हुबळीकर, शांता

Shanta Hublikar

१४ एप्रिल १९१४ रोजी कर्नाटकातील हुबळी या शहराजवळील “अदरगुंजी”या खेडेगावात शांता हुबळीकर यांचा जन्म झाला.बालपण तसे कष्टाचेच गेले. गाण्याची बर्‍यापैकी समज त्यांना होती. चारचौघींसारखं साधं व्यक्तिमत्त्व असूनदेखील शांता हुबळीकर यांनी तीस-चाळीसच्या दशकातील मराठी रुपेरी पडदा चांगलाच गाजवला.

वयाच्या सोळाव्या वर्षी काही कानडी नाटकात त्यांनी कामं केली व गायन देखील.पण त्यामध्ये उत्पन्न कमी असल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी कोल्हापूरला मार्गस्थ झाल्या.त्याच सुमारस भालजी पेंढारकर दिग्दर्शित कालियामर्दन चित्रपटात अगदी छोटीशी भुमिका साकारली. याच दरम्यान कोल्हापूर सिनेटोनमध्ये चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके ,’गंगावतरण’ हा चित्रपट बनवत होते. त्या चित्रपटातही शांता हुबळीकरांनी ,गंगेची भुमिका केली व एका गाण्यासाठी गायन देखील केले होते.

भालजी पेंढारकर यांच्या “कान्होपात्रा”या चित्रपटात शांताबाईंना सर्वप्रथम महत्वपूर्ण भूमिका मिळाली. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.”कान्होपात्रातील”भूमिकेमुळेच शांताबाईंना प्रभात फिल्म कंपनीत “माझा मुलगा”,”माणूस” या दोन चित्रपटात नायिकेच्या भूमिका मिळाल्या. या दोन्ही चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं कौतुक तर झालेच,पण त्यांनी गायलेली गाणीही लोकप्रिय झाली.”माणूस”चित्रपटातील “कशाला उद्याची बात” हे त्यांचे गाणे आजही श्रवणीय वाटते. दुर्गा खोटे निर्मित “सवंगडी”चित्रपटासाठीही शांता हुबळीकरांनी गाणी गायली.

पुणे येथील मुक्कामी शांता हुबळीकरांचा बापूसाहेब गीते यांच्याबरोबर परिचय झाला व १९३९ साली त्या विवाहबध्द झाल्या. परिस्थितीमुळे त्यांना चित्रपटात काम करणे भाग पडले.”प्रभात”,”घर की लाज”,”कुलकलंक”,”मालन”,”घरगृहस्थी”,”सौभाग्यवती भव:”इत्यादी हिंदी चित्रपटांत त्यांनी कामे केली व पुन्हा एकदा त्या मराठी चित्रपटांकडे वळल्या. विश्राम बेडेकर दिग्दर्शित”पहिला पाळणा” मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली. मातृभाषा कानडी असूनही शांताबाईंनी फक्त एकाच कानडी चित्रपटात काम केले.

चित्रपटाचे नाव होते “घरसंसार”. वयोमानामुळे शांता हुबळीकर यांना नायिकेचे काम मिळेना,अखेर त्यांनी चरित्र अभिनेत्रीचे काम स्विकारायचे ठरवले व फिल्मिस्तानच्या “सौभाग्यवती भव” या सिनेमात पहिल्यांदाच चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली. १९५८ साली प्रदर्शित झालेला हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरला. सिनेमात काम मिळायचे जवळपास बंद झाल्यामुळे शांता हुबळीकर यांनी गायनाबरोबरच भावगीते तसंच नाट्यसंगीताचा कार्यक्रम त्या करीत. त्या कार्यक्रमांना प्रचंड लोकप्रियता लाभली. पण आर्थिक नियोजनभावी हे कार्यक्रम कालांतराने बंद पडले.

एकेकाळी सार्‍या भारतभर लोकप्रियता मिळवणा-या शांता हुबळीकरांची वैयक्तिक आयुष्यात लहानपणापासुनच चढउतार येत होते.आयुष्याचा उत्तरार्ध तर खुपच हालाखीचा होता.झगमगत्या जगापासून आणि स्वकियांपासून दूर अनेक वर्षे आश्रमात राहून अज्ञातवासातच काढली तेही एका अनाथाश्रमात. १९८८ मध्ये एका प्रसिध्द वृत्तपत्रात त्यांच्या आश्रमातील जीवनावर आधारीत खळबळजनक लेख प्रसिद्ध झाला आणि शांताहुबळीकरांचे आयुष्य पुन्हा बदलले व त्या अज्ञातवासातून बाहेर पडल्या व समाजात वावरू लागल्या. पण त्याकाळात देखील त्यांना कौटुंबिक सुख लाभले नाही,त्यांचे पती बापूसाहेब गीते यांचे १९७७ सालीच निधन झाले होते.पण आश्रमात न राहता पुणे येथील अनाथ महिला मंडळाच्या आश्रमात त्यांनी आश्रय घेतला होता. तिथेच १७ जुलै १९९२ रोजी त्यांचे निधन झाले.

(लेखक-सागर मालाडकर)

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

मराठी सिनेतारका शांता हुबळीकर (14-Apr-2017)

शांता हुबळीकर (17-Jul-2017)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*