गुप्ते, (कॉ.) वसंत

मुंबईतली कामगार चळवळ जवळपास नामशेष होण्याची चिन्हे दिसत असताना या चळवळीत अतिशय मोलाची कामगिरी बजावणा-या कामगार कार्यकर्त्यांच्या पिढीचे एक प्रतिनिधीत्व करणारे वसंत गुप्ते हे होते. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, साथी जॉर्ज फर्नान्डिस यांसारख्या दिग्गज कामगार पुढा-यांच्या पाठीशी वसंत गुप्तेंसारखे दुस-या फळीतले तितकेच समर्थ नेतृत्व असल्यानेच नव्वदीच्या दशकापर्यंत कामगार चळवळीचा दबदबा महाराष्ट्रात होता. आंदोलनाची रणनीती आणि एकंदर पुढारपण जितके महत्त्वाचे असते तितकीच, किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्तच विविध पातळ्यांवर समन्वय साधणारी, बारीकसारीक बाबींची खडा नि खडा माहिती असणारी निष्ठावंतांची दुसरी फळीही महत्त्वाची असते. ‘मिल मजदूर सभा’, ‘टेक्सटाइल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया’ आणि ‘हिंद मजदूर सभा’ या समाजवादी विचारसरणीच्या कामगार संघटनांची धुरा गुप्ते यांनी अशीच खंबीरपणे सांभाळली होती.

सहका-यांमध्ये व्हीजी या संक्षिप्तनामाने ओळखल्या जाणा-या गुप्ते यांचा जन्म पनवेल येथे ९ मे १९२८ रोजी झाला. काँग्रेस नेत्यांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांचे वडील नीलकंठ गुप्ते यांनी सरकारी नोकरी सोडून वकिली सुरू केली व कालांतराने ते काँग्रेसचे काम करू लागले. घरातच राजकारणाचे बाळकडू मिळालेले व्हीजी शालेय वयातच राष्ट्र सेवा दलात जाऊ लागले. तिथेच ते सानेगुरुजी, एस. एम. जोशी आदींच्या प्रभावाखाली आले. १९४२ च्या चले जाव आंदोलनात मित्रांबरोबर मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकावण्यासाठी त्यांनी मोर्चा काढला होता. पुढे १९४९ मध्ये पुण्यातल्या लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. नंतर मुंबईत जाऊन त्यांनी समाजवादी पक्षाचे काम सुरू केले. मिल मजदूर सभेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कामगारांचे खटले विनामूल्य चालवले. संघटनेच्या तुटपुंज्या मानधनावर त्यांनी कित्येक वर्षे काम केले. १९७१ मध्ये मिल मजदूर सभेचे महासचिव म्हणून त्यांची निवड झाली आणि १९९८ पर्यंत हे पद त्यांनी समर्थपणे सांभाळले. त्यानंतर सभेच्या अध्यक्षपदाची त्यांच्यावर सोपवली गेलेली जबाबदारी त्यांनी अगदी अखेरपर्यंत सांभाळली. या काळात असंख्य आंदोलने, संप, बंद, मेळावे, मोर्चे त्यांनी संघटित केले. यातील सर्वांत लक्षवेधी संप होता १९५० चा. सुमारे अडीच लाख कामगारांचा बोनसच्या प्रश्नावरील हा संप दोन महिने चालला होता.

१९७१ मध्ये सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या ४० कंपन्यांच्या वकिलांसमोर कामगारांचा एकमेव वकील म्हणून ठाकलेल्या व्हीजींनी तो खटला जिंकून त्याचा लाभ हजारो कामगारांना मिळवून दिला. मजदूर सभेने १९८१ मध्ये अभ्यास व संशोधनासाठी स्थापन केलेल्या मणीबेन कारा इन्स्टिट्युटचे आरंभापासूनचे ते संचालक होते. या संस्थेतर्फे प्रसिद्ध झालेल्या बहुतांश पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. आप्त परिवारात त्यांना नाना असे संबोधत असत. विवीधगुणसंपन्न व्हीजींनी कामगारविषयक लेखनाबरोबरच ऑस्कर वाईल्डच्या कथा मराठीत आणल्या. स्त्रीजातीचा प्रवास, उलटी पावलं आणि गुलामगिरीला आव्हान, अशी अनुवादित पुस्तकेही त्यांनी लिहिली. समाजवादी विचारांवर आयुष्यभर अविचल असलेल्या व्हीजींनी देहदान केले हे सुसंगतच आहे.

(संदर्भ स्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*