पिवळ्या रंगाचे पदार्थ

पिवळा रंग हा अतिशय उत्साहवर्धक, आशावादी आणि मेंदूला सतत खाद्य पुरवणारा. म्हणूनच प्रत्येक वस्तुतज्ज्ञाच्या, इंटिरिअर डिझायनरच्या ऑफिसमध्ये या रंगाचा समावेश असतोच असतो. हा रंग फक्त कल्पनांचे इमले बांधत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून त्या कल्पना सत्यात उतरवायला मदत करतो. असे म्हणतात की हा रंग घराच्या प्रवेशद्वारापाशी लावल्यास माणूस घराबाहेर पडताना नवीन आत्मविश्वास, ऊर्जा घेऊन बाहेर पडतो. काम फत्ते करण्याचे बळ त्याच्यात येते. पिवळ्या रंगाला आव्हान स्वीकारायला फार आवडते. जास्तकरून बौद्धिक आव्हान. म्हणून मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी हा रंग शिशुवर्गात, खेळायच्या जागी लावलेला दिसतो. हिंदू संस्कृतीत व विवाहात पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. वसंत ऋतूचे प्रतिनिधित्व करणारा हा आनंद पसरवणारा रंग समजला जातो. त्याचबरोबर विवाह विधीत एक शुभ रंग म्हणून या रंगाला मानाचे स्थान आहे. भगवान विष्णू, कृष्ण व गणपती यांनी परिधान केलेली पिवळी वस्त्रे ज्ञानाचे प्रतीक मानली जातात.

पिवळ्या रंगाचा एक दोष आहे की हा रंग डोक्याला सतत व्यस्त ठेवतो, स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे झोपायच्या खोलीत शक्यतो हा रंग टाळलेला बरा. या रंगाच्या याच गुणामुळे अभ्यास करतानासुद्धा लक्ष एकाग्र करणे बरेचदा कठीण जाते. म्हणून अभ्यासाच्या जागी पिवळ्या रंगाऐवजी शीतल रंगाच्या छटा वापरणे चांगले. जेणेकरून मन स्थिर राहण्यास मदत होईल. कधी कधी जरुरीपेक्षा जास्त पिवळा रंग वातावरणात ताण निर्माण करतो. त्यामुळे बऱ्याच वृद्ध माणसांना हा रंग सहन होत नाही.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

काही पिवळ्या रंगाचे पदार्थ
केळ्याचा शाही हलवा
साहित्य:- ४ केळी तयार, अर्धा लिटर दूध, खोबऱ्याचा चव, १ वाटी साखर, पाव वाटी दाण्याचे कूट, बदाम, बेदाणे, केशर, वेलदोडेपूड, जायफळपूड.
कृती:- प्रथम केळी कुस्करून घ्या. त्यात दूध घालून शिजवायला ठेवा. मग खोवलेले खोबरे घालून ढवळत राहा. त्यात थोडे थोडे दूध घालून शिजवा. नंतर १ वाटी साखर, दाण्याचे कूट, बदाम व बेदाणे घालून शिजवा. गॅस बंद करून वेलदोडे पूड व जायफळ पूड घाला. केशर घालून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

रेशमी बनाना
साहित्य:- मोठय़ा आकाराची तयार केळी ४, साखर १ वाटी (तव्यावर ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यावी), काजू, किसमिस ४ चमचे, कॉर्नस्टार्च ५ चमचे, तेल (रिफाइंड व्हे. ऑइल) तळायला, आइस्क्रीम स्लाइस २.
कृती:- केळी सोलून त्याचे २ भाग करावेत व मधून पोखरून त्यामध्ये ब्राऊन शुगरबरोबर काजू, किसमिससुद्धा घालावे. अशी तयार झालेली केळी कॉर्नस्टार्चच्या द्रावणात बुडवून तळून घ्यावी. गरम तव्यावर साखर घालून कॅरामलसारखं करावे. त्यात केळी बुडवावी. एका प्लेटमध्ये फ्रेश क्रीम किंवा आइस्क्रीम ठेवून त्यावर केळी ठेवून खायला द्यावी.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*