यूट्यूबवरील `बुकशेल्फ’ चॅनेलवरुन उलगडली मराठी पुस्तकांची दुनिया!

चित्रपट संकलक किरण क्षीरसागरसह पाच वाचनप्रेमींचा जागतिक पुस्तक दिनापासून अभिनव उपक्रम

दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या अनेक मराठी पुस्तकांपैकी मोजकी पुस्तके गाजतात, बाकीच्या पुस्तकांची वाचकांना नीट माहितीही नसते. सध्याच्या ऑनलाइनच्या जमान्यात मराठी साहित्यातील जुन्या, नव्या अशा सर्वच पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत नेण्यासाठी किरण क्षीरसागर व त्याच्या वाचनप्रेमी मित्रांनी यू ट्युबवर `बुकशेल्फ’ नावाचा चॅनेल जागतिक पुस्तक दिनापासून म्हणजेच २३ एप्रिलपासून सुरु झाले.

मराठीत जी पुस्तके प्रसिद्ध होतात, त्यांची जास्तीत जास्त माहिती बुकशेल्फ या चॅनेलवरुन देण्यात येणार आहे.  या चॅनेलमध्ये मराठी साहित्यातील नवे-जुने कथासंग्रह, कादंब-या, आत्‍मकथनं, प्रवासवर्णन, अभ्‍यासपूर्ण किंवा माहितीपर लिखाण, लेखकांची ओळख अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असणारे कार्यक्रम असतील.  एखादे मराठी पुस्तक वाचल्यानंतर ते कसे वाटले याबद्दलची संपादकांची मते या चॅनेलवरील कार्यक्रमातून  वाचकांना सांगितली जातील.

यू ट्यूबवरील बुकशेल्फ हा चॅनेल संचालित करण्यात चित्रपट लेखक व संकलक किरण क्षीरसागर, अॅनिमेटर सूरज क्षीरसागर, कलादिग्दर्शक भरत शर्मा तसेच हिना कौसरखान, पराग पोतदार हे दोन पत्रकार यांचा महत्वाचा सहभाग  आहे.

यू ट्यूबवर https://goo.gl/bBLWZL या लिंकवर बुकशेल्फ हे चॅनेल रसिकांना, वाचकांना पाहाता येईल.

`बुकशेल्फ’चे महत्व सर्वच माध्यमांत कायम!

यूट्युबवर मराठी पुस्तकांविषयी माहिती देणारा बुकशेल्फ हा चॅनेल सुरु होत असला तरी बुकशेल्फ नावाचा च मराठी पुस्तकांविषयी माहिती देणारा कार्यक्रम २००५ सालीच्या अखेरीपासून झी मराठी या वाहिनीवर सादर करण्यात येत असे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन अपर्णा पाडगावकर यांनी व सूत्रसंचालन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी केले होते. या बुकशेल्फ कार्यक्रमाचे ३८ भाग प्रक्षेपित करण्यात आले होते. साहित्य विश्वातील घटना, नव्या पुस्तकांविषयी चर्चा तसेच लेखकांशी गप्पा असे विविध प्रकार झी मराठीच्या बुकशेल्फ मालिकेत दाखविले जात असत. विंदा करंदीकर, सानिया, मंगेश पाडगावकर अशा लेखकांवर एकेक विशेष भागही या मालिकेत तयार केले गेले होते. हा बुकशेल्फ कार्यक्रम त्यावेळी खूप गाजला होता.

थोडक्यात टीव्ही चॅनेल असो वा यूट्युब चॅनेल असे कोणतेही माध्यम असो, बुकशेल्फचे नावाचे महत्व कायम राहिले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*