मराठे, उषा (उषाकिरण)

उषा मराठे हे मूळ नाव असणार्‍या उषाकिरण यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी वसईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषाकिरण आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोन्ही मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले. घरासाठी आणखी उत्पन्नाचे एक साधन हा विचारही त्यामागे होता. वयाच्या बाराव्या वर्षी उषा मराठे यांनी रंगभूमीवर पहिल्यांदा पदार्पण केले. त्यानंतर लगेचच त्यांना “कुबेर” या मराठी चित्रपटात एक छोटीशी भूमिका मिळाली.

नृत्य शिकण्यासाठी उषाकिरण यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुप्रसिध्द नर्तक उदय शंकर यांच्या नृत्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अभिजात नृत्यकला आत्मसात केली. बंगाली, गुजराथी,हिंदी,तामीळ आणि इंग्रजी या भाषाही उषाकिरण यांनी शिकून घेतल्या.
पुण्यात आल्यावर उषा यांना “सीता स्वयंवर” या सिनेमात छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर “मायाबाजार” चित्रपटामध्ये त्यांना रुक्मिणीची मोठी भूमिका मिळाली. त्यांची ही भूमिका लोकप्रिय ठरली आणि त्यानंतर त्यांचा मराठी सिनेसृष्टीत त्यांना अभिनेत्री म्हणून अनेक भूमिका मिळत गेल्या. मंगल पिक्चर्सचा “जशास तसे” आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित “क्रांतीवीर वासुदेव बळवंत” या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांमुळे उषाकिरण यांना लोकप्रियतामिळत गेली व अमराठी सिनेमांसाठी भुमिका मिळत गेल्या.
१९५० मध्ये ’श्रीकृष्ण दर्शन’ या चित्रपटामध्ये काम करत असतानाच स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून त्यांनी ते उषाकिरण असे केले. पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.
उषाकिरण यांनी “जशास तसे” चित्रपटामध्ये “डोंबारीण” आणि “पुनवेची रात” मध्ये तमासगिरीण तर “बाळा जो जो रे” मध्ये “सोशिक स्त्री” अशा वैशिष्ट्यपूर्ण भूमिका अप्रतिमपणे साकारल्या. माधव शिंदेंच्या “शिकलेली बायको” आणि “कन्यादान” मधील त्यांच्यातले अद्भुत अभिनयसामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळाली.”कन्यादान” चित्रपटासाठी उषाकिरण यांना राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री च्या पुरस्काराने गौरवित करण्यात आले होते. त्याशिवाय “पतिता” सिनेमामध्ये व आनंद, “दाग” मध्ये दिलीपकुमार, “काबुलीवाला” मध्ये बलराज साहनी सोबत तर “नजराना” मध्ये राज कपूर या अभिनेत्यांबरोबर उषाकिरण यांना काम केरण्याची संधी मिळाल्यामुळे उषाकिरण “बॉलीवुड” च्या आघाडीच्या नायिका ठरल्या व त्यांची लोकप्रियता वाढत गेली. बादबान या चित्रपटासाठी उषाकिरण यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
१९५४ मध्ये डॉ.मनोहर खेर यांच्या सोबत उषाकिरण विवाहबध्द झाल्या अणि त्यानंतर त्यांनी मोजक्याच सिनेमांमधून भुमिका केल्या.
आपल्या सिनेकारकीर्दीत उषाकिरण यांनी ज्या महत्त्वपूर्ण मराठी चित्रपटांमध्ये भुमिका साकारल्या यामध्ये “चाळीतील शेजारी”,“मर्द मराठा”,“माया मच्छिंद्र”,“विठ्ठल रखुमाई”,“बेल भंडारा”,“दूधभात”,“कांचनगंगा”,“पोस्टातील मुलगी”,“कलगीतुरा”,“पुनवेची रात”,“प्रीतिसंगम”,“चाळ माझ्या पायांत”,“सख्या सावरा मला”,“एक धागा सुखाचा”,“माणसाला पंख असतात”,“गरिबाघरची लेक२”,“सुनबाई”,“सप्तपदी”,“फटाकडी” तर हिंदीत “कल्पना”,“मदहोश”,“दोस्त”,“अधिकार”,“परिवार”,“अनुराग”,“मुसाफीर”,“बावरची”,“मिली”,“चुपके चुपके”चा समावेश आहे; ज्यामध्ये भिनेत्री व सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्या रुपेरी पडद्यावर वावरल्या.
सिनेमातून निवृत्त झाल्यावर उषाकिरण यांनी समाजकार्यात स्वतःला वाहूने घेतले. मुंबईच्या लोकपाल (शेरीफ) होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. उषाकिरण यांनी “उष:काल” या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. ९ जानेवारी २००० या दिवशी म्हणजे वयाच्या ७१ व्या वर्षी उषाकिरण यांचे कर्करोगामुळे नाशिक येथे निधन झाले.
उषाकिरण यांच्यावरील मराठीसृष्टीवरचे विविध लेख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*