कृष्णाबाई मोटे (गिरणीतून आल्यावर)

वास्तविक या गिरणीवरून मी कितीदा गेले असेन. मोटारीने गेले आहे, पायी गेले आहे. त्याच्या सकाळी ७ वाजता होणार्‍या भोंग्यावरून माझे बंद पडलेले घड्याळ पण मी कितीकदा तरी लावले आहे. पण उंचच उंच दिसणार्‍या चिमणीशिवाय माझे लक्ष तिच्याकडे कधीच वेधले नाही. मात्र आगगाडीतून येऊ लागले की त्यातील काचेच्या छपरावर जेव्हा सायंसूर्याचे किरण पडून सोनेरी तेजाने ते सबंध कौलार भोवतालच्या हिरवळीत चमकू लागे, तेव्हा मात्र अनेकदा मी त्या गिरणीकडे हेव्याने पाही. एकदा त्याच्या दिंडीदरवाजाजवळ असणार्‍या गुलमोहराचा वृक्ष असाच बहरून आला असता एके दिवशी एका आतून बाहेर येणार्या इसमाला येथे काय आहे म्हणून विचारण्याची मला इच्छा झाली.

– कृष्णाबाई मोटे (गिरणीतून आल्यावर)