पवार, कुलदीप

मराठी चित्रपट, नाटक तसेच दूरचित्रवाणी वरील भारदस्त आवाज आणि रांगडं व्यक्तीमत्व लाभलेल्या तसंच चरित्र व खलनायक अश्या विविधां व्यक्तीरेखा साकारणारे ज्येष्ठ व बहुआयामी अभिनेते कुलदीप पवार यांचा जन्म २४ डिसेंबर १९४९ सालचा. कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील बाळ पवार हे मराठी चित्रपटांमाध्ये लहान-मोठ्या भूमिका करत. ते पाहून कुलदीप पवार यांच्यामध्ये लहानपणापासून अभिनयाची आवड निर्माण झाली होती. त्याचा उपयोग करण्यासाठी ते कोल्हापूर सोडून मुंबईस गेले. मुंबईत आल्यावर पणशीकरांच्या “इथे ओशाळला मृत्यु”मधून संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा अगदी हुबेहुब रंगवली. नजरेतील जरब आणि आवाजातला खर्जेपणा यामुळे कुलदीप पवार प्रसिद्धीस पावले.

“मर्दनी” चित्रपटापासून प्रवास सुरु केलेल्या पवारांनी पुढे “गुपचुप गुपचुप”, “आली लहर केला कहर”,”गोष्ट धमाल नाम्याची”,”आई तुळजाभवानी”, “दुध का कर्ज”, “जीत”,”जावयाची जात”,”दरोडेखोर”, “बिन कामाचा नवरा”,” अरे संसार संसार”,”शापीत”,”सर्जा”,” एकापेक्षा एक”,”वजीर”,”अरे देवा”,”खरा वारसदार”,”भारतीय” तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “महागुरु” यासारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता;तर “पाखरू”, “रखेली”, “हॅण्डसअप”,”गोलमाल”,”पती सगळे उचापती”,”जरा वजन ठेवा”,”तुझी वाट वेगळी”,”नकटीच्या लग्नाला”,”प्रश्न थोडा नाजुक आहे”,”असाही एक औरंगजेब”,”आनंद” आणि “वीज म्हणाली धरतीला”, यासारख्या नाटकांच्या माध्यमातून पवार यांनी भुमिका साकारल्या होत्या.
“परमवीर”, “तू तू मै मै” व दूरदर्शनच्या विविध मालिकांमध्ये व्यक्तीरेखा साकारत; या माध्यमात देखील कुलदीप पवार तितक्याच साफाईदारपणे वावरले.
असे गुणी तसंच अष्टपैलूत्वाचा आयाम लाभलेल्या कुलदीप पवार यांचे २४ मार्च २०१४ या दिवशी किडनीच्या आजारान अंधेरीतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*