झारेकर, पंकज

निसर्ग प्रेम माणसाला कुठवर घेवुन जावु शकत याच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकज झारेकर. फोटोग्राफीचा कुठलाही शैक्षणिक किंवा व्यावसायिक अनुभव गाठीशी नसताना या निसर्गवेड्या कलंदराने निसर्गाच्या विवीध ॠतुंनुसार बदलणार्‍या गहिर्‍या रंगांना व रूपांना ज्या सौंदर्यपुर्ण शैलीमध्ये कैद केले आहे, त्याबद्दल् त्याला साक्षात निसर्गदेवतेची दुवादेखील मिळाली असेल. पंकज हा चारचौघांसारखा दिसणारा, वागणारा परंतु चाकोरीबाहेरच्या स्वप्नांना अभिमानाने मिरवणारा, सर्व कलांचा प्रेमी असा स्वछंदी तरूण. ही स्वच्छंदीपणाची देणगी पण, त्याला बेधुंद करणार्‍या निसर्गाकडूनच मिळाली. मावळत्या सुर्याची रंगांनी माखलेली धुंदी बघण्याची इच्छा असेल, फुललेल्या शेतांवर अचानक काळोखाचा शिडकावा करणारा पाऊस बघायचा असेल किंवा डोंगरांना हिरव्याचा लेप लावून त्यांच्या पायथ्याशी थिजलेली नदी पाहायची असेल तर पंकजने काढलेल्या फोटोंना भेट द्यायलाच हवी. निसर्गाच्या विवीध नाजुक व विलोभनीय कडांच दर्शन या फोटोंमधून सहज घेता येइल.

फोटोग्राफीची आवड त्यांना तेव्हा निर्माण झाली झालं, जेव्हा त्याला त्याच्यासारख्याच रानवेड्या मित्रांसोबत, रांगड्या सह्याद्रीच्या कडेकपारी धुंडाळण्याची हुरहुर लागली. प्रवास, भटकंती, व गिर्यारोहण ही त्याची जिव्हाळ्याची स्थाने असल्यामुळे त्याने साठ पेक्षा अधिक ट्रेक्स करून व ५० हजार किमी पेक्षा जास्त अंतर गाडीवरून कापत संपुर्ण कोकण व सह्याद्री परिसराला गवसणी घातली. यात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात दडलेले अनेक दुर्गम किल्ले, जलदुर्ग, अशक्यप्राय वाटणारे डोंगर त्याने सर केले. ह्या महराष्ट्राच्या रांगड्या व जनसामान्यांमध्ये विशेष परिचीत नसलेल्या सौंदर्याला त्याने केवळ डोळ्यांतच साठवून ठेवले नाही तर फोटोग्राफी या शास्त्राला हळुहळु आत्मसात करून, या क्षेत्रामधील जाणकारांचा सल्ला घेवून व अर्थातच ‘चुका व शिका’ या प्रक्रियेतून पुढे जात त्याने या सौंदर्याला घरोघरी पोहोचविले. अनेक तरूणांना त्याने ह्या दैवी सौंदर्याचं देणं देवून त्यांना घराबाहेर पडायला व निसर्गात रमायला उद्युक्त केलं. निसर्ग ही चमत्कारांची खाण असते, झाड, सुर्य, नद्या, डोंगर फुलं, पानं या त्याच्या विवीध पुत्रांनी खेळलेली अनोखी रंगपंचमी असते व ही रंगांची उधळण त्याला फोटोंद्वारे दीर्घकाळाकरिता जतन करायला आवडते.

त्याचे अनेक अविस्मरणीय फोटोज काही नामांकित प्रसारमाध्यमांच्या प्रकाशनांकडून प्रकाशित केले गेले आहेत. पुण्यनगरीमध्ये चालणार्‍या, काही अत्यंत प्रसिध्द झालेल्या उपक्रमांसाठी त्याची औपचारिक फोटोग्राफर म्हणून वर्णी लागलेली आहे जसे की वसन्तोत्सव, पुणे मोटोरक्रॉस रेसिंग, सकाळ या वृत्तपत्राचा एक हजार माईल्स उपक्रम इत्यादी. पंकजच फोटोग्राफीमधील असामान्य कौशल्य, व सफाई ही शिक्षणातून नव्हे तर केवळ त्याच्या अनुभवाच्या व प्रबळ इच्छेच्या शिदोरीवर आलेली असली तरी ती आता सर्वमान्य झाली आहे कारण भारती विद्यापीठाची पुण्यामधील, ‘इनस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च’ ही नावाजलेली संस्था त्याला फोटोग्राफीशी संबंधित चालणार्‍या विवीध स्पर्धांवेळी परीक्षक म्हणून बोलावते. तसेच पुण्यामधील अनेक झपाटलेल्या व उत्साही नवेदित फोटोग्राफर तरूणांचा खुप मोठा गोतावळा असलेली फोटोग्राफर्स@पुणे ही संस्था उभी करण्यात व गुलमोहोरासारखी फुलविण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. या संस्थेचे जे वार्षिक फोटोंचे प्रदर्शन (दृष्टिकोन) भरतं त्याकरिता येणार्‍या लाखो फोटोप्रवेशांच भविष्य त्याच्याच निर्णयावर अवलंबुन असतं. सकाळ या पुण्यामधील सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात आठवड्याला एक याप्रमाणे, प्रवासवर्णनात्मक लेख लिहीण्याचा अधिकारदेखील, त्याला त्याच्या सुंदर फोटोग्राफीमुळे व तिला अधिक रसदार बनविणार्‍या जोडलिखाणामुळे, मिळाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*