अति लोभ हा कधीच चांगला नाही

राजपुत्र वीरसेन एकदा शिकारीला गेला होता. राजपुत्राचा शिकारीचा कार्यक्रम म्हटल्यावर सरदार, सैनिक, छावण्या आणि राहुट्यांसह सर्व लवाजमा बरोबर होता. मात्र दुपारपर्यंत त्यांना एकही शिकार मिळाली नाही. शेवटी दुपारी जेवणासाठी आणि विश्रांतीसाठी सर्व लवाजमा दाट झाडी असलेल्या जागेत डेरेदाखल झाला. तंबू उभारले गेले. घोड्यांना जवळच्या झाडांना बांधून ठेवले. राजपुत्राच्या सेवकांनी घोड्यांना दाणा-पाणी दिले. घोडे हरभरे खाऊ लागले. वरती झाडावर बसलेले एक माकड हे सगळं निरखून पहात होते. राजाचे सेवक बाजूला होताच ते पटकन झाडावरून खाली उतरले. घोड्यांसमोर टाकलेल्या हरभर्‍यातील मूठभर हरभरे उचलून उड्या मारत ते पुन्हा झाडावर जाऊन बसले आणि हरभरे खाऊ लागले. खरं तर हातात मूठभर हरभरे होते. पण माकडाचे लक्ष घोड्यांना घातलेल्या हरभर्‍यांकडेच होते. तेवढ्यात माकडाच्या हातून एक हरभर्‍याचा दाणा खाली पडला आणि तो दाणा उडी मारून उचलण्याच्या नादात माकडाच्या हातातले सर्वच हरभरे खाली पडले. घोड्याने ते भराभर खाऊनसुद्धा टाकले. त्यामुळे जे हातात होते ते सर्व दाणे माकडाच्या हातून गेले. हे सर्व पाहून राजपुत्र वीरसेन हसू लागला. तेव्हा राजपुत्राचा सेनापती त्याला म्हणाला, ”पाहिलंत युवराज, हातात मूठभर दाणे असतानासुद्धा एका दाण्याच्या लोभापायी माकडाने सर्व गमावले.”
तात्पर्य – अति लोभ हा कधीच चांगला नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.