वसंतराव गोवारीकर (डॉ.)

Dr. Vasant Gowarikar

भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाचा पाया रचणार्‍या डॉ.वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात १९३३ साली झाला! अवकाश , हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात मह्त्त्वपूर्ण असे संशोधन डॉ.वसंत गोवारीकर यांनी केले आहे. वयाच्या अवघ्या ११ वर्षी यांत्रिक पद्धतीने चरख्यातील धागा आपोआप गुंडाळला जाण्याची पद्धत शोधली होती. त्यांच्या या शोधासाठी त्याकाळात त्यांचे भरभरुन कौतुकही झाले होते.

त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. बीएससी आणि मग एमएससी केल्यावर गोवारीकर यांनी इंग्लंडमध्ये प्रवाही पदार्थ या विषयावर पीएचडी केली. वयाच्या २८ व्या वर्षी “ऑक्सफर्ड विद्यापीठा”मध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अमेरिकेत “रिसर्च सेंटर”मध्ये ते क्षेपणास्त्रातील मीटरचे संशोधन करण्यासाठी गेले होते. मात्र अमेरिकेत संशोधनाच्या कार्यासाठी न थांबता गोवारीकर पुन्हा भारतात परतले.

१९६५ साली “टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च” या संस्थेमध्ये डॉ.वसंत गोवारीकर यांनी उपग्रह तंत्रज्ञानावर काम करायला सुरुवात केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली “एसएलव्ही – ३” हा उपग्रह वाहक तयार झाला व त्यांच्या कामासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे कौतुकही केले होते. “पॉलिमर केमिस्ट्री”मध्ये त्यांनी केलेले संशोधन सर्वत्र गाजले.

डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. डॉ.वसंत गोवारीकरांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही तयार केले. त्यानंतर या मॉडेलला “गोवारीकर मॉडेल” म्हणून नाव देण्यात आले.

१९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव त्यासोबतच १९९१ ते १९९३ या कालावधीत पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार त्यांनी काम केले होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु, पुढे सहा वर्ष म्हणजे १९९४ ते २००० या कालावधीत ते मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष अश्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी पाहिले आहे .

लोकसंख्येवर भाष्य करणारे “आय – प्रेडीक्ट” हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. भिंतीआड बसून संशोधन करता मूलभूत समस्यांची जाणीव असणारे शास्त्रज्ञ म्हणून डॉ.गोवारीकर यांची ख्याती होती.

डॉ.वसंत गोवारीकर यांनी संशोधन त्याचप्रमाणे विज्ञान क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानासाठी “पद्मश्री”, “फाय फाऊंडेशन पारितोषिक”, “नायक सुवर्णपदक” व अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट्स अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

२ जानेवारी २०१५ रोजी म्हणजे वयाचा ८१व्या वर्षी त्यांचे पुण्यात निधन झाले.

(लेखन व संशोधन : सागर मालाडकर )

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

9 Comments on वसंतराव गोवारीकर (डॉ.)

Leave a Reply

Your email address will not be published.


*