‘इराणमधून सुटका’ हे सुझान आझादी आणि अँजेला फेरान्ते यांचे स्वानुभवावर आधारित अनुभवकथन. विदुला टोकेकर यांनी केलेला हा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिग हाऊसने प्रकाशित केला आहे. इराणमधील सामाजिक, धार्मिक संस्कृतीचा परामर्श या पुस्तकात घेतला आहे. शाहच्या इराणमध्ये श्रीमंत, पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असलेल्या उच्चभ्रू कुटुंबात सुझानचा जन्म झाला. शाहचा पाडाव झाला. त्यानंतर आलेल्या खोमेनीच्या राजवटीने सुझान आणि तिच्या कुटुंबिय, आप्तेष्टांवर सैतानाचे अनुयायी असा शिक्का मारला. त्यांची मालमत्ता जप्त झाली. पतीचा मृत्यू आणि त्यानंतर मुलांमध्ये केलेला बुद्धीभेद यामुळे समाजाला सुझान हे सोपे सावज झाले होते. तिला तुरुंगात डांबण्यात आले. तिच्या वर्तनावर आक्षेप घेऊन तिचा छळ करण्यात आला. हा सगळा छळ तिने धीरोदात्तपणे सहन केला आणि इराणमधून सुटका हे आत्मकथन लिहिले. हे आत्मकथन वाचकांना गुंगवून ठेवते. झपाटून टाकते.
सुझान आझादी यांचे जीवन अनेक चढ-उतारांनी बनलेले आहे. गर्भश्रीमंत माता-पितांच्या पोटी जन्माला आलेल्या सुझान यांचा विवाहही अशाच गर्भश्रीमंत व्यक्तीबरोबर झाला. त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यल्प ठरले. पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींचा जाचहाट त्यांना सहन करावा लागला. अर्थात, आर्थिक संपन्नतेच्या बाबतीत त्यांना कैद होईपर्यंत कोणतीच विवंचना त्यांना भासली नाही. मात्र त्यानंतर इराण सोडून त्यांना परदेशात अत्यंत सामान्य जीवन जगावे लागले. एकेकाळी हजारो-लाखो डॉलर्स मुक्तहस्ते उधळणार्या आझादींवर मुलासोबत सामान्य जीवन जगण्याची वेळ आली. लेखिकेने हे सर्व चढ-उतार आयातुल्ला फोमिनी यांच्या दहशतवादी राजवटीचे चित्र, नोकरशहांची दादागिरी, भ्रष्टाचार यांचे वर्णन वास्तवदर्शी केले आहे. कथानकात वाचक अक्षरशः गुंग होऊन जातो आणि आझादीच्या जीवनपटात गुंतून जातो.
पुस्तकाचे नाव ः ‘इराणमधून सुटका’, लेखक ः सुझान आझादी आणि अँजेला फेरान्ते, अनुवाद ः विदुला टोकेकर, प्रकाशक ः मेहता पब्लिशिग हाऊस, किमत ः २५० रुपये, पृष्ठे ः
२८६.
‘अदान अॅण्ड ईव्हा’ या पुस्तकाचा अनुवाद उज्ज्वला गोखले यांनी केला आहे. सोमाली येथे जन्मलेल्या अयान हिरसी अली जागतिक कीर्तीच्या लेखिका आणि राजकीय नेत्या आहेत. वडिलांनी ठरवलेले लग्न मान्य नसल्याने त्यांनी घर सोडले आणि नेदरलँड येथे आश्रय घेतला. तेथेच त्यांनी राज्यशास्त्रात पदवी मिळवली आणि नंतर तीन वर्षे डच संसदेत सदस्य म्हणून काम केले. या काळात त्यांना आलेले अनुभव, धर्माबद्दलची मते, त्यांच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेवर जहालवाद्यांनी त्यांच्यावर केलेली टीका या सगळ्याचे चित्रण ‘अदान अॅण्ड ईव्हा’ या पुस्तकातून केले आहे. या पुस्तकातून लहान मुलांची आयुष्य सोपी नसतात हे अधोरेखित करताना लहान वयापासूनच मुलांनी वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि याकडेच आपण दुर्लक्ष करतो हे महत्त्वाचे तत्त्व मांडले आहे.
अयान हिरसी अली आणि अॅना ग्रे लिखित या गोष्टीत अदान आणि ईव्हा या किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचे खूप सुंदर वर्णन केले गेले आहे. पूर्णपणे भिन्न धर्म, संस्कृती आणि सामाजिक परिस्थिती असलेली दोन कोवळी मुले योगायोगाने एकत्र येतात आणि दोघांच्याही एकाकी जीवनात एक अनोखे मैत्र निर्माण होते. अयान अली यांनी ती कथा वास्तवतेच्या सरल पातळीवर नेली आहे. लहान मुलांचे भावविश्व आणि त्यात मानवनिर्मित धर्म, संस्कृतीच्या आणि सामाजिक आशयांच्या भाषांच्या भिती याची थेट जाणीव करून दिली आहे. मुलांच्या नैसर्गिक वागण्यात मानवनिर्मित व्यवहारांचा लवलेश नसतो. मात्र, मुलांनाही सामाजिक परिस्थितीच्या चौकटीत नाईलाजाने रहावे लागते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. लेखिका बंडखोर आहेत. त्यांची नाळ समाजाशी जुळलेली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या पोहोचल्या आहेत. त्यामुळे वास्तवाचे भान त्यांच्या लिखाणात कायम डोकावत रहाते.
या घटनांचा दोन्ही समाजांतील शहाण्यासुरत्या माणसांनी लावलेला अर्थ आणि त्यावरील त्यांची प्रतिक्रिया, यातून वर्तमानातील काही सत्य प्रसंगांची आठवण होते आणि परिस्थितीचा कसा विपर्यास होऊ शकतो याची प्रचिती येते. पुढे ठाकलेल्या प्रसंगाची कल्पना असूनही आपला आशावाद हरपू न देता ही दोन निरागस मुले जी स्वप्ने रंगवतात, त्यावर फक्त तथास्तु एवढेच म्हणावेसे वाटते.
पुस्तकाचे नाव ः ‘अदान अॅण्ड ईव्हा’, अनुवाद ः उज्ज्वला गोखले, प्रकाशक ः मेहता पब्लिशिग हाऊस, पुणे, किमत ः ५० रुपये, पृष्ठे ः ६७.
सलमा अहमद यांनी स्वानुभवावर लिहिलेले ‘कटिग फ्री’ हे विलक्षण पुस्तक आहे. याचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपेक्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांच्या जीवनातले बिझिनेस, राजकीय कारकीर्द आणि कौटुंबिक जीवन, अतिशय उत्तुंग, नाट्यमय क्षण रोमांचित करतात तर काळ्याकुट्ट क्षणी त्यांनी दाखवलेलं धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच तत्कालीन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन वाचकांसमोर उलगडले जाते. सलमा अहमद यांचे बालपण राजकारणी व्यक्ती आणि मुत्सद्दी मंडळींच्यात गेले आहे. वडील राजदूत असल्यामुळे लहानपणापासून राजकीय घटनांमधील अन्वयार्थ त्यांना चांगल्या पद्धतीने समजत होता. तो त्यांनी राजकीय पक्षाशी संलग्न होताना अधिक परिपक्व केला. उद्योग, व्यवसाय आणि राजकारण यात यशस्वी होत असताना, त्यांना याचा उपयोग झाला. इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भेटी तसेच पुस्तकात असलेली त्यांची छायाचित्रे, वाचकांशी होत असलेला संवाद अधिकच मनोहारी करतात.
खरे तर सलमा अहमद यांनी १९७० मध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. मात्र, त्यापूर्वी १९६७ मध्ये स्वतःची पहिली इंडस्ट*ी त्यांनी स्थापन केली. जहाज मोडणीच्या कामात त्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च यश होते. कारण
अशा प्रकारचे काम करणार्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. त्यांनी पाकिस्तान ‘असोसिएशन ऑफ
विमेन’ची स्थापना केली. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून गेल्या ५० वर्षांमधील सर्वात यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांना प्रियदर्शनी पुरस्कार देण्यात आला. कालांतराने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९७७ मध्ये ऑल पाकिस्तान मुस्लिम लिग या पक्षात त्या सामील झाल्या. त्यांचा हा प्रवास नाट्यमय आणि वाचकांना रोमांचित करणारा आहे. बिझिनेस आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत वूमन ऑफ सबस्टन्स ठरलेल्या सलमा अहमद यांचं हे विलक्षण अनुभवकथन स्त्रीशक्तीच्या अफाट सामर्थ्याची ओळख करून देते.
Leave a Reply