सुरकर, संजय

मूळचे नागपूरचे असलेले संजय सुरकर यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५९ रोजी झाला. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या अनेक एकांकिका गाजल्या. संजय सुरकर यांना अभिनेता व्हायचं होत कारण स्पर्धांमधील अनेक एकांकिकांमध्ये दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अभिनयही केला होता. ‘वंश’ ही सुरकर आणि मंगेश कदम यांनी एकत्रित दिग्दर्शित केलेली एकांकिका राज्य नाट्य स्पर्धेत पहिली आली होती. त्यानंतर ‘भ्रमाचा भोपळा’सारख्या दोन-तीन नाटकांमधून सुरकरांनी अभिनेता म्हणून भूमिका देखील साकारली. मात्र, त्यांना खरी दिशा सापडली दिग्दर्शक म्हणूनच. चौकट राजा, यज्ञ, तू तिथे मी, रावसाहेब, घराबाहेर, सुखान्त, रानभूल, आपली माणसं, आईशप्पथ, आनंदाचं झाड, आव्हान, सखी, एक डाव संसाराचा, यांसारखे वैविध्यपूर्ण व आशयघन चित्रपट प्रेक्षकांना दिले. स्मिता तळवलकर यांच्यासोबत त्यांचे चांगले सूर जमले होते. तळवलकर यांची निर्मिती असलेल्या ‘कळत-नकळत’च्या वेळी सुरकर दिग्दर्शक कांचन नायक यांचे सहायक होते. त्यावेळी संजय सुरकर यांची क्षमता ओळखून तळवलकर यांनी त्यांना ‘चौकट राजा’स्वतंत्ररित्या दिग्दर्शन करण्याची संधी दिली. त्यानंतर या जोडीने ‘तू तिथे मी’ आणि ‘सातच्या आत घरात’ व आणखी काही चित्रपट दिग्दर्शित केले. बंदिस्त पटकथा व काळजाला भिडणारे संवाद, त्याजोडीला मातब्बर कलाकारांचा अभिनय ही त्यांच्या चित्रपटांची ठळक वैशिष्टये होती. मानवी भावभावनांचा सुंदर आलेख मांडणारे कौटुंबिक, राजकीय, सामाजिक चित्रपट हे पण सूरकरांच्या चित्रपटांचं आकर्षण होतं.‘अवंतिका’ या दूरचित्रवाणी मालिकेचंही दिग्दर्शन सुरकर यंनी केलं होतं. ‘तांदळा’, ‘मास्तर एके मास्तर’ यांसारखे चित्रपट संजय सुरकर यांचे असून या चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर ‘स्टँडबाय’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवुडमध्येही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.

 २७ सप्टेंबर २०१२ या दिवशी ‘लाठी’ चित्रपटाच्या छायाचित्रीकरणाच्या दरम्यान अभिनेता सचिन खेडेकर यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*