सुर्वे, नारायण गंगाराम

Surve, Narayan Gangaram

नारायण सुर्वे यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणार्‍या, व असंख्य वेदना निमुटपणे सोसणार्‍या जनतेचे आयुष्यभर अगदी समर्थपणे प्रतिनिधीत्व केले. नारायणसुर्वे अनाथ मूल म्हणून वाढले. जन्म झाल्यावर जन्मदात्रीने त्यावेळी नवजात अर्भक असलेल्या नारायणास सोडून दिले. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी करणारे गंगाराम कुशाजी सुर्वे व त्याची कामगार पत्‍नी काशीबाई यांनी अनाथ असलेल्या नारायणास मात्यापित्यांचे छत्र दिले. गंगाराम सुर्वे इंडिया वुलन मिलच्या स्पिनिंग खात्यात साचेवाल्याचे काम करत, तर काशीबाई त्याच गिरणीच्या बाइंडिंग खात्यात कामगार म्हणून नोकरीला होत्या. गंगाराम सुर्वे ह्यांनी त्यांच्या जन्मापासून त्यांचा सांभाळ केला म्हणून नारायण गंगाराम सुर्वे असे नाव त्यांनी धारण केले. नारायण सुर्वे यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व्यतीत झाले. उपहारगृहात कामगार तर कापड गिरणीत बिगारी म्हणून व पुढे अक्षर ओळख झाल्यानंतर प्राथमिक शाळेत शिपाई अश्या अनेक नोकर्‍या नारायण सुर्वेंनी केल्या त्यासोबतच सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कालांतराने प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. सुरुवातीपासूनच सुर्वेंना भाषा व साहित्यामध्ये रुची असल्याने हिंदी आणि उर्दू भाषा उत्तमरित्या अवगत करुन घेतल्या होत्या. १९४८ मध्ये ते कृष्णा साळुंके यांच्याशी विवाहबध्द झाले.

१९६२ रोजी “ऐसा गा मी ब्रह्‌म” हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर १९६६ साली “माझे विद्यापीठ”, १९७५ ला “जाहीरनामा” तर १९९५ रोजी “नव्या माणसाचे आगमन” हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कृष्ण चंदर यांच्या उर्दू कथांचा सुर्वे ह्यांनी केलेला अनुवाद “तीन गुंड आणि सात कथा” या नावाने १९६६ रोजी प्रसिद्घ झाला. “दादर पुलाकडील मुले” ही त्यांची अनुवादित कादंबरी, त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद “ऑन द पेव्ह्‌मेंट्‌स ऑफ लाइफ” शीर्षकाने १९७३ साली प्रसिद्घ झाला आहे.

संवादमय शैली हे त्यांच्या कवितेच आणखीन एक वैशिष्ट्य; दैनंदिन गरजेसाठी व आपल्या हक्क आणि अस्तित्वासाठी झगडणारा माणूस सुर्वे ह्यांच्या कवितेतील अनुभवसृष्टीच्या मध्यवर्ती भुमिकेत आहे. लॉस अँजेल्सचा निग्रो माणूस, आफ्रिकन चाचा, टांगेवाला, शीग कबाबवाला, याकूब नालबंदवाला, संपकरी, जथ्यात वावरणारा, पोस्टर्स चिकटवणारा हमाल, वेश्या अश्या समाजातल्या उपेक्षित घटकांचे विस्तृत तपशील त्यांच्या कवितेत आल्यामुळे त्यांची कविता तळागळातील जनतेचे प्रतिनिधित्व करते. कवितेची भाषा अभिव्यक्तीची स्वतंत्र पद्घतीची असल्यामुळे व सर्वसामान्य वाचकवर्गाला समजतील असे शब्द त्यांच्या कवितेत येत असल्यामुळे ती भावस्पर्शी वाटत रहाते .लढणार्‍या प्रत्येक माणसाशी नव्या काळातही त्यांची कविता आपली नाळ जुळवत राहिली. “कढ आलेल्या भातासारख्या व्यथा”, “चुलाण्यात फटफटावे लाकूड तसा आत्मा” ही त्याचीच उदाहरणे म्हणता येतील.

नारायण सुर्वेंची कविता विद्यापीठाच्या अभ्यासासाठी स्वीकृत होऊन समाविष्ट करण्यात आली. गुजराती, हिंदीसोबतच जगातील अनेक भाषांमध्ये त्यांच्या कवितेची भाषांतरे झालेली असून मराठी काव्यविश्वाला त्यांनी नविन्यपूर्ण परिमाण प्राप्त करुन दिले आहे.

महाराष्ट्र शासनाचे दोन प्रथम पुरस्कार त्यांच्या “ऐसा गा मी ब्रह्‌म” व “माझे विद्यापीठ” कवितेला मिळाले. “सनद” साठी भारत सरकारचा साहित्य पुरस्कार; नेहरु पारितोषिकाचेही सुर्वे दोन वेळा मानकरी ठरले आहेत. अमेरिकेतील “महाराष्ट्र फाउंडेशन” चा पुरस्कार तसंच मध्य प्रदेश सरकारचा “कबीर पुरस्कार”, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा “जनस्थान पुरस्कार”, यासोबतच साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी नारायण सुर्वे यांना १९९८ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

नारायण सुर्वे यांच्यावर प्रदर्शित झालेल्या माहितीपटाला राष्ट्रीय पातळीवरचा प्रथम पुरस्कार मिळाला. नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी “मास्तरांची सावली” या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.

१६ ऑगस्ट २०१० रोजी नारायण सुर्वे यांचे ठाणे येथे निधन झाले.

तळागाळातील साहित्यिक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुणे शहरात सुर्व्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “नारायण सुर्वे कला अकादमी” स्थापन करण्यात आली आहे.

नारायण सुर्वे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे (15-Oct-2016)

ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे (6-Nov-2017)

ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे (16-Aug-2021)

4 Comments on सुर्वे, नारायण गंगाराम

Leave a Reply

Your email address will not be published.


*