खोपकर, (कॉ) कृष्णा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कृष्णा खोपकर यांच्या राजकीय जीवनाचा आरंभ १९४२च्या भारत छोडो आंदोलनापासून झाला. अखेरपर्यंत त्यांच्यातील कार्यकर्ता जागा होता. शेतकरी-आदिवासींमध्ये राजकीय जाणीवा जागृत करणारे, त्यांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण जीवन वेचणारे अशी खोपकर यांची ओळख करून दिली जाते. पण त्यांची ही ओळख इतपतच मर्यादित नाही. राज्याच्या कानाकोपर्‍यात शेकडो शिबिरं घेऊन हजारो कार्यर्कत्यांची फळी तयार करण्याचं श्रेयही कॉ. खोपकर यांना जातं. कॉ. खोपकर यांचा जन्म २५ मार्च, १९२४ साली नाशिकच्या पेठ येथे झाला. नाशिकमधील कामगार-शेतकऱ्यांची लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य त्यांनी कॉ. नरेंद मालुसरे यांच्या सहयोगाने सुरू केले. १९४६ साली मुंबईत स्थलांतर केल्यानंतर त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे कार्य सुरू ठेवले. १९४८ साली नाशिक अधिवेशनात समाजवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर डॉ. राममनोहर लोहियांच्या मार्गदर्शनाने त्यांनी समाजवादी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले. परंतु त्यापूर्वी स्थापन झालेल्या ‘९ ऑगस्ट ग्रुप’ मधील अनेक तरुणांचा मार्क्सवाद-लेनिनवादाच्या विचारसरणीशी निकटचा परिचय झाला. समाजवादी पक्षातील नेतृत्वाशी त्यांचे खटके उडू लागले. अखेर आपल्या ५० ‘साथीं’बरोबर समाजवादी पक्षाला रामराम ठोकून ते बाहेर पडले. या बंडखोरांनी पुढे डावा समाजवादी गट स्थापन करून भारतीय कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांजबरोबर राजकीय सहकार्याच्या भूमिकेतून कार्य केले. हा गट १९५२ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन झाला. खोपकर यांनी ठाणे परिसरातील वुलन कामगार व इंजिनीयरिंग कामगारांच्या लढाऊ ट्रेड युनियन आंदोलनाचे नेतृत्व केले आणि कॉ. शामराव व कॉ. गोदावरी परूळेकर यांच्या मार्गदर्शनाने ठाणे जिल्ह्यात किसान सभेचेही भरीव कार्य केले. संयुक्त महाराष् ्राच्या चळवळीत खोपकर यांनी स्वत:ला झोकून दिले व पाच महिन्यांचा कारावासही भोगला. १९६४ साली कम्युनिस्ट चळवळीतील दुरुस्तीवादाविरुद्ध लढून स्थापन झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात खोपकर व त्यांचे अनेक सहकारी सहभागी झाले. १९७५च्या आणीबाणीत त्यांना १९ महिने तुरुंगात घालवावे लागले. ठाणे-नाशिक भागातील आदिवासींमध्ये राजकीय जाणीवा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ठाण्यातील आदिवासी उठाव, रायगडमधील सेझविरोधी लढा या त्यांच्या लहानमोठ्या पुस्तकांमधून शेतकरी-कामगारांचे प्रश्न पुढेे आले. २००८ साली पक्षाच्या ‘जीवनमार्ग’ या मुखपत्राच्या संपादकपदी त्यांची निवड झाली. पक्षात अनेक पदांची जबाबदारी पार पाडणारे खोपकर आपल्यात नसले तरी त्याचे कार्य तरुण कार्यर्कत्यांना स्फूर्ती देत राहील.

## Krishna Khopkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*