आपण गेल्यावर लोक आपली आठवण काढतील असे आपले कर्तृत्व असावे

एका खेडेगावात एक आजी आपल्या दोन नातींबरोबर रहात होत्या. एक दिवस त्यांचा एक नातेवाईक त्यांच्या घरी चार दिवसांसाठी रहायला आला होता. रात्रीची जेवणं झाली. आलेला पाहुणा दोन्ही नाती आणि आजी घराच्या ओसरीवर गप्पा मारीत बसल्या होत्या. तेवढ्यात शेजारची मनू धावत आली आणि काका मरण पावल्याचा निरोप सांगून गेली. आजी आपल्या एका नातीला म्हणाल्या, ”शेजारी जाऊन पाहून ये की त्या काकांना सद्गती मिळाली की दुर्गती.” थोड्यावेळातच नात परत आली आणि म्हणाली, ”आजी शेजारच्या काकांना सद्गती मिळाली आहे.” बाजूला बसलेले पाहुणे ते ऐकत होते पण त्यांना हा प्रकार काहीच समजला नाही. दोन दिवसांनी दुपारच्या वेळेस समोरच्या शेतात कोणीतरी मरण पावल्याची बातमी समजली. पुन्हा आजीनी नातीला सद्गती का दुर्गती हे बघून येण्यास सांगितले. जरा वेळाने नात परत येऊन म्हणाली, ”आता दुर्गती मिळाली.” शेवटी न राहवून त्या नातेवाईकाने आजींना विचारले, ”हे तुम्ही कसं ओळखता ?” त्यावर आजी म्हणाल्या, ”साधी गोष्टं आहे. माणूस गेल्यानंतर माणसं रडतात त्यांना त्या व्यत्रि*ची उणीव भासते त्याला सद्गती मिळते. पण जो गेल्यावर लोकं म्हणतात, ”बरं झालं सुटलो एकदाचो. पीडा गेली.”अशांना दुर्गती मिळते.
तात्पर्य – आपण गेल्यावर लोक आपली आठवण काढतील असे आपले कर्तृत्व असावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.