर्चेत आला होता. 2002 मध्ये घाटकोपर येथे बेस्टच्या बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी ‘वाजा युनुसला अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर ‘पोटा’अंतर्गत कारवाई सुरू होती. 2003 मध्ये त्याला पोलिसांच्या वाहनातून औरंगाबादला नेण्यात येत होते त्यावेळी त्या वाहनाला अपघात होऊन त्यात ‘वाजा युनुस बेपत्ता झाला, असे सांगण्यात आले. परंतु, नंतर चौकशीदरम्यान ‘वाजा युनुसचा तुरुंगातच मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यावेळी बोरुडचे नावही पुढे आले आणि त्याला मुंबईबाहेर पाठवण्यात आले. काही वर्षांनी तो पुन्हा मुंबईतील एलटी मार्ग पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झाला. आता 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपामुळे तो पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

या प्रकरणात सर्वप्रथम शांताबाई गायकवाड या महिलेला अटक झाली. या महिलेने संबंधित मुलीला वेश्याव्यवसायाला लावले असा तिच्यावर आरोप आहे. शांताबाई अरुण बोरुडे याच्याकडे घरकामासाठी जात असे. तिच्याकडे त्याने किशोरवयीन कुमारीकेची मागणी केली होती. शांताबाईनेच त्या अभागी 15 वर्षीय मुलीला बोरुडेकडे नेले आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर बोरुडेच्या एका मित्रानेही तिच्यावर अत्याचार केला. पुढे तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. दरम्यान, ती गर्भवती राहिली आणि तिला मुलगी झाली.

या प्रकरणी मोहनचंद शाम आणि चंद्रभान गुप्ता या दोन इस्टेट एजंट्सना अटक झाली असून पोलीस अरुण बोरुडेच्या शोधात आहेत. बोरुडे आजारपणाची रजा घेऊन बेपत्ता झाला आहे. त्याच्यावर अजूनही फिर्याद दाखल झालेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी बोरुडे पीडित महिला आणि तिच्या मुलीची डीएनए चाचणी करून त्यांची पडताळणी करून पहावी अशी मागणी केली आहे. त्यानुसार पीडित महिला आणि तिच्या मुलीचे डीएनए नमुने गोळा करण्यात आले असून बोरुडे सापडत नसल्याने त्याची पडताळणी होऊ शकलेली नाही. या प्रकरणात बोरुडेला कोणत्याही प्रकारे पळवाट ठेवायची नाही असा पोलिसांचा प्रयत्न असून विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी या घटनेची निर्भर्त्सना केली आहे. काही वर्षांपूर्वी मरीन ड्राईव्ह येथील पोलीस चौकीत सुनील मोरे या हवालदाराने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. ही घटनाही त्या घटनेशी साध्यर्म राखणारी आहे. अशा घटनांमध्ये कायद्याचे रक्षकच गुन्हेगार असल्याने पीडित महिला त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्या आल्याच तर त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. तक्रार दाखल झाली तरी प्रकरण दाबून टाकले जाते किंवा आरोपी निर्दोष सुटतात. ही बाब अतिशय गंभीर असून अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी आरोपींना कडक शासन करायला हवे. सर्वसामान्य व्यक्तीने असा गुन्हा केल्यास त्यांना केल्या जाणार्‍या शासनापेक्षा कायद्याच्या रक्षकाने असा गुन्हा केल्यास त्यांना केले जाणारे शासन अधिक कडक असायला हवे. अंगावर पोलिसाची वर्दी असेल तर आपल्याला कोणीही हात लावू शकत नाही ही घमेंड उतरावयाला हवी. अशा

घटनांमध्ये तपास यंत्रणांमध्ये

कच्चे दुवे ठेवले जातात. त्यामुळे कार्यक्षम आणि नि:पक्षती तपास होणे गरजेचे असते. या घटनेत आरोपीने अत्याचार करताना खोलीत अंधार केल्याने सं
ंधित मुलीला त्याचा चेहरा नीट दिसू शकला नाही. त्यामुळेच डीएनए चाचणी महत्त्वाची ठरणार आहे.

या प्रकरणाचा निकाल काय लागेल ते लागो पण सार्वजनिक जीवनात प्रत्येक पुरुषाला प्रशिक्षण द्यायला हवे. देशाच्या सार्वभौमत्वाची शपथ घेतली जाते तशीच प्रत्येकाने स्त्रियांचा आदर करण्याचीही शपथ घेतली पाहिजे. इरावती कर्वे आणि पंडिता रमाबाई यांच्यासारख्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या महाराष्ट्रात असे प्रश्न निर्माण व्हायला नकोत आणि झाले तरी आरोपींना कठोर शासन व्हायला हवे. राज्य सरकारकडून इतर प्रश्नांबरोबरच गुंतागुंतीच्या स्त्री प्रश्नांकडेही लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा आहे.

(अद्वैत फीचर्स)

— विद्युत भागवत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..