नवीन लेखन...

इस्त्राईल-पॅलेस्टाईन संघर्षा दरम्यान भारताची भूमिका

 

गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका व त्यांच्यासह इतर अनेक देश इस्त्राईल पॅलिस्टाईन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वर्षांपूर्वी पॅलिस्टाईनचे नेते यासर अराफत आणि त्यावेळचे इस्त्राईलचे पंतप्रधान यांना त्यांच्या दरम्यान झालेल्या करारामुळे नोबेल पुरस्कारही देण्यात आलेला होता. परंतु या करारावर अंमलबजावणी झालेली नाही. थोडक्यात हा एक असा विषय आहे, ज्याबाबतीत मोठ्या प्रमाणात जगाने गुंता सोडविण्यासाठी आणि तेथे शांतता निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. कारण हा प्रश्न अरब राष्ट्र आणि इस्त्राईल यांच्यामधील खराब संबंधाचे मूळ कारण आहे. १९४८ सालापासून वेगवेगळे पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख सगळ्यांनी यासाठी प्रयत्न केला आहे. अनेक करारांवरही याबाबत सह्या झालेल्या आहेत. पण अजूनही तिथे शांतता निर्माण झालेली नाही. या मागे दोन कारणे आहेत. त्यापैकी पहिले कारण म्हणजे दोघांनाही एकमेकांविषयी अविश्वास वाटतो. या दोन्ही गटांमध्ये पॅलेस्टाईन आणि इस्त्राईलच्या दोन्हीकडच्या सामान्य लोकांना शांतता हवी आहे. पण याच बरोबर इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन दोन्ही बाजुला असे उग्रवादी गट आहेत. जे एकमेकांचे जन्माचे शत्रु आहेत. पॅलेस्टाईनमध्ये हमास नावाचा एक दहशतवादी गट आहे. हा गट नेहमी इस्त्राईलवर दहशतवादी हल्ले करत असतो. या हमास दहशतवादी गटाला अरब राष्ट्रांचा पाठींबा असतो. हमासने दहशतवादी कृत्य केले की त्याला उत्तर म्हणून इस्त्राईल त्यांच्यावरती हल्ले करतात. या हल्ल्यादरम्यान पॅलेस्टाईनमधील हमासचे दोन तीन दहशतवादी मृत्यूमुखी पडतात, पण त्याचबरोबर आजूबाजूला राहणारी सामान्य माणसेही मृत्यूमुखी पडतात. आणि त्यातून नवे हमासचे दहशतवादी तयार होतात. हे जे एकमेकांचे सूड घेण्याचे, हल्ला-प्रतिहल्ला करण्याचे राजकारण आहे त्याचा कुठे शेवट दिसत नाही. हे महाभारत १९९३ सालापासून सुरू आहे. १९८७ सालापूर्वी हमास ही संघटना अस्तित्वात नव्हती.

नवीन संघर्षाचे कारण
गेल्या आठवड्यापासून हा संघर्ष पुन्हा सुरु होण्या मागचे कारण म्हणजे, हमासने इस्त्राईलच्या तीन तरुणांना मारले. ही कृती होताच इस्त्राईलने त्यांच्या विरुद्ध आक्रमक कारवाई सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून इस्त्राईल त्यांच्यावर हवाई हल्ले करत आहे. हवाई हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी हमास त्यांच्याकडच्या क्षेपणास्त्रांचा वापर करून त्यांच्यावर प्रतिहल्ला करत आहे. त्यामुळे दोन्हीकडे निरपराध माणसे मरत आहेत. यामध्ये इस्त्राईलची ताकद जास्त असल्यामुळे सध्या उपलब्ध असणार्याा आकडेवारीनुसार ५०० हून अधिक पॅलेस्टीनी मारले गेल्याचे दिसून आले आहे आणि २५ किंवा २६ इस्त्राईली सामान्य माणसे आणि १८ सैनिक मारले गेल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहाता दहशतवादी गटाविरुद्ध इस्त्राईलने कारवाई केली तर फारसे कुणाला वाईट वाटायला नको. पण अशा हल्ल्यांमध्ये ज्यावेळी सामान्य माणसे मरतात त्यावेळी ही समस्या अधीक गंभीर बनते. या संघर्षातून हमासला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे इस्त्राईलला नष्ट करणे होय आणि इस्त्राईलच्या हार्ड लायनर्सला वाटते की, याविरुद्ध कडक कारवाई केल्याशिवाय आणि हमासला पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय इस्त्राईलचा हा प्रश्न संपणार नाही. एक दोन वर्षांपूर्वी हमासचा लष्करी शाखेचा कमांडर आब्दल जव्हारी याला मारले होते. पण त्याला मारल्यानंतर देखील हिंसाचारात काही कमी झालेली नाही. कारण एक नेता गेला म्हणजे तिथे दुसरा निर्माण होतो. त्याप्रमाणे येथे दुसरा नेता तयार झाला.
पॅलेस्टीनी इन्तीफदा
दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे ज्यावेळी हमास आणि इस्त्राईलचा संघर्ष सुरू नसतो तेव्हा तिथे एक गोष्ट सुरु असते. त्याला म्हणतात “इन्तीफदा” इन्तीफदा म्हणजे, इस्त्राईलचे लष्कर ज्यावेळी तिथे काही करायला येते तेव्हा तेथील लोकं बायका आणि मुलांना पुढे करतात आणि त्यांच्या विरुद्ध दगडफेक, आरडाओरडी करतात. इंग्लिशमध्ये त्याला ‘एजिटेशनल टेररिझम असे म्हणतात. गेल्या दहा वर्षांत हे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. हे कधी संपेल याचे उत्तर जगात कुठेच नाही आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी युनो, अरब राष्ट्रे, मुस्लिमराष्ट्रे, अमेरिका सारेजण प्रयत्न करत आहेत. पण ते यशस्वी होत नाहीत. इजिप्त हे असे राष्ट्र आहे ज्याने इस्त्राईलशी शांतता प्रस्थापित केली आहे. या देशानेही बरेच प्रयत्न केले. हा शांतता प्रस्ताव इस्त्राईलने मान्य केला पण पॅलेस्टाईन खास करून हमासने तो फेटाळला. इस्त्राईल आणखी एक प्रयत्न करत आहे की, या पॅलेस्टिनीयनांना जी वीज जाते, पाणी जाते ते बंद करून त्यांची आर्थिक नाकेबंदी करतात. त्यामुळे लोकांना खूप त्रास होणार हे स्पष्ट आहे.
सध्या हे पॅलेस्टीने गाझापट्टीत आहेत. ही केवळ ४० किलोमीटर लांब आहे आणि दहा ते बारा किलोमीटर रुंद आहे. या चिंचोळ्या भागात १५ लाखांच्या वर पॅलेस्टिनी राहतात आणि सध्याचा संघर्ष याच ठिकाणी सुरु आहे. ज्यावेळी यासर अराफत सारखे नेतृत्व तेथे होते त्यावेळी एवढ्या समस्या नव्हत्या पण जेव्हापासून हे नेतृत्व कट्टरवाद्यांच्या हातात गेले तेव्हापासून हा संघर्ष जास्तीतजास्त चिघळत आहे. या संघर्षाला उत्तर गेल्या ६०-६५ वर्षांपासून मिळालेले नाही. हे उत्तर केव्हा मिळेल हे येणारा काळच सांगू शकेल.
भारताने काय केले पाहिजे
या परिस्थितीमध्ये भारताने काय केले पाहिजे असा प्रश्न निर्माण होतो. इस्त्राईल-पॅलेस्टाईन प्रश्नाबाबत भारताच्या संसदेत चर्चा होणार नाही असा पवित्रा भारत सरकारने सध्या घेतला होता. कारण भारतात यापेक्षा खूप मोठे आणि गंभीर प्रश्न चर्चेसाठी आहेत. त्यावर तोडगा काढणे अधिक गरजेचे आहे असे त्यांना वाटते, आणि ते खरेही आहे. मागच्या सरकारला वारंवार विरोधकांनी संसद बंद पाडल्यामुळे बरेचशे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावता आले नव्हते. कारण वेळोवेळी संषर्घ होऊन संसदेचे कामकाज बंद पडत होते आणि सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी न लागल्यामुळे मागच्या सरकारला मोठा पराभव पत्करावा लागला. यामुळेच आपली औद्योगिक प्रगती, आर्थिक प्रगती जणू थांबल्यासारखी झाली होती. त्यामुळे भारतातील प्रश्न सुटल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय प्रश्नांकडे बघू शकतो असा एक विचार यामागे आहे.
आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि आपले राष्ट्रहीत
आजच्या घडीला आपण जर आंतरराष्ट्रीय प्रश्नांकडे बघायचे ठरवले तर पन्नास ठिकाणी वेगवेगळे प्रश्न चिघळत आहेत. अफगाणीस्तान, पाकिस्तानातील दहशतवाद, इराक येथील अंतर्गत संघर्ष, पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार अशा घटनांचा परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने भारतावर होताना दिसतो. त्यामुळे चर्चाच करायची असेल तर अशा सगळ्या घटना ज्याच्या भारतावर परिणाम होतो, त्यावर करायला हवी ती गोष्ट समजता येण्याजोगी आहे. पण केवळ इस्त्राईल पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर चर्चेचा आग्रह धरून संसदेचे कामकाज बंद पाडणे योग्य नव्हते. जगामध्ये कुठलाही प्रसंग घडला तर त्यामुळे भारतावर काय परिणाम होईल हे आपण बघितले पाहिजे. युक्रेन या देशावरून जाणारे विमान रशियाने पाडले, त्यात बरेच लोक मारले गेले. त्या मार्गावरून नंतर आपल्या पंतप्रधानांचे विमान जाणार होते. त्यामुळे आपण अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे की, भारताच्या दृष्टीने जे अशांत भाग आहेत ते भाग टाळून आपण वेगळे मार्ग प्रस्थापित केले पाहिजे. आपण सर्वात पहिले भारतीयांचे रक्षण केले पाहिजे. भारत देशाचे जे हितसंबध आहेत त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि ज्या आंतरराष्ट्रीय समस्या आहेत त्यामध्ये आपली भूमिका, आपले धोरण असे असले पाहिजे की, आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवणे इतके सोपे नसते.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे एक असे तत्व वापरायला पाहिजे की, जिथे आपले जास्त राष्ट्रहीत आहे त्या देशाच्या बाजूनेच आपण मतदान केले तर ते जास्त चांगले ठरू शकते आणि ज्या ठिकाणी कोण बरोबर कोण चूक हे सांगता येत नाही, म्हणजे इराणमध्ये शिया विरुद्ध सुन्नी लढाई चालू आहे अशा ठिकाणी आपण कोणाची बाजू घेण्यात काहीच अर्थ नाही. कारण तिथे आपले दहा हजार भारतीय अडकले आहेत. त्यामुळे कुठल्याही पंथाच्या दहशतवाद्यांनी भारतीयांना पकडले तरी आपले नुकसानच आहे. त्यामुळे ज्यावेळी अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील आंतरराष्ट्रीय हिंसाचार, समस्या सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे आहेत. आपण एवढेच सूचवायचे की या कायद्यांचे वापर करून त्या भागात लवकरात लवकर शांतता निर्माण व्हायला हवी. आपण कुठल्याही पक्षाची बाजू न घेता अलिप्त राहिले पाहिजे आणि एवढेच सुचवायला पाहिजे की, हिंसाचार थांबवा, वाटाघाटी करून तुमच्यातले प्रश्न सोडवा. वाटाघाटींसाठी आंतरराष्ट्रीय कायदे हा मुलाधार असावा. कोणा एकाची बाजू घेऊन आता आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या दलदलीमध्ये फसण्याची शक्यता असते. यामुळे जे नुकसान होईल ते आपलेच होईल. त्यामुळे नको तिथे नाक खुपसण्याची आपल्याला काहीही गरज नाही. राष्ट्राचे हितच पाहणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रश्नाबाबत अशाच प्रकारचे आपले धोरण असले पाहिजे.
पॅलेस्टिनीं धोरणामध्ये काहीही बदल नाही
नुकतेच राज्य सभेमध्ये याबाबत चर्चा झाली, त्यावेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, गेल्या पन्नास वर्षांपासून सरकारच्याा धोरणामध्ये आपण काहीही बदल केलेला नसून आपण अजूनही त्या भूमिकेवर ठाम आहोत. या धोरणानुसार पॅलेस्टिनींना गाझापट्टीची भूमी स्वतंत्र करून द्यावी असे आपल्या धोरणात म्हटले आहे. तेथे आंतरराष्ट्रीय प्रयत्न चालू आहेत. संसद बंद पाडून काही उपयोग होणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून जे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत, जी बिले संमत्तीच्या प्रतिक्षेत आहेत ती मार्गी लावणे जास्त गरजेचे आहे. महागाई कशी कमी करायची, देशातील नक्षलवाद, दहशतवाद कसा कमी करायचा, सामाजिक प्रश्नांवर काय मार्ग काढायचा यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.


— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..