जाधव, विजय

पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हज्मध्ये डायरेक्टरच्या ऑफिसात, शास्त्रीय संगीत ऐकत कामात व्यग्र असलेले विजय जाधव हे एकार्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व होते. जाधवांनी एनएफएआयच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेने ‘सरकारी’ कात कधी टाकली हे कळलेच नाही. लहान वयातच मोठी जबाबदारी मिळूनही, ती सक्षमपणे संभाळण्याची किमया त्यांनी केलीच, शिवाय फक्त कलाकारांचा राबता असलेली संस्था नकळतच सामान्य सिनेप्रेमींसाठी कायमची खुली करून दिली.

‘व्हिजनरी’ हा शब्द त्यांच्या बाबतीत खरोखर सार्थ ठरावा. पदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांनी कामाचा जो सपाटा लावला तो अखेरपर्यंत कायम होता. एकामागोमाग एक असे कितीतरी प्रोजेक्ट त्यांनी हातात घेतले आणि पूर्णत्वासही नेले. “एनएफएआय” चे कोणतेही काम सरकारी लाल फितीच्या कारभारात अडकून राहू नये ही त्यांची प्रामाणिक इच्छा असे. किती तरी वेळा रात्री उशिरापर्यंत त्यांच्या केबिनचा लाइट सुरू असलेला अनेकांनी पाहिला आहे. पुढच्या पिढ्यांना आताचा सिनेमा दाखवायचा असेल तर ‘आजच’ पावले उचलायला हवीत हे त्यांना मनोमन पटले होते. आपल्या मनाला भिडणार्‍या, वेगळ्या विषयांवर भाष्य करणार्‍या चित्रपटांचे जतन होणे किती आवश्यक आहे, हे ओळखून संस्थेतल्या अक्षरश: हजारो रिळांचे डिजिटायझेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट त्यांनी सुरू करून, तो पूर्णत्वास आणला. ही सगळी कामे त्यांनी अर्थातच आपल्या सहकार्‍यांना हाताशी घेऊन पूर्ण केली. त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी, मनमिळावूपणाबद्दल बोलू तेवढे थोडे अशी त्यांच्या सहकार्‍यांची भावना आहे.

लहान-मोठ्या संस्थाच नाही तर हौशी चित्रपटप्रेमींनाही त्यांनी सर्वतोपरी मदतच केली. सर्वसामान्यांसाठी रसग्रहण कार्यक्रम हाती घेण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. संस्थेकडे नेमके किती सिनेमे आहेत त्यांची माहिती देण्यासाठी डिक्शनरी करण्याचे कामही सुरू आहे. फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि अर्काइव्हज्च्या वतीने त्यांनी निमशहरी, ग्रामीण भागातही फिल्म फेस्टिव्हल्स आयोजित केले. कित्येकदा ते स्वत: त्या फेस्टिव्हल्सना आवर्जून उपस्थित राहत असत. तिथे केवळ चित्रपटांविषयी माहिती न देता इतर सरकारी योजनांची माहिती लोकांना देऊन, त्यांचा वापर करण्यासाठी आग्रह धरताना अधिकारपदाच्या पलीकडे जाणारा त्यांच्यातला ‘माणूस’ अनेकांना कदाचित ठाऊकही नसेल! सिनेमा आणि त्याच्या जतनासाठी असणारी कळकळ ही त्यांच्या कलाकार असण्यात लपलेली असावी.

आकाशवाणी, मुंबई दूरदर्शन केंद, लष्कर विभागात काम केल्यानंतर त्यांची कारकीर्द खरी बहरली ती अर्काइव्हज्मधे. जाधवांना तबलावादनाची विशेष आवड होती. किंबहुना, उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडून त्यांनी वादनाचे प्रशिक्षण घेतले होते. या सगळ्या धकाधकीत सिनेमा पाहायला वेळ मिळत नाही, याची खंतही त्यांनी कित्येकदा बोलून दाखवली होती. त्यांच्यासारखा कार्यक्षम सरकारी अधिकारी अजूनही हवा होता अशीच सगळ्यांची भावना आहे!

( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*