शेवटी ते आईचच मन

मानवाप्रमाणे प्राणी, पक्षी यांच्यातही आपापसात काही व्यवहार सुरूच असतात. एकदा गरूडाचं काहीतरी घुबडाशी काम होतं. गरूड त्याला भेटायला गेले. काम सांगितलं आणि ते काम करून देण्याच्या मोबदल्यात गरूडानं घुबडाला वचन दिलं की तू जर माझं हे काम केलंस तर मी तुझ्या पिल्लांना कधीच हानी पोहोचवणार नाही. त्यांचा हा संवाद शेजारी असलेली घुबडाची मादी ऐकत होती. गरूडाकरून आपली पिले संरक्षित राहणार याचा त्या मातेच्या मनाला खूप आनंद झाला. आनंदाने ती गरूडाला म्हणाली, ‘‘माझ्या पिलांना तुझ्याकडून अभय मिळाले यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. पण तू माझी पिलं पाहिली आहेस का ? पिलं पाहिली नसल्यामुळे साहजिकच गरूडाने विचारले, ‘‘कशी आहेत तुझी पिले ?’’ हे ऐकताच मातेचा पिलांविषयीचा अभिमान जागृत झाला. पिलांच्या प्रेमाने ती म्हणाली, ‘‘जगात माझ्या पिलांइतकी सुरेख कोणत्याच पक्षाची पिले नाहीत. जेव्हा सगळ्यात सुंदर पिले तुला दिसतील ती आमची पिलं असतील. त्यांना पहाताच तू त्यांना ओळखशील’’ हे ऐकून गरूड निघून गेला. एकदा एका झाडाच्या खोप्यात त्याला पिलांचा चिवचिवाट ऐकू आला. त्याने खोप्यात पाहिले तर तिथे काही लालसर पिवळट बसक्या चोचीची, काळ्या रंगाची पिले खेळत होती. त्यांना पाहून गरूडाच्या मनात आलं ही कुरूप पिले घुबडाची असूच शकत नाही कारण घुबडाच्या पत्नीने तर, ‘तिची पिले सर्व जगात सुंदर आहेत’ असे सांगितले होते. मग काही क्षणात गरूडाने ती सर्व पिले खाऊन टाकली. त्याला कुठे माहीत होते की जगातल्या प्रत्येक आईला आपले मूलच सर्वोत्तम आहे असेच वाटत असते.
तात्पर्य – शेवटी ते आईचच मन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.