कोरगावकर भा. ल.

Korgaonkar, B L

काही काही माणसांकडे दुसर्‍यांना थकवणारी अफाट ऊर्जा असते. असेच वरदान भा ल कोरगावकर यांनाही लाभले आहे. म्हणूनच तर आता वयाची पंचाहत्तरी गाठत असतानाही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना आणि पायाला लागलेल्या भिंगर्‍या अखंड गरगरत असतात. कोरगावकरांची ऐन तारुण्यातील उमेदीची वर्षे राष्ट्रसेवा दलासारख्या सामाजिक समतेचे उद्दिष्ट असलेल्या सामाजिक संघटनेच्या कामात गुंतवली होती. ही गुंतवणूक कोरगावकरांना आयुष्यभर उपयुक्त ठरली आहे. साठच्या दशकात शिक्षकी पेशा त्यांनी स्वीकारला तेव्हा हे सारे संचित त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनाही भरभरून दिले. परळच्या कामगार वस्तीतील आर. एम. भट हायस्कूलमधील मुलामुलींना अभ्यासापलीकडे जाऊन इतिहासाचे, समाजाचे आणि राष्ट्रीयतेचे भान त्यांनी दिले. मात्र एका घटनेमुळे कोरगावकरांचे आयुष्य वेगळ्याच टप्प्यावर येऊन उभे राहिले. त्यांचा मुलगा मानस जन्मत:च मेंदूच्या पक्षाघाताचा (सेरेब्रल पाल्सी)बळी ठरला होता. जोडीला मतिमंदत्व. ‘दहा दिशांतूनी तूफान व्हायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे’ हे दलगीत जीवनगीतच बनलेल्या कोरगावकरांनी आणि त्यांच्या सहचारिणीनेही हे आव्हान स्वीकारले. डॉक्टरांकडे फेर्‍या सुरू झाल्या. ही दीर्घ पल्ल्याची शर्यत आहे हे त्यांनी जाणले. आपल्या पोटच्या गोळ्याला पुण्याच्या केईएम हॉस्पिटलच्या टीडीएच सेंटरमध्ये नियमीत घेऊन जाणे, फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी सातत्याने देणे सुरू झाले. तिथे त्यांचा अन्य पालकांशी परिचय झाला. पण त्यापैकी बहुतेकजण नकारात्मक विचार करणारे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांचा हा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी टीडीएच सेंटरचे संचालक डॉ. आनंद पंडित आणि तेथील थेरपिस्ट यांच्याशी चर्चा करून त्यांनी सर्व पालकांची सभा घेतली व ‘फ्रेंड्स ऑफ टीडीएच’ ही संस्था स्थापली.

१९८८मध्य पुण्यात दोन दिवसांची परिषद घेतली आणि १९९०मध्ये ‘उमेद परिवार’ या पालकसंस्थेची स्थापना केली. समाजातल्या अन्य घटकांचेही प्रबोधन व्हावे यासाठी वर्तमानपत्रे, आकाशवाणी या माध्यमांचा पुरेपूर वापर केला. १९९४ साली नॅशनल फेडरेशन ऑफ पेरेंट्स असोसिएशन या काळात राष्ट्रीय पातळीवरील फेडरेशन स्थापण्यातही त्यांचा पुढाकार होता. सर्वानुमते त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. महाराष्ट्रात पालक संघटनांचा योग्य प्रसार होण्यासाठी १९९७मध्ये त्यांनी महाराष्ट्र मानस परिवार या राज्यस्तरीय पालक संघटनेची स्थापना केली. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत पालक संघटना सुरू झाल्या. परिषदा, मेळावे, मुलांसाठी शिबीरे, मतिमंदांच्या भावंडांसाठी विविध उपक्रम, मानस मोहोर या दिवाळी अंकाचे संपादन याबरोबरच अपंगांच्या समस्यांवर उपाय, कायदे, नॅशनल ट्रस्ट अशा महत्वाच्या निर्णयांतही त्यांचे योगदान आहेच. सर्वच पातळ्यांवर उपेक्षित असलेल्या विकलांगांच्या हक्कांची एक मोठीच चळवळ महाराष्ट्रात फैलावण्याचे श्रेय त्यांच्या खाती निश्चितच जमा करायला हवे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*