आसक्तीचा त्याग म्हणजेच साक्षात्कार

जनकराजाला साक्षात्कार, आत्मबोध झाला आहे हे एके दिवशी शुकदेव मुनींना समजल आणि त्यांना आश्चर्यच वाटले. त्यांच्या मनात विचार आला, ”हे कसे शक्य आहे. राजा तर इतक्या ऐषारामात जगतो आहे. ज्याने विशेष असे तप किवा सर्वसंगपरित्याग कधीही केला नाही तो ईश्वरापर्यंत कसा पोहोचू शकतो ?” हा विचार करतच शुकदेव मुनी जनक राजाच्या राजवाड्यात आले. त्यांनी पाहिले की राजाच्या अंगावर भरजरी वस्त्रं, रत्नजडीत अलंकार तर होतेच पण त्याबरोबरच राजा सोन्याच्या ताटात भोजन घेत होता. समोरच नृत्य संगीतही चालू होते. हे सगळे पाहून शुकदेवांच्या मनातली शंका आणखी वाढली. त्यांनी त्या रात्री राजवाड्यातच वास्तव्य केले. सकाळी उठल्यावर जनक राजाबरोबर ते नदीवर स्नानासाठी गेले. नदीच्या काठावर आपापली वस्त्रे ठेवून ते आंघोळीसाठी नदीच्या पात्रात उतरले. इतक्यात आसपास धावण्याचे, आरडाओरडीचे आवाज ऐकायला आले. समोरच जनकाचा उभा असलेला राजवाडा जळत होता. ते पाहून शुकदेवच खूप अस्वस्थ झाले. पाण्यातून ते धावत काठावर आले. त्यांनी आपली भगवी कफनी घाईघाईने अंगात घातली आणि तेथून धावत निघणार तेवढ्यात त्यांनी मागे वळून पाहिले तर जनकराजा राजवाडा जळत असतानाही शांतपणे स्नान करत होता. शुकदेवांना राजाकडे पाहून थोडा धक्काच बसला होता. तेवढ्यात जनकराजा म्हणाला, ”मुनीश्वर माझा सगळा राजवाडा जरी जळून खाक झाला तरी ‘माझं’ काहीच जळणार नाही. ते चिरंतन आहे.”
तात्पर्य – आसक्तीचा त्याग म्हणजेच साक्षात्कार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.