कष्टाचीच कमाई खरी असते

गाईचे दूध विकणारा एक दूधवाला बाजारात दूध विकत असे आणि त्यातून पैसा मिळवत असे. दूधवालाही शेवटी माणूसच. पैसा मिळविण्याची हाव दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळे तो दूधात पाणी मिसळू लागला. त्यातून त्याला भरपूर पैसा मिळू लागला. त्या पैशाच्या आणखी गाई खरेदी करून व्यवसाय वाढवण्यासाठी तो जनावरांच्या बाजारात निघाला होता. मधे विश्रांती घ्यावी म्हणून वाटेत एका तळ्याच्या काठावर झाडाखाली तो विश्रांतीसाठी थांबला. आंघोळ करून ताजेतवाने व्हावे म्हणून आपल्या पिशव्या झाडाखाली ठेवून तो तलावात अंाघोळीसाठी उतरला. त्या झाडावर एक माकड बसलेले होते. ते दूधवाल्याच्या हालचाली निरखून बघत होते. दूधवाला पाण्यात शिरलेला पाहताच माकड खाली आले आणि दूधवाल्याची पिशवी घेऊन झाडावर गेले. ते पाहून दूधवाला पाण्यातून बाहेर आला आणि पिशवी मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. पण माकड झाडावर बसले होते. आता ते पिशवीतल्या एकेक वस्तू खाली फेकू लागले. पिशवीतली नाणी ते खाली टाकत होते. त्यातली काही नाणी जमिनीवर तर काही तळ्यात पडत होती. दूधवाल्याने जमिनीवरची नाणी गोळा केली आणि मोजून पाहतो तर अर्धीच नाणी हातास लागली होती. दूधवाल्याने विचार केला,‘‘आपण दूधात पाणी मिसळले म्हणून पाण्याचा पैसा पाण्यात गेला आणि कष्टाचे पैसे जसेच्या तसे राहिले.’’
तात्पर्य – कष्टाचीच कमाई खरी असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.