सत्य हे अनुभवावेच लागते

गावातील एक आंधळा स्वत:च्या अंधपणाला अतिशय कंटाळला होता. कोणीही भेटल्यावर तो प्रत्येकाला म्हणायचा, ”मला प्रकाश दाखवा, मला त्याची चव घ्यायची आहे, त्याचा स्पर्श हवाहवासा वाटतो.” त्याच्या या मागणीला गावातील लोक कंटाळली होती. कोणालाही त्याचे समाधान करता येईना. एकदा त्या गावात गौतमबुद्ध आले. त्यांच्या कानावर या आंधळ्याची हकीगत गेली. ते ऐकून बुद्ध म्हणाले, ”त्याला कोणीही उपदेश करू नका. त्याला आत्ता खरी गरज एखाद्या वैद्याची आहे. त्यांच्या बोलण्याप्रमाणे त्या आंधळ्याला वैद्यांकडे नेण्यात आले. त्याच्या डोळ्यातील मोतीबिदू काढला. त्याला दृष्टी मिळाली, त्याला सर्व दिसू लागले. आनंदाने तो बुद्धांकडे गेला. बुद्धांनी त्याला पाहिले आणि विचारले, ”भल्या माणसा, आता मला प्रकाश, स्पर्श, ध्वनी आणि चव हे सर्व तू दाखव आणि ऐकव.” त्यावर विचार करत तो माणूस म्हणाला, ‘हे अशक्य आहे. हे मी ऐकवू आणि दाखवू शकत नाही.” त्यावर बुद्ध म्हणाले, ”अरे सद्गृहस्था, आजपर्यंत सर्व लोक तुला हेच सांगत होते. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावर तो माणूस म्हणाला, ”मी हट्ट धरला म्हणूनच माझ्या डोळ्यांवर उपचार झाले आणि मला सत्य समजले. लोकांचे ऐकून जर गप्प राहिलो असतो तर अजूनही मी आंधळाच असतो.”
तात्पर्य – सत्य हे अनुभवावेच लागते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.