एकतर्फी की दुतर्फी-२

ज्यांना आपण एकतर्फी आरसा मानतो त्यांना वैज्ञानिक भाषेत दुतर्फीच म्हटलं जातं. आपल्या नेहमीच्या आरशामध्ये काचेच्या एका बाजूला पार्‍यासारख्या परावर्तक पदार्थाचा जाड सलग थर दिलेला असतो. त्यावर पडणारे प्रकाशकिरण मोठ्या प्रमाणात परत उलट्या दिशेनं फिरवले जातात. काही थोडेफार शोषले जात असतील. पण त्या थरामधून वाट काढत एकही किरण पलीकडे पोचू शकत नाही. पण परावर्तित पदार्थाचा हा थर जाड न ठेवता पातळसा, नेहमीच्या रेणूंपेक्षा समजा अर्धेच रेणू असतील असा ठेवला तर मग हा विरळसा थर त्या काचेचा सारा पृष्ठभाग व्यापून टाकतो.

त्यामुळं त्याच्यावर पडलेले बहुतांश किरण परावर्तितच होतात. पण आता शेजारशेजारच्या दोन रेणूंमध्ये काही अंतर असल्यामुळं काही चुकार किरण त्यांच्यामधून वाट काढत पलीकडे पोचतात. पण तसं असेल तर मग दोन्ही बाजूकडच्या प्रेक्षकांना आपल्या प्रतिमेबरोबरच पलीकडची व्यक्तिही दिसायला हवी. तसं होणार नाही याची व्यवस्था करण्यासाठी मग त्या दोन बाजूंकडील प्रकाशयोजना वेगळ्या प्रकारे केली जाते. ज्या बाजूला साक्षीदार असतो ती बाजू अंधुक प्रकाशात ठेवली जाते. त्यामुळं त्या प्रकाशातले काही चलाख किरण पलीकडे पोचलेच तरी ते साक्षीदाराला पाहता येईल इतके नसतात.

उलट संशयितांच्या बाजूला प्रखर प्रकाश ठेवला जातो. त्यामुळं तिथून बरेच किरण पलीकडे पोचतात आणि साक्षीदाराला संशयितांना व्यवस्थित पाहता येतं. शिवाय त्या प्रखर प्रकाशापोटी संशयितांना फक्त स्वतःच्याच प्रतिमा स्पष्टपणे दिसतात. एखाद्या खोलीत कुजबूज चाललेली असेल आणि शेजारच्या खोलीत कोणी तारस्वरात किंचाळणारं रॉक संगीत लावलेलं असेल, तर ते संगीत पलीकडच्या खोलीत कुजबूज करणार्‍यांच्याही कानठळ्या बसवील. पण त्यांची कुजबूज काही शेजारच्या खोलीत ऐकू येणार नाही. तशातलाच हा प्रकार. म्हणजे आवाज काय किंवा प्रकाश काय दोन्ही बाजूंना जात असतात. त्यांची तीव्रता मात्र वेगवेगळी असते. म्हणून वास्तविक प्रवाह दोन्ही दिशांनी वाहत असताना आपल्याला तो एकाच दिशेनं वाहत असल्यासारखा वाटतो. तो एकतर्फी आहे ही आपली समजूत. वास्तविक तो दुतर्फीच असतो.

— डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…