आई आणि मुलगी

सायली राजाध्यक्ष यांचा WhatsApp वरुन आलेला हा लेख शेअर करत आहे…


कितीही वय वाढलं तरी आई आणि मुलगी हे नातं काही फारसं बदलत नाही. म्हणजे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यात वयानुसार बदल होत जातात पण नात्याचा मूळ गाभा तोच राहातो.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

लहान असताना आई म्हणजे मुलीचं सर्वस्व असते. ती तिच्यासाठी जगातली सगळ्यात देखणी बाई असते. तिच्यासारखं दिसावं, तिच्यासारखे केस असावेत, तिच्यासारखे कपडे घालावेत असं वाटतं. मला आठवतं, सावनी ३-४ वर्षांची असेल. मी साडी नेसले होते तर ती मला म्हणाली, आई, तू स्नोव्हाईटसारखी दिसते आहेस!

वय वाढत जातं, मुली कॉलेजमध्ये जायला लागल्या की आई त्यांची मैत्रीण होते. अर्थात ही मैत्री हल्ली खूप घट्ट असते. म्हणजे आई-मुलगी एकत्र खरेदीला जातात, पार्लरला जातात. भरपूर गप्पा मारतात. आईलाही मन मोकळं करायला हक्काची मैत्रीण असते. मी तर गोंधळले की मुलींना सल्ला विचारते आणि त्यांनी दिलेला सल्ला डोळे झाकून ऐकते कारण तो खरंच मोकळ्या मनानं दिलेला असतो.

पुढे काही वर्षांनी अशीही वेळ येते की आईनं सांगितलेलं काहीच आवडत नाही. तिनं सांगितलेलं ऐकायचं नसतं. आईबरोबरच्या नात्यात काहीसा कडवटपणा येतो. पण तुम्ही जेव्हा लग्न करून किंवा न करताही स्वतंत्र राहायला लागता तेव्हा आईबद्दलचा जिव्हाळा परत नव्यानं जाणवायला लागतो कारण तुम्ही हलकेच तिच्या भूमिकेत शिरत असता.

नंतर जसजसं वय वाढतं तसतसं हे नातं अधिकाधिक हळूवार व्हायला लागतं. कारण आता मुलगी आईच्या भूमिकेत आणि आई मुलीच्या भूमिकेत जात असते. ती मुलीवर अधिकाधिक विसंबून राहायला लागते. कारण आता ती तिची पालक झालेली असते.

पण!!! हे सगळं असलं तरी आई वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली मुलगी लहान आहे हे विसरलेली नसते!

सोनाली कुलकर्णी सचिन कुंडलकरच्या रेस्टॉरंट या सिनेमात काम करत होती तर तिच्याकडून तुमच्या मनासारखं काम करून घ्या असं तिच्या आईनं सचिनला सांगितलं होतं!

मेधा कुलकर्णी या माझ्या मैत्रिणीची आई ८५ वर्षांची आहे. पण अजूनही तिला मेधाला आपण सांभाळतो असं वाटतं!

आज आम्ही पुण्यात प्रभात रोडला एका अतिशय सुरेख बंगल्यात शुटिंग करत होतो. त्या मावशींच्या लग्नाला ४२ वर्षं झाली आहेत. तर त्या सांगत होत्या की परवा त्यांची आई राहायला आली होती. जेवण झाल्यावर त्या इतर काही आवरत होत्या तर टेबल पुसायचं राहिलंय, लक्षात आहे ना? असं त्यांच्या आईनं विचारलं! त्या म्हणाल्या की माझ्या पोळ्यांच्या कडा पातळ होत नाहीत असं आईला अजूनही वाटतं.

माझी आई माझ्याकडे जेव्हा येते तेव्हा मी स्वैपाक करते तेव्हा आई मला किती मसाला घालतेस किंवा अमुक कमी घाल अशा सूचना करते. आणि किती जास्त स्वैपाक करते असंही. कारण आता आईबाबा दोघेच राहतात आणि त्यांचं जेवणही कमी झालंय, त्यामुळे त्यांचा स्वैपाक अगदी थोडा असतो.
तर एकूण काय की मुलगी कितीही मोठी झाली तरी आई आईपणा गाजवणं सोडत नाही. अर्थात त्यात मीही आलेच!

– सायली राजाध्यक्ष


— संकलन : शेखर आगासकर
सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा  उपक्रम.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..