अडचणीतून मार्ग

राजा विक्रमसेन राज्यातल्या ब्राह्मणांना दान देणार असतो. त्यासाठी ब्रह्मदत्त आणि देवदत्त हे दोघे ब्राह्मण चालत चालत राजधानीकडे निघालेले असतात. दुसऱ्या दिवशी त्यांना राजधानीत पोहोचायचे असते. प्रवासात संध्याकाळ होते. तोपर्यंत ते एका डोंगरापाशी येतात. रात्र झाल्यामुळे अंधार चांगलाच पडलेला असतो. त्यामुळे ते कंदील पेटवतात. पण कंदीलाच्या त्या मिणमिणत्या प्रकाशात त्यांना लांबचे काहीच दिसत नाही. त्यामुळे देवदत्त म्हणतो, ‘ ‘मी आता यापुढे डोंगर चढणार नाही. कारण मला पुढचे काहीच दिसत नाही. सकाळी उजाडल्यावर पुढचा प्रवास प्रवास करू. ” तो एका मोठ्या झाडाखाली अंथरूण पसरून गाढ झोपी जातो; परंतु ब्रह्मदत्त उत्साही असतो. तो मनाशी विचार करतो, ‘ ‘पुढचा डोंगर दिसला नाही तरी कंदीलाच्या प्रकाशात चालण्यापुरता रस्ता पायाखाली दिसतो आहे. तेव्हा एकेक पाऊल टाकत पुढे जाण्यासाठी तेव्हढा प्रकाश पुरेसा आहे. ‘ या विचाराने कंदील उचलून त्याच्या प्रकाशात तो चालायला लागतो. पहाटे -पहाटे तो राजधानीत पोहोचतो. पहिला याचक दाराशी आला म्हणून राजा त्याला भरभरून दानदक्षिणा देतो. दिवसभर ब्राह्मण येऊन दरबारातून दानदक्षिणा घेऊन जात असतात. संध्याकाळी राजा दानकर्म ‘ आटोपून आपल्या महालात निघून जातो. त्यानंतर देवदत्त तिथे पोहोचतो. पण वेळ निघून गेलेली असते.

तात्पर्य : अडचणीचा विचार करत बसले तर काहीच घडत नाही. त्यामुळे नेहमी अडचणीतून मार्ग काढायला हवा.