लोभामुळे मन:स्वास्थ नष्ट होतं

आसपासच्या पंचक्रोशीत एक साधू महाराज, विरक्त आणि निर्लोभी म्हणून प्रसिद्ध होते. बर्‍याच धर्मग्रंथांचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. त्या ज्ञानाच्या साह्याने ते गावागावात भजन-किर्तन करून समाजाला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगत असत. तर जीवन जगण्याला सुसह्य होईल असा उपदेश करीत असत. नदीत स्नान करून माधुकरी मागून पोट भरायचे आणि उशाला एखादा दगड घेऊन झाडाखाली सावलीत शांत झोप काढायची असा त्यांचा दिनक्रम होता. एक दिवस ते विश्रांती घेत असताना गावातला एक रिकामटेकडा, टवाळ असा रमेश त्यांच्याजवळ आला. त्याने साधूला विचारले,”महाराज हा दगड तुम्हाला कोठे मिळाला ?” त्यावर साधू म्हणाले, ”इथे झाडाखालीच होता !” हे ऐकताच रमेशला त्यांची फिरकी घ्यायची लहर आली. तो म्हणाला, ”महाराज, त्याला जपा कारण तो अतिशय मौल्यवान दगड आहे !” हे ऐकल्यावर साधूने तो दगड आपल्या वस्त्रात लपविला. पण उशाखाली घेतांना तो कोणीतरी चोरून नेईन या भीतीने त्यांना झोप येईना ! शेवटी सुरक्षिततेसाठी ते हॉटेलमध्ये उतरू लागले. तोपर्यंत त्या दगडाची वार्ता हॉटेल मालकापर्यंत पोहोचली होती. हॉटेल मालकाने बाहेरून खोलीला कुलूप लावले आणि साधूला कोंडून ठेवले. मग त्या साधूची झोप पूर्णच उडाली. इकडे ही बातमी पंचक्रोशीत पसरली त्यामुळे चोर, दरोडेखोर, गांवकरी दगडाच्या लोभाने हॉटेलसमोर जमले व आपआपसात भांडू लागले. तो गलका ऐकून दगडासकट साधूने खिडकीतून पलायन केले आणि तो दगड नदीच्या पाण्यात सोडून दिला. त्यानंतर त्या साधूला पूर्वीसारखी झाडाखाली शांत झोप यायला लागली.
तात्पर्य – लोभामुळे मन:स्वास्थ नष्ट होतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.