कर्णिक, व्हि. बी.

Karnik, V.B.

व्हि. बी. कर्णिक हे एक समर्थ कामगार नेते, व समाजवादी तत्वांचे विचारवंत, या नात्याने महाराष्ट्रातील कामगारांचे संघटन व विचारमंथन घडवून आणण्यात सक्रीय होते. मुंबईमधील जवळजवळ सर्व व्यापारी संघटनांचे सभासदत्व, व या क्षेत्रातील प्रचंड अनुभव या दोन घटकांमूळे त्यांनी अखिल भारतीय व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदापर्यंत उत्तुंग भरारी मारली.

 कामगारांना एकत्रित आणून व त्यांच्या न्याय्य हक्कांबद्दल प्रेरित करून, त्यांचा प्रखर लढा उभा करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. शिक्षणाने वकील असलेले कर्णिक, हे कामगार प्रवाहामध्ये त्यांच्या सामाजिक तळमळीमूळे खेचले गेले, व एन. एम. जोशींबरोबर त्यांनी कामगारांच्या गंभीर प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून वकिलीचा त्याग केला.
आपल्या आभ्यासपूर्ण वक्तृत्वामूळे व असामान्य नेतृत्वकौशल्यांमूळे ते अल्पावधीतच, एम. एन. रॉय यांच्या विश्वासाला पात्र ठरले. रॉय यांच्यावरील प्रत्येक संकटावेळी, कर्णिक त्यांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभे राहिले होते. रॉय यांना जेव्हा कारावासाची शिक्षा झाली, तेव्हा व्यापारी संघटनेच्या बैठकी आयोजित करणे, व्यावसायिकांशी नियमीत पत्रव्यवहार ठेवून कामगारांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणे, स्वतंत्र भारत व रॅडिकल ह्यूमॅनिस्ट सारख्या नियतकालिकांचा प्रकाशनभार स्वीकारणे अशा अनेक कामांची पुर्तता त्यांनी सक्षमपणे केली. रॉय यांच्या गैरहजेरीमध्ये, त्यांनी व्यापारी संघटनेचे जाळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांमध्ये अतिशय कल्पकतेने विणले. रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीला विविध कामगार संघटनांचा आधार मिळवून देवून, त्यांनी कामगार चळवळीचे तेज व मनोबल लाख पटींनी वाढविले.
रॉय यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व नियतकालिकांचे संपादन कर्णिकांनी केले. कामगार समस्यांवर बहुआयामी लेखन, तसेच एम. एन. रॉय यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखविणारे विपूल लेखन, अशी त्यांची ग्रंथसंपदा नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रसिध्द झाली. 1975 चा देहरादून कँप, बाँबे काँफरन्सेस, नागपुर बैठक, तसेच आंध्र प्रदेशामध्ये जावून त्यांनी कामगारजागृती केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*