दांडेकर, गोपाल नीलकंठ

जन्म-जुलै ८, १९१६
मृत्यू- जून १, १९९८
गो.नी.दांडेकर हे मराठी भाषेतील लेखक होते. गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडिल शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदानी (गो. नी. दांडेकर) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. त्यांनी गाडगेमहाराजांचा संदेश गावोगावी पोचवला. त्यानंतर गोनीदानी वेदांतांचा अभ्यास केला. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदानी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कुमारसाहित्य, ललित, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.
त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबर्‍या कोकणाचे नयनरम्य दृष्य डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.
१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी वीणा देव ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव सुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*