दिवाकर कृष्ण (समाधी)

लीलेला काय कमी होते म्हणून ती सुखी नव्हती ? सार्वभौम इंग्रज सरकारच्या एका मांडलिकाच्या पडचाकर संस्थानिकाची ती सून होती. या संस्थानिकाच्या पूर्वजाने आपल्या धन्याला त्याच्या धन्याकडून विश्वासघाताने राज्य गिळण्यात मदत केली असल्यामुळे त्याला वंशपरंपरा जहागीर व राजा हा किताब मिळाला होता. उत्पन्न मोठे होते, रयत अशिक्षित होती, कारभारी हांजीखोर होते, गाव लहान होते, वाडा मोठा होता, वाड्याशेजारी आणि गावाखालून एक लहानशी उपनदी वहात होती. वाडाही जुनाच होता. त्याच्या शेजारी एक जुने रामाचे देऊळ होते. राम वनवासात सीतादेवींसह काही दिवस तिथे राहिले होते अशी दंतकथा होती. घराण्यात देवीची उपासना होती. वाड्याशेजारी एक मोठा नीट जोपासलेला बाग होता. मांडलिकाच्या राजधानीपासून हा गाव मोटारने फारच जवळ होता.

-दिवाकर कृष्ण (समाधी)