वर्धने, गंगुबाई

अत्यंत विपरीत परिस्थितीतून मार्ग काढणारी तेजस्वी प्रकाश शलाका म्हणजे गंगूबाई वर्धने, अशी त्यांची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी हे त्यांचे जन्मगाव. वयाच्या तिसर्‍या वर्षी वडिलांचे व नवव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर अंगावर गरिबीची कुर्‍हाड कोसळुनसुध्दा गंगूबाईंनी अतिशय धैर्याने व स्वत:च्या पायावर उभे राहून बहीण-भावांचा सांभाळ केला. शिक्षण आणि कर्तृत्वाने माणसे मोठी होतात, यावर त्या वयापासून विश्वास असलेल्या गंगूबाईंनी, अशा कठीण परिस्थितीत आपले शालेय शिक्षण चालू ठेवले. शिक्षण व कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांचा बुटीबोरी येथील शेतकरी कुटुंबातील दौलतराव वर्धने यांच्याशी विवाह झाला. दौलतराव एकीकडे शेती करीत व दुसरीकडे त्यांनी तलाठ्याची नोकरी सुरू केली. पतीची अल्प मिळकत असल्यामुळे गंगूबाईंनाही काम करणे भाग होते. त्यामुळे त्यांनी शाळेत प्रवेश न घेता बहि:शाल विद्यार्थी म्हणून पुढील शिक्षण पूर्ण केले. शिक्षिकेचे व ग्रामसेविकेचे प्रशिक्षण घेवून, त्यानंतर त्यांनी सलग २८ वर्षे ग्रामसेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून काम करण्याची किमया केली. १९८७ साली त्या या सेवेतून निवृत्त झाल्या. स्वत:ला घडवताना त्यांनी आपल्या चार मुलांना व एका मुलीलाही घडवले.

गंगुबाईंचा मोठा मुलगा इंजीनियर तर दुसरा मुलगा शाम वर्धने जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत रूजु आहे. अन्य दोन मुलेही इंजीनियर आहेत, तर मुलगी प्राचार्य आहे. ग्रामसेविका ही गंगूबाईंची नोकरी असली तरी त्यांनी त्याकडे नोकरी म्हणून न पाहता महिलांच्या विकासाचे साधन म्हणून पाहिले. ग्रामीण भागातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी या पदाचा वापर केला, पण या पदाचा उपयोग होत नाही असे जिथे दिसले तेथे त्या रस्त्यावर उतरल्या व महिलांना न्याय मिळवून दिला.

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये धडाडीने काम करीत त्यांनी ग्रामविकासाला वाहून घेतले.

लोकसेवा व विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणारा कस्तुरबा गांधी पुरस्काराने गंगूबाई वर्धने यांना गौरवण्यात आले आहे.

(संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*