प्रवास आयुष्याचा

एक म्हातारा त्याचा आयुष्याचा प्रवास कसा झाला ? आणि शेवटी त्याला समजले तेव्हा तो काय सांगतो ? याबाबत मनोगत व्यक्त करतो. त्यातून बरेच काही शिकता येईल. ते मनोगत असे …….

माझे आयुष्य कसे गेले,
हेच कधी उमजले नाही l
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही ll
लहानपणी जमवायचो,
सोबतीला सारे सवंगडी l
विटीदांडू, आबाधुबी अन्,
चेंडूफली कधी लंगडी ll
खेळतांना मात्र स्वतःचा,
कधी विजय पाहिला नाही ll१ll

कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही……
तारुण्यातही मित्रांसाठी,
केल्या ब-याच भानगडी l
नको नको झंझटांमूळे,
विस्कटली जीवनाची घडी ll
दुस-यांसाठी केली लफडी,
स्वतःसाठी एकही नाही ll२ll

कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही ……
मग घेतला झेंडा खांद्यावर,
बनलो पक्षाचा कार्यकर्ता,
तेथे माझा उपयोग केला,
फक्त निवडणूकी पूरता ll
आंदोलनाच्या केसेस् मात्र,
अजूनही मिटल्या नाही ll३ll

कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
झाले लग्न माझे अन्,
थाटला नवा संसार l
तेव्हापासून लागला मागे,
आणा-आणीचा बाजार ll
अपार कष्ट करुन सुध्दा,
संसार पुरा झाला नाही ll४ll

कुणासाठी जीवन जागलो,
हेच मला समजले नाही…….
मुले शिकून मोठी झाली,
अन् लागली कमवायला l
मुलगी गेली जावायासोबत,
मुलगा सुनेबरोबर गेला ll
आम्हा म्हाताऱ्यांसोबत,
कुणीही राहिला नाही ll५ll.

कुणासाठी जिवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
वयानुसार शरीर थकले,
आता जडले अनेक आजार l
आम्ही म्हातारा म्हातारी,
परस्परांना देतो आधार ll६ll

आता समजलेही सारे,
पण आयुष्य उरले नाही……
आयुष्याच्या या प्रवासात,
गरज आहे सद्गूरुंची l
तेच देतात गुरुकिल्ली,
भगवंताला जाणण्याची ll
भगवत्भक्तिच्या मार्गावर,
सद्गुरुशिवाय पर्याय नाही ll७ll

कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही………

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*