नवीन लेखन...

कामगार – एक माणूस – एक समाजाचा घटक!

 माझे वडील मार्क्सवादी कामगार चळवळीतले कार्यकर्ते असल्यामुळे लहानपणापासूनच आमच्या घरात कॉ. कृष्णा खोपकर, कॉ. फडके, कॉ. हरिभाऊ लावर इ. कामगार चळवळीतल्या त्या काळातल्या निःस्वार्थी, प्रामाणिक कामगार कार्यकर्त्यांचा व पुढा-यांचा राबता होता व त्यामुळे अर्थातच संस्कारक्षम वयात त्यांच्या कार्याचा मनावर प्रभाव होताच, पण वाढत्या वयात जसजशी समज येऊ लागली, तसतशी त्यांच्या एकूणच कामगाराविषयीच्या व भांडवलशाही विषयक धारणांची आणि धोरणांची मर्यादाही ध्यानात येऊ लागली. अर्थात त्या काळात जेव्हा नुकतीच कामगार चळवळ देशात-परदेशात बाळसं धरू पहात होतीय अशा प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर, मी उपरोल्लेखित कार्यकर्त्यांच्या व पुढा-यांच्या कामगार चळवळीतल्या योगदानाला कमी लेखत नाही किंवा कुठल्याही प्रकारे दूषणही देत नाही. ही सगळी मंडळी जी कामगारांसाठी खस्ता खात आयुष्यभर अक्षरशः पञ्यांच्या शेडमध्ये संसार करत जगली, ती मला आजही वंदनीयच वाटतात. तरीही कामगारांकडे प्रामुख्याने एक संघर्षाचे माध्यम याच नात्याने पाहण्याचा त्यांचा संकुचित दृष्टीकोन आणि कामगारांमधला ’माणूस घडवण्यात’ प्रारंभीच्या कामगार नेतृत्वाला आलेलं अपयश किंवा त्याबाबतीतील त्यांची अनिच्छा, हे सगळं अस्वस्थ करणारं होतं आणि दुर्दैवानं एवढा काळ लोटून, कामगार चळवळीला सुयोग्य ’दिशा’ मिळण्याऐवजी तिची ’दशा’ झाल्यानंतरही परिस्थितीत आजही फारसा फरक पडल्याचं जाणवत नाही, ही तर अधिकच खेदाची बाब आहे!

हा केवळ नेतृत्वाचा दोष मानायचा, व्यवस्थापनांच्या बदमाषीचा मानायचा, एकूणच सामाजिक परिस्थितीचा मानायचा की, दोषाची तर्जनी कामगारांकडे रोखायची, या गोंधळलेल्या मनोवस्थेत असतानाच 1981&82 च्या दरम्यान योगायोगानं तेव्हाच्या ’खिमलाईन पंप्स्’ (सध्याच नांव सुल्झर पंप्स् इं. लि.) या छोटेखानी इंजिनियरींग कंपनीत, कामगार चळवळीच नेतृत्व करण्याची जबाबदारी आली आणि ख-या अर्थानं माझ्या ’सामाजिक – प्रयोगाला’ सुरूवात झाली! ईश्वरीकृपेनं नवनव्या सामाजिक जाणिवांना व बदलांना सामोरं जात, आजही हा प्रयोग ’सुफल’ होऊनही ’संपूर्ण’ झालेला नाही – अव्याहत – अहर्निश तो सुरूच आहे. तसा तो सुरू रहाण्यातच कदाचित त्याची यशस्विता दडलेली असावी!

’सातत्यानं बदल’ हा विश्वाचा स्थायीभाव जरी असला, तरी जगातील मूलभूत गोष्टी युगानयुगं शाश्वतच रहातात! उदा. सूर्यच प्रकाश देणार, पाणीच तहान भागवणार, आपला श्वासोच्छ्वास हवेतूनच होणार किंवा मातीच मुळांना आधार देणार इ. म्हणूनच मानवी संस्कृतितील शाश्वत-मूल्यांची ओळख आणि जपणूक जाणिवपूर्वक एखाद्या समूहाकडून करवून घेणे, अत्यंत महत्वाची बाब ठरते. हे ’कर्म’ सतीच्या वाणासारखं ’महाकर्मकठीण’ असलं तरीही अशक्य नव्हे तर अत्यावश्यक आहे, हे जाणूनच काळजीपूर्वक संस्कृतिच्या पाऊल-खुणा छोटयाशा कंपनीच्या परिसरात उमटवायला सुरूवात केली – त्या घटनेला आता जवळ जवळ दोन तपं उलटून गेली!

’कृष्णं वंदे जगत्गुरू’ या नात्यानं मी व्यक्तिशः ’कृष्णमय’ तर केव्हाच झालो होतो, पण प्रश्न कामगारांच्या बौध्दिक क्षमतेला झेपेल-पेलेल असा, स्थलकालसापेक्ष संस्कृति-आधार त्यांच्या नजरेसमोर सदैव ठेवण्याचा आणि तद्नुरूप निश्चयपूर्वक पाऊलं टाकण्याचा होता! ज्याने श्रीकृष्णाची तहहयात भक्ति करीत, त्याला ’प्रेरणास्त्रोत’ मानून त्याच्याच जीवन-संदेशानुसार आपल्या राज्यकारभाराचा गाडा अत्यंत बिकट परिस्थितीत हाकला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच्या परता मग दुसरा संस्कृति-आधार तो कुठला असू शकतो?

या दृष्टीकोनातूनच शिवछत्रपतींना केंद्रस्थानी मानून सर्वसमावेशक ठरेल असं कामगार संघटनेचे ध्येयधोरणांच ’मार्गदर्शक-सूत्र’ पूर्ण विचारांती आखण्यात आलं आणि आत्मगौरवाचा दोष पत्करूनही ज्याचा गौरवपूर्वक उल्लेख व्हायलाच हवा, अशी गोष्ट म्हणजे कुठल्याही व्यक्तिचा किंवा प्रसंगाचा मुलाहिजा न ठेवता, आजवर अत्यंत निष्ठेनं व कसोशीनं त्याचं पालन केल गेलयं!हे ’मार्गदर्शक-सूत्र’ संघटनेच्या कार्यालयात खालीलप्रमाणे शब्दबध्द करण्यात आलयं……

सुल्झर पंप्स् कामगार संघटनेचे ब्रीद ः- ”कामगार कल्याण, संस्कृति निर्माण आणि न्यायदान“

माझी प्रार्थना-

”माझ्या देहात प्राण असेस्तोवर आणि जोवर हा कामगार मला त्याच्या ‘न्याय्य‘ हुंकाराचा प्रणेता मानतो तोवर हे परमेश्वरा, कामगारांच्या जीवनात प्रकाशाची मशाल धरण्याचे बळ तू माझ्या दो करांना दे!!!“

माझं दैवत-

१) सद्रक्षणासाठी आणि खलनिग्रहणासाठी ज्याने धर्माचे राज्य निर्मिले.२) दया,क्षमा,शांती हे ब्रीद मानिले, प्रसंगी शत्रूलाही ममत्वाने आपलेसे केले.३) धर्म आणि माणुसकीचा वैरी झालेल्या शत्रूच्या विनाशासाठी प्रसंगी स्वतः शस्त्र करी धरीले.४) ज्याने फक्त न्याय आणि न्यायच केला आणि न्यायदानासमयी नाती-गोती, शत्रू-मित्र, धर्म, पंथ, जातपात यांचा विचारही मनास स्पर्शू दिला नाही.५) प्रबळ आणि राक्षसी वृत्तीच्या शत्रूच्या निःपातासाठी गनिमी कावा केला, कपटाला कूटनितीचा शह दिला.

असा हा धैर्याचा मेरूमणी, प्रजाहितदक्ष, नेतृत्वाचा हिमालय, मर्यादापुरूष, धर्म-संस्कृति रक्षक, राष्ट्रविधाता ‘छत्रपती शिवाजी राजा‘ माझं आराध्य दैवत आहे!

माझा निश्चय-

”माझी योग्यता शिवछत्रपतींच्या पायधुळीसमान जरी असो, तरीही माझ्या संघटनाकार्यात शिवाजी महाराजांच्याच राजनितीचं प्रतिबिंब ठायी ठायी पडेल, याची दक्षता घेऊन माझी प्रत्येक कृति अहंकाराला पूर्णतः तिलांजली देऊन, शिवछत्रपतींच्या पावन चरणी समर्पित करेन!!!“ — राजन राजे

त्यातूनच नैसर्गिक न्याय्यतत्वांना अनुसरून असलेली एक महन्मंगल, शाश्वत व अतुलनीय अशी ‘कार्य-संस्कृति‘ आमच्या कंपनी परिसरात टप्प्या-टप्प्याने, पण निश्चितपणे उभी राहायला लागली. हीच ‘कार्य-संस्कृति‘ गेल्या २०-२५ वर्षातील विविध पातळींवरील आपत्ति-अडीअडचणींना तोंड देताना कर्मचा-र्यांच्या हित रक्षणासाठी अभेद्य ढालीसारखी उभी राहिली. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती‘ या उक्तिनुसार मोठमोठया कंपन्या मंदीच्या, आधुनिकीकरणाच्या व जिवघेण्या स्पर्धेच्या तडाख्यात धडाधड बंद पडत असतानाही, ही छोटेखानी कंपनी नुसतीच पाय रोवून उभी राहीली असं नव्हे, तर तिनं प्रगतिचा वेगही कायम राखला व विविध स्तरांवरील कर्मचा-र्यांच्या आर्थिक हिताची व व्यक्तिगत प्रगतिची काळजी वाहिली.

हा सामाजिक-प्रयोग पार पडत असताना नित्यनवीन पेचप्रसंगांनी आमची सत्वपरीक्षा पाहिली, पण त्याचबरोबर केवळ कामगार चळवळीकडेच नव्हे, तर एकूणच राजकीय व सामाजिक, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे पहाण्याची ‘नवी जीवनदृष्टी‘ दिली, त्याबद्दल आज त्या असंख्य अडीअडचणीं संकटांविषयी कृतज्ञभाव वाटतो व नव्यानं प्राप्त झालेल्या या परानुभवी नव्हे स्वानुभावी जीवनदृष्टी बद्दल पुन्हा वेळोवेळी लिहिता येईलच!

— राजन राजे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..