सतीश तारे

तारे, सतीश

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने मराठी रंगभूमीसह टीव्ही आणि चित्रपटांत आपला ठसा उमटवणारे विनोदी अभिनेते सतीश तारे यांनी वडिलांच्या नाटकांमधूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली.हौशी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्तपणे मुशाफिरी केली. प्रा.जयंत तारेंच्या “फुलराणी” या पुण्यातील बालनाट्य चळवळीत अग्रेसर असलेल्या संस्थेतून सतीश तारे यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.

“सिंदबाद”,”हिमगौरी आणि सात बुटके”, “जाड्या-रड्या”, अशा बालनाट्यांतून कामे करत त्यांनी बंधू सुनील यांच्यासोबत व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले”.ऑल लाइन क्लीअर”या सस्पेन्स कॉमेडीद्वारे त्यांनी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम पदार्पणातच आपली मोहोर उमटविली. उत्स्फूर्तता,प्रसन्न चित्त, हजरजबाबीपणा, विनोदाची उत्तम जाण आणि वेळेचं भान या गुणांमुळे त्यांनी अल्पावधीतच नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमांत आपले स्थान निर्माण केले.

“वासूची सासू”,”टुरटूर”,”श्यामची मम्मी”,”आमचं जमलं बरं का”,”गाढवाचं लग्न”,”बाई ग बाई”,”वन टू का फोर”,”ना त्यातले ना ह्यातले”,”जादू तेरी नजर”,”आम्ही बिघडलो”,”असा मी असामी”,”शुभ बोले तो नारायण”,”विच्छा माझी पुरी करा”,”सगळं कसं गुपचूप”,”चल घेऊन टाक”,”रात्रीच घोटाळा झाला”,”गोलगोजिरी”,ही त्यांची नाटके विशेष गाजली.”नवरा माझा नवसाचा”,”वळू”,”बालक-पालक”,”नवरा माझा भवरा” अश्या चित्रपटांतूनही त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.

दूरचित्रवाणीवरील ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील त्यांनी साकारलेली ‘माऊली’ ही व्यक्तिरेखा त्यांना अनोखी ओळख देउन गेली,”फू बाई फू”,”घडलंय बिघडलंय”,”सारेगम” या रिअ‍ॅलिटी शोज्मधूनही त्यांनी आपली छाप पाडली.विशेष म्हणजे मेंडोलीन सारखं अवघड वाद्य देखील ते उत्तम प्रकारे वाजवत.”आपलं ठेवा झाकून” या नाटकाच्या निमित्ताने झालेल्या वादातून सतीश तारेंना नाट्य निर्मात्यांच्या बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. तरी पण त्यांनी जिद्दीने स्वतःची नाट्यनिर्मिती सुरूच ठेवली होती.

त्यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी पायाला गँगरिन झाल्याने त्यांना दादर येथील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते व तिथे त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना अंधेरीच्या सुजय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, तिथेही त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. परंतु, लिव्हरही काम करेनासे झाल्यामुळे शेवटपर्यंत ते सावरलेच नाहीत. अखेर ३ जुलै २०१३ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते ५३ वर्षांचे होते.सतीश तारे यांच्या अकाली निधनाने एक मोठा विनोदी कलावंत हरपल्याची भावना व हळहळ मराठी रंगभूमी,तसंच मनोरंजन विश्वात व्यक्त केली गेली त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगीली असा परिवार आहे.
(लेखक : सागर मालाडकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*