जशास तसे उत्तर द्यायलाच लागते

शंकराचार्यांच्या आयुष्यात घडलेली ही कथा.

शंकराचार्य तत्त्वज्ञानाचे मानवी आयुष्याशी असलेले महत्त्व समाजाला समजवून सांगताना सलताना अनेक उदाहरणे देत.

आपल्याच आयुष्याकडे तटस्थवृत्तीने पाहिल्यास माणूस आयुष्यभर सुखाने जगू शकतो कारण आसपास घडणाऱ्या घटना ह्या मोह मायेतून घडत असतात. तेव्हा त्या किती अंगाला लावून घ्यायच्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सुख, दुःखासाठी किती काळजी करायची हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. यासाठी ‘ब्रह्म सत्य, जगन् मिथ्या’ असे प्रतिपादन शंकराचार्य नेहमी करीत असत.

एक दिवस शंकराचार्य रस्त्यातून जात असताना समोरून एक बेफामपणे उधळलेला हत्ती धावत आला. तो हत्ती अंगावर येतो आहे अस पाहून शंकराचार्य बाजूला सरकले आणि एका घराच्या आडोशाला उभे राहिले.

जरा वेळाने हत्ती निघून गेला. पण रस्त्यावर जमलेल्या एका शंकेखोराने शंकराचार्यांना विचारले, ‘महाराज, जग हे मिथ्या आहे अस तुम्ही नेहमी म्हणता ना!’

त्यावर शंकराचार्यांनी होकारार्थी मान हलविली.

मग त्या व्यक्तीने पुन्हा विचारले, ‘मग तो हत्ती मिथ्याच होता न?’

शंकराचार्यांनी त्यावरही होकारार्थी मान हलविली.

त्यावर त्या व्यक्तिने पुन्हा प्रश्न केला, ‘मग खोड्या हत्तीला पाहून तुम्ही का पळालात?

त्यावर शंकराचार्य म्हणाले, ‘गृहस्था, हे जगच खोटे, तसा तो हत्तीही खोटा, तसेच मी भीतीने घाबरून पळालो हे सुद्धा खोटेच नाही का?

तात्पर्य : अनेक वेळा जशास तसे उत्तर द्यायला लागते.