सदाशिव अमरापुरकर

Amarapurkar, Sadashiv

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये खलनायकी व्यक्तीरेखे सोबतच विविधांगी भूमिका साकारणार्‍या सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर येथे झाला. नगरच्या अतिशय प्रतिष्ठीत अश्या घरात वावरलेल्या सदाशिव हे “तात्या” या टोपणनावाने ओळखले जाऊ लागले. नविन मराठी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर अहमदनगर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण संपादन केले; पुढे पुणे विद्यापीठातून इतिहास विषयाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असतानाच अनेक लहान-मोठ्या नाटकातून व एकांकिकाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक रसिकांसमोर सादर केली व अनेक पुरस्कारांवर नाव कोरले. काही काळ आकाशवाणी परभणी केंद्रावर निवेदक म्हणूनही सदाशिव अमरापूरकर यांनी काम केले.

सोबतच “छिन्न”, “हॅंडसअप”, “काही स्वप्नं विकायचीयत”, “हवा अंधारा कवडसा”, “ज्याचा त्याचा विठोबा” अश्या व्यावसायिक नाटकांमधुन आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला. १९७३ साली त्यांची बालमैत्रीण सुनंदा करमरकर सोबत विवाहबध्द झालेल्या सदाशिव अमरापूरकर यांना रीमा अमरापूरकर नावाची एक कन्या असून तिने सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने आपले एम.एस.डब्ल्यू.चे शिक्षण देखील पूर्ण केले आहे.

“२२ जून १८९७” या मराठी चित्रपटातून लोकमान्य टिळकांचरी छोटीशी व्यक्तीरेखा साकारत रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. १९८१-८२ च्या सुमारास भक्ती बर्वे आणि सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेले “हॅण्ड्सअप” हे नाटक मराठी रंगभूमीवर तुफान लोकप्रिय ठरले होते. गोविंद निहलानी एकदा हे नाटक पहायला आलेले असताना त्यांना सदाशिव अमरापूकरांचा अभिनय इतका भावला की “अर्धसत्य” या चित्रपटासाठी त्यांना भुमिका देऊ केली, या भूमिकेचं अमरापूकरांनी अक्षरश: सोनं केलं.

या चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट सहाय्यक अभिनेता साठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; तर १९९१ रोजी “सडक” सिनेमा साठीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर पुरस्कारावर सर्वप्रथम नाव कोरण्याचा बहुमान पटकावला, तर “क़ाल चक्र”(१९८८) आणि “इश्क(१९९८) या चित्रपटांसाठी “सर्वोत्कृष्ट खलनायक” विभागामध्ये नामांकन प्राप्त झाले होते.

सदाशिव अमरापूरकर यांनी ३०० पेक्षाही अधिक हिंदी, मराठी, तेलुगू त्याचप्रमाणे मल्याळम भाषिक चित्रपटांमधुन खलनायक तर कधी चरित्र व्यक्तीरेखा साकारल्या; यापैकी प्रमुख चित्रपट म्हणजे “इश्क”, “दो ऑंखे बारा हाथ”, “एक फुल तीन कांटे”, “कच्चे धागे”, “मेरे दो अनमोल रतन”, “मोहरा”, “आंटी नं.१”, “सरफरोश-ए-हिंद”, “रफ़ु चक्कर”, “ये रात फ़िर ना आएगी”, “राज़ा”, “फऱिश्ते”, “ए.के ४७”, “हुकूमत”, “जव़ानी”, “विरु दादा”, “आत्मा”, “कोई मेरे दिल मे है”, “पऱवाना”, “काल चक्र”, “आर पार”, “पुराना मंदिर”, “मिस्टर व्हाईट मिस्टर ब्लॅक”, “दोश”, “ब़िजली”, “अंगारा”, “हफ्ता बंद”, “खतरो के खिलाडी़”, “आस्मान से उंचा”, “गोला बारुद़”, “दुध का कर्ज़”, “आग”, “क़सम सुहाग की”, “कहाँ है कानुन ?”, “जंग”, “गुप्त – द हिडन ट्रुथ”, “बेवफा़ सनम”, “इश्वर”, “तक़दिर का तमाशा”, “जयहिंद”, “आई पाहिजे”, “दोघी”, “सावरखेड एक गाव”, “कदाचित”, “होऊ दे जरासा ऊशीर”, “ कुंकू झाले वैरी”, “होऊ दे जरासा ऊशीर”; यापैकी २०१३ साली प्रदर्शित झालेला “बाँम्बे टॉकीज” हा त्यांच्या कारकीर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला.

“अंजना आटर्स” या त्यांच्या चित्रपट निर्मिती संस्थेच्या अंतर्गत अनेक मराठी चित्रपटांच्या निर्मिती व अभिनयासोबतच लेखन देखील केले आहे.

२००८ च्या ४५व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात सदाशिव अमरापूरकर यांना कदाचित चित्रपटासाठी “विशेष अभिनेता परस्कारा”ने गौरवण्यात आले होते.

रुपेरी पडद्यासाठी सदाशिव अमरापूरकर यांचं योगदान जितकं अतुलनीय तितकचं दूरदर्शनसाठी त्यांनी साकारलेली लोकमान्य टिळकांची भुमिक असेल किंवा “भारत एक ख़ोज” सारख्या प्रबोधनात्मक मालिकेतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा, आजही प्रेक्षकांना आठवल्याशिवाय रहात नाही.

सदाशिव अमरापूकर हे स्वत: एक संवेदनशील कलाकार असण्यासोबतच, समाजाप्रती आस्था असलेले जागृत नागरिक देखील आहेत.  “लोकपाल”साठी अण्णा हजारेंनी पुकारलेला लढ्याचा पाठिंब्यासाठी असो किंवा दाभोलकर हत्याकांडा नंतर सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली वाहावी हा विचार त्यावेळी त्यांच्याकडून मांडला गेला.

तर रंगपंचमीला पाण्याची होत असलेली अकारण नासाडी; यासारख्या सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी सदाशिव अमरापूकरांनी आपलं परखडं मतं व्यक्त केले. प्रसंगी रस्त्यावर उतरुन निषेध देखील नोदवला.

२५ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांना मधुमेह बळावल्याने त्यांच्या फुप्फुसाला संसर्ग झाला त्यासाठी कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

३ नोव्हेंबर २०१४ रोजी पहाटे २:४५ मिनिटानी मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात फुफुसाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. निधनसमयी ते ते ६४ वर्षांचे होते..

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

विनोदी अभिनेता, खलनायक सदाशिव अमरापूरकर (11-May-2017)

उत्तम चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, खलनायक सदाशिव अमरापूरकर (9-Nov-2017)

(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*