कर्वे, इरावती

Karve, Iravati

समाजशास्त्र विषयातील संशोधक, मानववंश शास्त्राच्या एक तज्ज्ञ विचारवंत जगन्मान्य विदुषी, ललित निबंध लेखिका अशी कर्तृत्वान महिला म्हणजे इरावती कर्वे.

पूर्वाश्रमीच्या इरावती करमरकर यांचा जन्म ब्रह्मदेशात मिन्जान येथे १५ डिसेंबर १९०५ ला झाला. शालेय व उच्चशिक्षण पुणे येथील हुजूरपागा शाळेत आणि फर्गसन कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर तत्त्वज्ञान विषय घेऊन त्या बी. ए. झाल्या. ‘चित्पावन ब्रॅह्मिन्स : अ सोशियोएथनिक स्टडी’ या विषयावर प्रबंध लिहून एम. ए. ची पदवी मिळवली. त्यानंतर मानववंशशास्त्र या विषयात जर्मनीतील बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली. एस. एन. डी. टी. विद्यापीठात काही काळ काम केल्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजात संशोधक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत होत्या.
मानववंशशास्त्र या विषयावर त्यांनी बरेच अध्ययन केले. आणि कुटुंब संस्थेवर आधारलेला ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ जगन्मान्यता पावला. ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगांत’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र ’ एक अभ्यास इत्यादी सदंर्भातील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळ’ हे त्यांचे ललित संग्रह. इरावतीबाईंची भाषा साधी, सोपी, प्रसन्न आणि हलकासा विनोदाचा शिडकाव करणारी. संवेदनक्षम, भावोत्कटता हे त्यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्य होते. तर टवटवीत तरलता ही वाचकाच्या मनाला प्रफुल्लित करते. मराठी लघुनिबंधाच्या विकासाचा एक टप्पा म्हणून इरावतीबाईंच्या लेखनाकडे पाहिले जाते.
११ ऑगस्ट १९७० रोजी त्यांना देवाज्ञा झाली.
## Iravati Karve

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*