स्वाभिमानाची जादू

पुढ्यात पेन्सिलींचे जुडगे आणि कटोरा घेऊन रेल्वे फ्लॅटफॉर्मवर एक भिकारी बसला होता. एक तरुण अधिकारी तिकडून चालला होता. त्याने त्या कटोर्‍यात दोन रुपये टाकले आणि तो रेल्वेच्या डब्यात चढला. रेल्वे सुरू होणार इतक्यात काहीतरी त्याच्या मनात आले. तो झटकन त्या भिकार्‍याजवळ गेला. त्याच्या पुढ्यातील पेन्सिलींचा एक जुडगा उचलला आणि म्हणाला, ‘हं, आता ठीक आहे. जेवढे पैसे तेवढ्याच पेन्सिली. शेवटी तूही व्यावसायिक आहेस आणि मीही, आणि तो डब्यात शिरला.

सहा महिन्यांनंतर तो अधिकारी एका कार्यक्रमाला गेला. तोच भिकारी तेथे सुटाबुटात आला होता. भिकार्‍याने त्या अधिकार्‍याला ओळखलं. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, ‘तुम्ही मला कदाचित ओळखणार नाही; पण तुम्ही माझ्या चांगले लक्षात आहात.’ मग त्याने तो प्रसंग सागितला.

तो अधिकारी म्हणाला, ‘ सांगितल्यावर आता मला आठवलं; पण तू तर भीक मागत होतास. इथं सुटाबुटात काय करतो आहेस ?’

त्यावर तो भिकारी म्हणाला, ‘तुम्ही माझ्यासाठी काय केलंत याची तुम्हाला कल्पनाही येणार नाही. माझा स्वाभिमान, आत्मप्रतिष्ठा मला परत मिळवून देणारे तुम्ही पहिलेच भेटलात. तुम्ही निघून गेल्यावर मी सारखा मनाशी विचार करत राहिलो की, मी इथं काय करतोय? मी भीक का मागतोय? मी आयुष्यात काहीतरी चांगलं, विधायक करण्याची खूणगाठ बांधली. जवळच्या सामानाचं गाठोडं खांद्यावर टाकलं. मेहनत करायला सुरुवात केली. आज मी इथं मानानं आलो आहे. मला नवीन दृष्टी दिल्याबद्दल, माझ्या स्वत्त्वाची जाणीव करुन दिल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे होते. त्या प्रसंगामुळे माझे आयुष्य बदलून गेले.’

तात्पर्य : आयुष्यात स्वाभिमान अशी जादू करू शकतो.